सौ. सुचित्रा पवार
इंद्रधनुष्य
☆ पानिपत -हृदय द्रावक शोकांतिका – भाग – 1 ☆ सौ. सुचित्रा पवार ☆
(श्री. विश्वास पाटील यांच्या “ पानिपत “ या गाजलेल्या कादंबरीचा परामर्श )
खूप वर्षांपासूनची पानिपत वाचण्याची इच्छा पूर्ण झाली. पण वाचून झाल्यावर मनात एक हुरहूर, एक विव्हळ वेदना अंतर्यामी भरून राहिली. डोळे नकळत पाणावले. पानिपतचा रणसंग्राम,मनुष्यहानी आणि निसटता पराभव पाहून मन हळहळते,व्याकूळ होते आपण स्वतःस माफ करू शकत नाही.
‘मराठ्यांचे पानिपत झालं, विश्वास पानिपत मध्ये गेला”– किती सहजपणे म्हणतो आपण. पण दिल्लीचे तख्त सांभाळायला आणि मराठ्यांचा बिमोड करायला निघालेल्या अब्दाली-नजीबशी कडवी झुंज देऊन उपाशी अनुशी माती, झाडपाला खाऊन, निसर्गाच्या प्रतिकूलतेला टक्कर देत उघड्या मैदानातल्या बोचऱ्या थंडीत कुडकुडत, कुठल्याही क्षणी गिलच्यांचा -वैऱ्याचा हल्ला चढेल ही धाकधूक मनात ठेवून पानिपतच्या समरात जिंकू किंवा मरू म्हणत तळहातावर शीर घेऊन प्राणपणे लढणे आणि अस्मिता, स्वाभिमान जिवंत ठेवून भर उन्हात, आगीच्या लोळात प्राणपणे चिवट झुंज देणे म्हणजे खायचं किंवा तोंडाच्या वाफा दवडण्याइतकं सोपं नाही! केवळ सेनापतीवरील आणि तेही अगदी वसंतातल्या कोवळ्या पानासारखे वय असलेल्या हळव्या पण कणखर मनाच्या भाऊंच्या, ज्यांचे वय फक्त सत्तावीस-अठ्ठावीस (आणि विश्वासरावांचे तर अवघे सतरा-अठराचे ज्या वयात सामान्यजन डोळे मन स्वप्नात रंगतात आणि पहातात आणि त्याच धुंदीत जगतात!) विश्वासाखातर,प्रेमाखातर. मातीच्या,धर्माच्या,मायमराठीच्या अब्रूच्या रक्षणासाठी संकटाला समर्थपणे तोंड द्यायला शरीर आणि मनही तितक्याच चिवट,कडव्या वेगळ्या मातीचे बनलेले असावे लागते.
सैन्य पोटावर चालते हे खरे असले तरीपण आपल्याला एक दिवस उपवास घडला तर जीवाची घालमेल होते, तिथं महिनोंमहिने कधी अर्धपोटी तर कधी उपाशी अन्न पाण्याविना परक्या मुलुखात कोणत्या जाणिवेने तग धरला असेल ? माती खाऊन,पाणी भरून पोटातली आग शमवत कोणत्या ध्येयाने आणि धैर्याने तग धरून राहिले असतील ? उजाड झालेल्या कोणत्या झाडांचा पाला लाखो सैनिकांची भूक भागवत असेल ? आपल्या मातीपासून ,आपल्या मुलखापासून कोसो दूर रहात, तिकडील न काही हालहवाल न काही खबरबात जाणून घेता ,’ भविष्यात आपलं काय होईल?’ याची तमा न बाळगता शत्रूशी दोन हात करायला थांबलेल्या त्या शूर,बाजींद, कडव्या लढवैय्यांच्या कौतुकास शब्द तोकडे आहेत.इथं फक्त त्यांच्या जिगरीला, शौर्याला,संयमाला,अफाट -अमर्याद इच्छाशक्तीला सलाम करणे इतकेच आपल्या हाती आहे;कारण तोफांचे धमधमे बांधण्यापासून तोफगोळे उडवतानाचा जो त्रास आहे तो मेणाच्या किंवा लेच्यापेच्या माणसाला सहन होणे शक्यच नाही.त्यासाठी लोहचणे पचवलेले पोलादी कणखर तन मन हवे.पोटाची भूक माणसाला काहीही करायला लावते-प्रसंगी चोरी,लबाडी, खूनही.मधल्या आधल्या रस्त्याने सैन्य आपल्या घरी परतू शकले असते,बंड करून आम्ही इथून पुढं येणार नाही आपल्या मुलुखात परत जातो म्हणू शकले असते.पण रणांगणातून पळ काढणे किंवा पाठ लावून पळणे हे मर्दाचे,लढवैय्याचे लक्षण नव्हे,आणि भूषण तर नाहीच.अश्याना पळपुटे म्हणून मराठी मातीने हिणवले असते; उलट रणांगणावर मृत्यू येणे हे वीरांचे भूषण आहे म्हणून लाखो जीव आपले प्राण कुर्बान करायला तयार झाले.
‘तुका म्हणे तेथे जातीचे हवे, येऱ्या गबाळ्याचे ते काम नव्हे’ हीच उक्ती इथं चपखल वाटते. वर्षभर तळ ठोकून उपास घडत महिनोंमहिने युद्धाची कोंडी फुटण्याची वाट पहाणारे लाखो लोक दोनच दिवसात मातीत गाडले गेले.महाभयानक न भूतो न भविष्यती नरसंहार ,पशुसंहार , सैनिकांचे आणि पशूंचे देखील हाल पानिपतच्या मातीने प्रथमच पाहिले असावे आणि तिचेही काळीज फाटले असेल, तिच्याही मनाचा थरकाप उडाला असेल. ‘ युद्ध नको मज बुद्ध हवा ‘ असे तीही म्हणली असेल. भौगोलिक परिस्थिती, हवामान, स्थानिक सरदार यापैकी काहीच अनुकूल नसताना फक्त प्रचंड जिद्दीच्या आणि विजयाच्या आशेने धगधगत राहिलेल्या त्या रणकुंडास दुर्दैवाच्या फटकाऱ्याने क्षणार्धात विझवलेच, पण प्रचंड नामुष्की आणि मानहानीही पत्करावी लागली.
क्रमशः……
© सौ.सुचित्रा पवार
तासगाव, सांगली
8055690240
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈