श्रीमती उज्ज्वला केळकर
इंद्रधनुष्य
☆ ‘तू छुपी है कहाँ, मैं तडपता यहाँ… – लेखिका : सुश्री कल्पना मुळगावकर सबनीस ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
प्रख्यात चित्रकार रघुवीर मुळगावकर हे गिरगावात भाटवडेकर बिल्डिंग मध्ये राहावयास आले, तेथे त्यांनी स्टुडिओ उभारला त्याचे नाव होते.. ‘मुळगावकर आर्ट स्टुडिओ’ मासिके, कॅलेंडर, या वरील देवांची चित्रे यांची मागणी इतकी वाढली की कामे पुरी करायला दिवस अपुरे पडू लागले, मध्यरात्रीपर्यंत ते चित्रात मग्न असायचे.
हातातील कुंचला, व मंगेशाच्या आशीर्वादाने त्यांनी शून्यातून विश्व उभे केले, लक्ष्मी प्रसन्न होत होती. घरात दोन गाड्या दोन नोकर आले. याच सुमारास त्यांनी सी शोअरवर वाळकेश्वरला कमल बिल्डिंग मध्ये सातव्या मजल्यावर ब्लॉक घेतला. वांद्र्याच्या गर्द झाडीत एक छोटासा बंगलाही घेतला..
त्यानंतर आम्ही वाळकेश्वरच्या प्रशस्त, हवेशीर फ्लॅट मध्ये राहण्यास आलो. पप्पा सकाळी गिरगावात स्टुडिओ मध्ये कामास जायचे, व सायं सहा वाजेपर्यंत परत यायचे. पण ते नाराज दिसू लागले. ते आईला म्हणायचे, “आपण सारे गिरगावात परत जाऊ या “.
आता एव्हडा सारा हलवलेला संसार पुन्हा गिरगावात हलवण्यास आई तयार नव्हती. शेवटी त्यांनी आईला मनातील खरे खरे सांगितले.
“त्या स्टुडिओत मी एकटा काम करायला बसलो की, मला काही सुचत नाही. ना काही नव्या कल्पना सुचत,
ना काही स्फूर्ती येत. तू जवळपास असल्याशिवाय, तुझ्या बांगड्यांचा किणकिणाट ऐकल्या शिवाय, तुझ्या केसातल्या मोगऱ्याचा सुगंध दरवळत असल्याशिवाय माझा ब्रश मला साद देत नाही.. “
झालं … आम्ही पुन्हा गिरगावात आलो.
यावरुन एक आठवण आली…..
एकदा निर्माते दिग्दर्शक व्ही शांताराम पप्पांच्या स्टुडिओत काही कामासाठी आले होते. एकापेक्षा एक सुंदर चित्रे पाहून त्यांनी विचारले,
” मुळगावकर, तुम्ही मॉडेल तर घेत नाही, मग इतके सुंदर चेहरे, हा कमनीय बांधा कोणावरून रेखाटता?”
” मी माझ्या बायकोवरुन ही चित्रे काढतो ” पप्पांचे उत्तर..
व्ही शांताराम याना ते पटल्यासारखे दिसले..
मग पुढे कधीतरी त्यांच्या एका चित्रपटाच्या प्रीमियर शो ची आम्हाला चार तिकिटे मिळाली. आम्ही चौघे चित्रपट पाहण्यासाठी गेलो. त्या वेळेस शांतरामानी माझे आईस पाहिले. माझी आई दिसायला छान होती. गोरीपान, नऊवारी साडी, केसांचा अंबाडा, त्यावर फुलांचा गजरा, ठेंगणीच …. पण ती काही मुळगावकरांच्या चित्राइतकी सुंदर नव्हती. मात्र पप्पानी सांगितलेले ऐकून चित्रपटाची कथा-कल्पना शांताराम बापूंच्या मनात रुजली असावी. तो चित्रपट म्हणजे ‘ नवरंग ‘.
या चित्रपटात एका प्रतिभावंत कवीला आपल्या बायकोला पाहुन सुंदर सुंदर कल्पना सुचत असत. तो आपल्या सामान्य रुप रंग असलेल्या बायकोत मोह घालणारी ‘मोहिनी’ पाहतो. त्याच्या सुंदर सुंदर कविता त्याला राजकवी बनवतात, तो प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचतो. पण त्याचवेळी त्याच्या बायकोला त्याच्या सुंदर कविता वाचून, कोणातरी सुंदरीला पाहूनच या कविता लिहिल्या असव्यात असा संशय येऊन ती त्याला सोडून कायमची माहेरी जाते..
इथे तिच्या विरहाने या कवीचे कविता लिहिणे बंद होते. एकही ओळ त्याला सुचत नसते. राजदरबारात त्याला कविता पेश करण्याची फर्माईश होते. रिकाम्या हाताने रिकाम्या डोक्याने तो राजदरबारात मध्यावर उभा राहतो, वेड्यासारखा डोके हातात धरून. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वहात असतात. सारा दरबार स्तब्ध असतो. पूर्ण शांतता असते. त्या शांततेत त्याला त्याच्या बायकोच्या पैंजणाचा आवाज ऐकू येऊ लागतो. तिला दरबारात आणले गेलेले असते. त्या आवाजाने ती कुठेतरी जवळपास आहे एव्हडे त्याला पुरते.
त्याला पुन्हा स्फूर्ती येते व तो एक सुंदर कविता दरबारात पेश करतो-
” तू छुपी है कहां, मै तडपता यहां.. !”
भारावलेला तो बावरा कवी मूर्च्छित होण्याआधी जाहीरपणे सांगतो की ….
” जमुना तुही है, मेरी मोहिनी.. “
सांगायचे काय तर, त्यांच्या एका साध्या सुध्या बायकोत त्यांना त्यांच्याच चित्रातील सुंदर चेहऱ्याच्या, टपोऱ्या डोळ्यांच्या कमनीय बांध्याच्या, भुरळ घालणारे हास्य असणाऱ्या, ‘ मला बायको हवी तर अशी ‘ अशी तरुण पुरुषांच्या मनाला आस लावणारी स्त्री दिसत होती.
……. ती एका अभिजात कलावंताची अनुभूती होती..
लेखिका – सौ कल्पना मुळगावकर-सबनीस
(रघुवीर मुळगावकर यांच्या कन्या)
प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 9403310170, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈