सौ. सुचित्रा पवार

?इंद्रधनुष्य? 

☆ पानिपत -हृदय द्रावक शोकांतिका – भाग – 3 ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

(श्री. विश्वास पाटील यांच्या “ पानिपत “ या गाजलेल्या कादंबरीचा परामर्श ) 

(तेव्हा होळकरांच्याच मेहेरबानीवर पदरी असलेल्या कॅडम्याड पथकाने हुल्लडबाजी केली,  आणि ‘ मराठे हरले,’ असा कांगावा सुरू केला.) इथून पुढे —–

कुणाचा कुणाला मेळ लागेना. आपले कोण आणि परके कोण कळेना. सैन्य बिथरले आणि याच संधीचा गैरफायदा गिलच्यानी उचलला. त्यांच्यात चैतन्य संचारले. गोलाईचा व्यूह मोडू नका, ठरल्याप्रमाणे सर्व होऊ दे, अन्यथा फुकट मनुष्यहानी होईल, म्हणून इब्राहिम गारदी आणि इतरजण ओरडू लागले.  पण अगोदरच भुकेकंगाल आणि मरगळलेल्या सैनिकांना काही सुचत नव्हते. मारू किंवा मरू म्हणत ते बेछूट ,अंदाधुंदीने पुढे सरकून व्यूहातून बाहेर पडले.  यातच विंचूरकर आणि होळकरांसारखे जुने जाणते नेतेही होते. गिलच्यानी सपासप मुडदे पाडायला सुरुवात केली आणि मराठ्यांची दाणादाण उडाली. विश्वासराव आणि यशवंतराव पवारांसारख्या  शूरवीरांची प्राणाहुती पडली. जनकोजीला कैद केले आणि जीव मुठीत धरून सैन्य रणांगण सोडून पळू लागले.  त्यातच होळकर आणि विंचूरकर सुद्धा ! भाऊसाहेबही त्वेषाने लढत होते,पळणाऱ्या सैन्याला कळकळीने आव्हान करत होते.  मात्र कोणी कुणाचे ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. मराठ्यांची अशी दाणादाण दारुण अवस्था बघून गिलच्याना चेव चढला आणि निम्मे अर्धे सैनिक त्यांनी कापून काढले. तोफा,गोळ्या,आरोळ्याने रणांगणाने अक्राळविक्राळ रूप धारण केले. रक्त,मांसाचा चिखल झाला. पानिपत थरारले. दशदिशा भयकंपीत झाल्या. शेवटी भाऊसाहेबही धारातीर्थी पडले आणि उरलेसुरले सैन्यही जिवाच्या आकांताने सैरावैरा पळू लागले. गिलच्यानी त्यांना ताणून मारले. जिवाच्या भयाने रात्री -अपरात्री लपत छपत रस्ता कापणाऱ्या चार दोन टोळक्यांना देखील पाठलाग करून कापून काढले. काही स्त्रियांचे अवघ्या एक दोन रुपयात लिलाव झाले.

महाभारतानंतर प्रचंड भयंकर रणसंग्राम पानिपतचा झाला. महाराष्ट्रातील अठरा पगड जातीतील प्रत्येक उंबऱ्यातील एक एक तरुण पानिपत मध्ये गाडला गेला.

इतके दिवस माती आणि झाडपाला खाऊन विजयाच्या आशेने जिवंत राहिलेले सैन्य अर्ध्या -एक दिवसात खलास झाले. न भूतो न भविष्यती नरसंहार व पशुसंहार झाला. इब्राहिमला हालहाल करून मारले. भाऊसाहेबांच्या मृतदेहाची विटंबना झाली. समशेरबहाद्दर जखमी अवस्थेत बेशुद्ध होऊन रानोमाळ घोडा नेईल तिकडे चालला आणि वाटेतच मरण पावला.

अब्दाली जिंकला तरीही मराठ्यांच्या चिवट झुंजीने आणि पराक्रमाच्या शर्थीने तो आश्चर्यचकित झाला. नजीब आनंदाने बेहोष झाला. मराठे हरूनही जिंकले आणि अब्दाली जिंकूनही हरला. परत कधीच भारतावर आक्रमण करायचे धाडस त्याने केले नाही. वृद्ध जानूने पार्वतीबाईना (भाऊसाहेबांच्या पत्नी) पाठीशी बांधून शत्रूचा डोळा चुकवत महाराष्ट्रात सुखरूप पोहचवले.

पानिपतची माती मराठ्यांची शौर्यगाथा अभिमानाने गाईल. इतिहास होळकर विंचूरकरना माफ करणार नाही.  त्याचबरोबर छोट्या छोट्या चुकाही किती महाभयंकर परिणाम भोगायला लावतात याचे वास्तव हृदयद्रावक उदाहरण पानिपतचा इतिहास सांगेल. इब्राहिम ,समशेरबहाद्दर,जनकोजी शिंदे, विश्वासराव, भाऊसाहेब, यशवंतराव पवार, गंगोबातात्या, यासारख्या तेजस्वी पराक्रमी पुरुषांचे बलिदान इतिहास कधीच विसरणार  नाही.

महाराष्ट्राच्या हृदयात पानिपतच्या प्रचंड जीवितहानीच्या, मानहानीच्या व पराभवाच्या जखमा कायमच भळभळत रहातील.

मराठी माणूस नेहमीच पानिपतचे पारिपत्य आठवून हळहळत राहील आणि मराठयांच्या बलिदानाशी कृतज्ञ राहील. मराठी मातीशी इमान सांगणाऱ्या प्रत्येकाने पानिपतचा इतिहास व शौर्यगाथा मनात जिवंत ठेवायला हवी…

कादंबरीचे नाव :– पानिपत

लेखक:– विश्वास पाटील

राजहंस प्रकाशन,पुणे 

समाप्त 

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments