सुश्री विभावरी कुलकर्णी
🌈 इंद्रधनुष्य 🌈
☆ मोक्ष… ☆ प्रस्तुती – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
आज मी एक गोष्ट सांगणार आहे. गोष्ट म्हटले की कसे सावरून बसतो, कान टवकारून ऐकतो. आणि माहिती, भाषण म्हटले की सतरंजीचे दोरे काढतो. आता सध्याच्या काळात हे दोरे म्हणजे अंगठ्याने भरकन पुढे ढकलणे (सोप्या भाषेत म्हणजे स्क्रोल करणे).
श्रावण महिना सुरु झाला की अनेक सण, उत्सव यांना सुरुवात होते. उपास, व्रतवैकल्ये यांना सुरुवात होते. त्यात श्रावणी सोमवार या दिवसाचे खास महत्व असते. कित्येक मंडळी बाकी काही नाही तरी श्रावणी सोमवार आवर्जून करतात. आपल्याला वाटले असेल मी आता श्रावण महिन्याचे महत्व सांगणार की काय? पण तसे नाही हो! हे सगळे तर सर्वांना माहितच आहे. आणि आपल्या कडे शंकराची मंदिरे पण खूप आहेत.
तर माझे पण असेच होते श्रावण महिना आला की मी पण अत्यंत भाविक होते. आणि कोणत्या शंकर मंदिरात दर्शनासाठी जाता येईल, अशी संधी व मैत्रिणी शोधत असते. मागच्या वर्षी असेच मैत्रिणी मिळून ओतुरच्या कपर्दिकेश्वर येथील मंदिरात दर्शनासाठी जाण्याचे ठरवले. तिथले वैशिष्ठ्य लहानपणी पासून ऐकून होतो. त्या वेळी मोठ्या माणसांच्या बरोबर दर्शन घेतले होते. पण ते नंतर विस्मरणात गेले. म्हणून श्रावणी सोमवारी जाण्याचे ठरवले. जायचे म्हणजे थोडीफार माहिती असावी म्हणून आपल्या गुगल बाबांना विचारले तर त्यांनी सचित्र इतिहास समोर ठेवला की! अगदी नावा पासून माहिती सांगितली.
ऐतिहासिक वारसा असणाऱ्या पुणे जिल्ह्यामध्ये अनेक पुरातन अशी शिवमंदिरे आपल्याला पाहायला मिळतात. त्यातील काही मंदिर ही शेकडो वर्षे जुनी आहेत. त्यातीलच एक शिवमंदिर म्हणजे पुणे शहराच्या उत्तरेला जुन्नर तालुक्यातील ओतूर शहरामधील मांडवी नदीच्या तीरावर असणारे कपर्दिकेश्वर मंदिर आहे. या शिवमंदिराला 900 वर्ष जुना इतिहास आहे. या मंदिरामध्ये श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी या ठिकाणी महादेवाची मोठी यात्रा भरते.
तांदळापासून बनवलेल्या आणि एका लिंबावरती उभ्या असणाऱ्या पिंडी’ हे तेथील वैशिष्ठ्य.
या ठिकाणी शिवलिंगावर कोरड्या तांदळापासून बनवलेल्या आणि एका लिंबावर उभ्या असणाऱ्या तांदळाच्या पिंडी भाविकांचे प्रमुख आकर्षण असते. म्हणूनच या ठिकाणी प्रत्येक श्रावणी सोमवारी जवळपास 1 लाखाहून जास्त भक्त दर्शनासाठी येत असतात. या सोबतच श्रावणी सोमवारच्या यात्रेनिमिताने या ठिकाणी कुस्त्यांचा देखील आनंद आपल्याला घेता येतो. सोबतच मंदिराशेजारीच संत तुकाराम महाराज यांचे गुरु बाबाजी चैतन्य महाराज यांचे समाधी मंदिर आहे. महाराष्ट्रातील प्रमुख तीन संजीवन समाधीपैकी ही एक आहे तसेच जगभर प्रसिद्ध असणाऱ्या ‘राम कृष्ण हरी’ या मंत्राचे हे उगमस्थान आहे.
मंदिराचा इतिहास-
श्री बाबाजी चैतन्य महाराज हे या मांडवी नदी तीरावर अनुष्ठानासाठी बसले असता त्यांनी एक वाळूचे शिवलिंग तयार केले होते. शिवलिंग तयार करताना त्यांना त्या वाळूत एक कवडी मिळून आली त्या कवडीत एक शिवलिंग सापडले. संस्कृतमध्ये कवडीला कपर्दीक असे म्हणतात त्यावरून या शिवलिंगाचे कपर्दीकेश्वर असे नामकरण करण्यात आलं आणि सन 1200 च्या शतकात शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. चंद्राकार मांडवी नदी तीरावर निसर्गरम्य परिसरात हे पुरातन भव्य मंदिर वसलेले आहे. शिवलिंगाच्या स्थापनेपासूनच येथील पुजारी यांनी प्रत्येक वर्षी याच शिवलिंगावर कोरड्या तांदळाच्या पिंडी बांधण्यास सुरुवात केली. ती परंपरा आजही सुरू आहे.
सगळे उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात –
- पवित्र श्रावण महिन्यातील सर्व सोमवार
- महाशिवरात्री
- त्रिपुरारी पौर्णिमा
- मंदिराजवळ असणाऱ्या बाबाजी चैतन्य महाराजांचा समाधी सोहळा.
ज्या ठिकाणी जायचे त्याची माहिती आधीच घ्यावी आणि तिथे जाऊन आल्यावर आपले अनुभव सांगावेत. असे वाटते.
कपर्दिकेश्वर मंदिराची पूर्ण माहिती घेऊन आम्ही श्रावणी सोमवारी सकाळी लवकर ओतूर येथे पोहोचलो. तेथील जत्रा, मंदिर, तांदुळाच्या पिंडी सगळे बघण्याची उत्सुकता होतीच. जत्रा पण खूप लहानपणी बघितली होती. असे वाटत होते, लवकर पोहोचलो आहोत. एक तासात दर्शन घेऊन लगेच परत येता येईल. गाडीत तर हे पण ठरवत होतो की दर्शन घेतल्यावर अजून कुठे जाता येईल? पण प्रथम मोक्ष दात्याच्या दर्शनाची ओढ होती. म्हणून तिथे पोहोचलो.
तेथे गाडी पार्किंग साठी मोठीच व्यवस्था होती. आणि पार्किंग ते मंदिर हे जवळच साधारण दीड ते दोन किलोमीटर होते. आणि त्या दरम्यान सगळी जत्रा! सगळी दुकाने इतकी मोहात पाडणारी होती. विशेषत: स्त्रियांच्या जिव्हाळ्याचे विषय होते. निरनिराळी ज्वेलरी, स्वयंपाकाची विविध भांडी, पिशव्या, हेअर पिन, क्लिप्स अगदी काय बघू आणि काय नको असे झाले होते. विविध खाद्य पदार्थ होतेच. पण अगदी निग्रहाने सगळी कडे मनावर दगड ठेवून दुर्लक्ष केले. एकमेकींचे हात धरुनच जावे लागले. कारण गर्दीच इतकी होती. आणि त्यात एकमेकींना सांगत होतो, प्रथम दर्शन घेऊ आणि येताना खरेदी करु. कारण पुढे काय होते माहितीच नव्हते.
सगळ्या गर्दीतून वाट काढत कसे बसे मंदिरा जवळ पोहोचलो. साधारण आपण मंदिराच्या आत प्रवेश करताच चप्पल काढतो. आम्ही पण काढणार होतो. पण एकूण गर्दी पाहून दर्शन रांग कुठे आहे ते पहावे म्हणून पुढे गेलो. तर काय सांगावे… दर्शना पूर्वीच मंदिराला प्रदक्षिणा घालावी लागली. आणि चप्पल न काढण्याचा शहाणपणाचा निर्णय योग्य ठरला. आणि जागोजागी चप्पल काढा आणि इथे ठेवा असा दुकादारांचा आग्रह टाळला याचेही समाधान वाटले. मंदिराच्या मागच्या बाजूने ३०/४० दगडी पायऱ्या चढून जायचे होते. तेथेही चप्पल कुठे काढावी ही चिंता होतीच. शेवटी माझी नेहमीची युक्ती कामी आली. चप्पल काढून एका पिशवीत ठेवून ती आपल्या जवळच ठेवावी हे सर्वांनाच पटले आणि तसेच केले. त्या मुळे एक चिंता तर मिटली.
इतके गोल फिरून आल्यावर वाटले आता दर्शन होणार! एका छोट्या दरवाज्यातून आत प्रवेश केला. आणि देव किती दूर आहे याची थोडी कल्पना आली. कारण आत बऱ्याच बांबूच्या काठ्या लावून गोल गोल ओळी फिरवल्या होत्या. सगळ्या ओळी फिरत फिरत २/३ तास फिरलो तरी त्या रांगा संपेचनात. आणि पायात काही नसल्याने खडे चांगलेच टोचत होते. थोडे पुढे गेल्यावर त्याचे गुपित कळले. बरीच माणसे त्या बांबूच्या मधून रांगेत मधे मधे शिरत होती. मग आमचा नंबर कसा लागावा? अशा रांगेत फार गमती अनुभवल्या.
त्या रांगेत शेजारी भेटले. जुन्या मैत्रिणी भेटल्या. छोटी मुले तर मस्त इकडून तिकडून फिरण्याचा आनंद घेत होती. काही चतुर महिला आपली छोटी मुले पुढे पाठवून ( बांबूच्या खालून ) त्या मुलाच्या निमित्ताने पुढे पुढे जात होत्या. आमच्या मनात एकच विचार येत होता. मोक्षदात्याच्या दर्शनाला थोडे कष्ट तर होणारच! असे सहज दर्शन होणार नाही. आणि ती मानसिकता असल्या मुळे सगळ्याचा आनंद घेत होतो. त्यात एक सात्विक महिला भेटली. तिथले झाड त्याची महती, दर्शनाने मोक्षप्राप्ती कशी होते. रांगेत मधे शिरू नये. देवाच्या दारी थोडे कष्ट सोसावे. आपल्या शरीराला कष्ट सोसावे लागले, पायाला खडे टोचले, तहान भूक सहन केली तर ते दर्शन मोक्षाप्रद नेते. तिने स्वतः कोणकोणती ठिकाणे किती शारीरिक कष्ट सोसून पहिली व दर्शन घेतले हे अगदी रंगवून रंगवून सांगितले. तिच्या त्या मोक्षाचा रस्ता दाखवण्या मुळे आम्ही फारच भारावून गेलो. आणि आता तिच्या पाया पडावे अशा विचारात होतो. तेवढ्यात आमचे लक्ष विचलित झाले. थोड्या वेळाने आम्ही मोक्ष दर्शनाचा मार्ग दाखवणाऱ्या महिलेला शोधू लागलो. अचानक ती कुठे गेली कळेचना! काही वेळाने ती महिला आम्हाला कष्ट घेऊन केलेल्या दर्शनाने कसा मोक्ष मिळतो हे पटवून स्वतः मात्र बांबूच्या मधून सगळ्या रांगा ओलांडून ७/८ रांगा पुढे मोक्षदात्याच्या दर्शनाला बरीच पुढे निघून गेली होती.
बऱ्याच रांगा ओलांडल्यावर, बरेच खडे पायात टोचवून घेतल्यानंतर त्या मोक्षदात्याच्या समोर दर्शनाला उभे राहिलो. आणि तो सोहळा, त्या जगप्रसिद्ध तांदुळाच्या पिंडी बघून ४/५ तासाच्या सर्व कष्टाचे सार्थक झाले.
इतके तास तिथे उभे राहिल्या नंतर ती जत्रा, खरेदी सगळे दुर्लक्षित झाले. त्यात एक बरे होते, आपण रस्ता चुकू अशी शक्यता व चालण्याचे कष्ट नव्हते. कारण गर्दीच आम्हाला ढकलून ते काम करत होती. आपण फक्त एकमेकींचे हात धरून उभे राहायचे. पार्किंग पर्यंत गर्दीने आपोआप आणून सोडले. आणि इतके तास झाल्या नंतर इतर ठिकाणी जाण्याचा प्रश्नच नव्हता.
असे मोक्षदात्याचे दर्शन व ती छोटी सहल अगदी अविस्मरणीय झाली.
© सुश्री विभावरी कुलकर्णी
सांगवी, पुणे
मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈