श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ सैनिकांसाठी श्वास… ध्यास आमुचा ! – भाग-१ ☆ श्री संभाजी बबन गायके 

सैनिकांसाठी श्वास… ध्यास आमुचा !

… अर्थात गिरीशिखरांच्या भाळी श्वासगंध रेखताना…! 

श्री. योगेश चिथडे आणि सौ. सुमेधा चिथडे यांनी सियाचीन मधील सैनिकांसाठी ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारून देण्यासाठी केलेल्या भगीरथ प्रयत्नांची कहाणी!

सियाचीन या जगातील सर्वाधिक उंचावर असलेल्या युद्धभूमीमध्ये आणि लगतच्या शेकडो किलोमीटर्स परिसरात श्वास दुर्लभ आहे. सपाटीवर मुबलकतेचा अंगरखा पांघरून वा-यासवे पिंगा घालणारा प्राणवायू शिखरावर चढता-चढता अगदी मलूल झालेला असतो. खोल डोहात बुडी मारून तळावर पहुडलेला एखादा शिंपला वर आणावा तसा प्रत्येक श्वास सैनिकांना आसमंतातून कुडीत ओढून घ्यावा लागतो…. शिंपल्यातून मोती मिळवावा तसा! 

सैनिक देहाच्या माळावर श्वासांचं शिंपण करतात ते सीमांचं रक्षण करण्यासाठी…. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत! ह्या श्वासांचं आयुष्य वाढवायला हवं हा विचार छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास स्वामी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांचा पुण्य-प्रभाव असलेल्या एका सहृदय दांमप्त्याच्या हृदयावर कोरला गेला तो परमवीर चक्र विजेते ऑनररी कॅप्टन श्री. बानासिंग यांच्या एका वाक्यामुळे!

श्री. योगेशजी चिथडे भारतीय हवाई दलातून निवृत्त झाल्यानंतर बँकिंग क्षेत्रात तर सौ. सुमेधाताई चिथडे या त्यांच्या सहधर्मचारीणी पुणे शहरात शिक्षिका म्हणून कार्यरत. चिथडे दांम्पत्याचे एकुलते एक चिरंजीव देशाच्या सीमेवर भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत. प्रवाहपतिताप्रमाणे जीवन जगणे योगेशजींना आणि सुमेधाताईंना पसंत नाही. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांचे ‘देहातून देवाकडे जाताना वाटेत देश लागतो आणि आपण या देशाचे काही देणे लागतो’ हे सुमेधाताईंच्या मनात रूजलेले वाक्य! अंगावर लष्करी गणवेश नसला तरी देशसेवा बजावता येते हे सुमेधाताईंनी योगेशरावांच्या साथीने अंगिकारलेल्या कार्यातून दाखवून दिले. हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांचे, वीरपत्नींचे अश्रू पुसण्याचा वसा या दोघांनी घेतला आणि प्रत्यक्षात गावा-गावात जाऊन काम सुरू केले. सणावाराला या वीरपत्नींना, वीरमातांना आपल्या घरी माहेरपणाला आणणे, त्यांच्या घरी सणासुदीचे खाद्यपदार्थ पोहोचवणे, आर्थिक नियोजन करण्यात जमेल ते मार्गदर्शन करणे इत्यादी कार्य हे दांमप्त्य केवळ स्वबळावर आणि स्वयंस्फूर्तीने करीत होतेच. यानिमित्ताने त्यांचा सैनिकीसेवेमधील अनेकांशी निकटचा संबंध आला. शूरवीरांचा सन्मान करण्याच्या अशाच एका उपक्रमात परमवीर चक्र विजेते ऑनररी कॅपन बानासिंग साहेब यांचे चिथडे कुटुंबात येणे झाले आणि ‘आम्ही सैनिकांसाठी आणखी काय करू शकतो?’ या सुमेधाताईंच्या प्रश्नावर बानासिंग साहेबांनी उत्तर दिले होते… जवानों की सांसों के लिए कुछ कर सकते है तो किजिए…. सैनिकांच्या श्वासांसाठी काही करता आले तर करा!” 

ह्या एका वाक्याने चिथडे पती-पत्नींना एक वेगळीच दिशा दाखवली. त्यांनी तत्परतेने या दिशेला आपला मोर्चा वळवला. सियाचीन आणि आसपासचा परिसर ऑक्सिजनच्या कमतरतेसाठी कुप्रसिद्ध आहे. सीमांचे रक्षण करण्यासाठी भारतीय सैन्याला सियाचीन आणि परिसरात मोठ्या प्रमाणात जवान तैनात ठेवावे लागतातच. एका आकडेवारीनुसार सियाचीन या जगातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या युद्धभूमीवर आणि परिसरात आज पर्यंत सुमारे अकराशे सैनिक देशरक्षणाच्या कर्तव्यावर असताना हुतात्मा झालेले असून यातील सर्वाधिक बळी हिमप्रपात, हिमस्खलन आणि विशेषत: श्वसनासंबंधींच्या आजारांनी घेतलेले आहेत! म्हणजे येथील सर्वांत मोठा शत्रू म्हणजे हवामान… इथल्या वातावरणातील ऑक्सिजनचा कमालीचा तुटवडा आणि जीवघेणी थंडी! 

High Altitude Pulmonary Oedema, Acute Mountain Sickness, Frost Bite Chilblains, Hypothermia, Snow Blindness हे सियाचीन मध्ये तैनात सैनिकांना आणि परिसरातील नागरीकांना भेडसावणारे जीवघेणे आजार. या आजारांवरील सर्वांत महत्त्वाचा उपचार म्हणजे रूग्णाला कृत्रिम ऑक्सिजन देणे! 

सियाचीन जवळ परतापूर येथे भारतीय लष्कराचे विशेष रूग्णालय कार्यरत आहे… याला सार्थ नाव आहे… Siachen Healer… to heal म्हणजे बरे करणे! या रूग्णालयात केवळ सैनिकच नव्हेत तर आसपासचे नागरीक, पर्यटक, गिर्यारोहक यांनाही आरोग्यसेवा पुरविल्या जातात. इतर ठिकाणांहून ऑक्सिजनचा पुरवठा नियमितपणे करणे सियाचीनमधील लहरी हवामानामुळे कठीण असते. म्हणून या ठिकाणी कृत्रिमरित्या ऑक्सिजन निर्मितीची गरज असते आणि तशी सुविधाही भारतीय लष्कराने उपलब्ध करून दिली आहे. बाणासिंग साहेबांच्या सोबत झालेल्या संभाषणातून ह्या यंत्रणेला अत्याधुनिकतेची जोड देण्याची गरज आहे हे चिथडे दांम्पत्याने ओळखले आणि चिकित्सक अभ्यास सुरू केला. १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात भारतीय सैन्याने मोठा पराक्रम गाजवला होता, पाकिस्तानच्या ९३ हजार सैनिकांना दाती तृण धरून शरण येण्यास भाग पाडले होते. या अलौकीक पराक्रमाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष जवळ येऊन ठेपले होते. यानिमित्त भारतीय सैनिकांना अभिवादन म्हणून भारतीय जनतेच्या स्वयंस्फूर्त आर्थिक सहभागातून ‘ऑक्सिजन निर्मितीचा अत्याधुनिक, सुसज्ज प्लांट भेट म्हणून देण्याची कल्पना श्री. योगेश चिथडे आणि सौ. सुमेधाताई योगेश चिथडे यांना सुचली! ही एक खरोखर अभूतपूर्व कल्पना होती! सरकार, सैन्य तर आपल्या सैनिकांच्या कल्याणाची तजवीज कायमच करीत असते, पण नागरीकांचाही यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग महत्त्वाचा असतो. देश आपल्यासाठी काय करतो, यापेक्षा आपण देशासाठी काय करतो असा प्रश्न प्रत्येकाला खरा तर पडलाच पाहिजे!

 खरं तर हे काम म्हणजे स्वर्गातून गंगा पृथ्वीवर आणण्यासारखे मोठे काम होते. भरपूर संशोधन केल्यानंतर चिथडे साहेबांनी जर्मनीतील एक कंपनी ऑक्सिजन यंत्रणा पुरवू शकेल हे शोधून काढले. पण ही यंत्रणा विकत घेणे, वाहतूक करणे, यंत्रणा प्रत्यक्ष कार्यांन्वयित करणे यासाठी सुमारे अडीच कोटी इतका मोठा खर्च येणार हेही दिसले! शिवाय विविध प्रशासकीय परवानग्या मिळवणे, विविध यंत्रणांशी संपर्क साधणे, त्यांना योजना समजावणे इत्यादी आव्हाने तर होतीच. पण चिथडे पती-पत्नींनी हे शिवधनुष्य स्वत: पुढाकार घेऊन पेलण्याचा प्रण केला! पैशांचं सोंग आणणे अशक्यच असते. देशप्रेमी लोकांकडून आर्थिक सहाय्य मिळवणे हा एकमेव मार्ग होता. गरज अडीच कोटी रूपयांची होती! सुमेधाताईंनी आपल्या अंगावर असलेले सुवर्णालंकार विकले आणि त्यातून आलेले एक लाख पंचवीस हजार आठशे पंधरा रूपये ‘सिर्फ’ मध्ये जमा केले आणि ऑक्सिजन प्लांट साठी निधी संकलनाच्या कार्याचा सुवर्ण-शुभारंभ केला! ‘सिर्फ’ म्हणजे आकड्यांनंतर लिहिला जाणारा ‘फक्त’ या अर्थाचा शब्द नव्हे! योगेशराव आणि सुमेधाताई खूप आधी पासूनच सैनिकांसाठी, वीरपत्नींसाठी, त्यांच्या मुलांसाठी, वीरमाता-पित्यांसाठी अगदी ग्रामीण भागात जाऊन काम केलेले आहे! त्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन ‘Soldiers’ Independent Rehabilitation Foundation(SIRF) अर्थात ‘सिर्फ’ ही सामाजिक संस्था स्थापन केली आहे. आधी केले आणि मग सांगितले या उक्तीनुसार कार्यास सुरूवात केल्यामुळे योगेशराव आणि सुमेधाताईंना या अभूतपूर्व उपक्रमासाठी निधी देण्याचे आवाहन इतरांना करण्याचे नैतिक बळ प्राप्त झाले. योगेशजी आणि सुमेधाजी आपापल्या नोक-या सांभाळून निधी-संकलनाच्या कार्याला लागले. सियाचीनची, तिथल्या भौगोलीक, हवामान-विषयक, आरोग्यविषयक बाबींची माहिती मिळवली, मूळ समस्या, तिच्यावरील उपाय याचा सविस्तर विचार केला. यावर आधारीत पीपीटी प्रेझेंटेशन तयार केले आणि संपूर्ण महाराष्ट्रभरातील हजारो लोकांना दाखवले आणि सैनिकांच्या श्वासांसाठी सामान्य जनतेच्या भावनांना साद घातली. निधी-संकलनाच्या यानिमित्ताने चिथडे पती-पत्नींना आलेल्या ब-या-वाईट अनुभवांचे तर एक पुस्तकच तयार होईल! वृद्धाश्रमात राहणारी आणि तिच्या लेकाने खाऊसाठी दिलेले वीस रूपये सैनिकांसाठी देणारी एक माता, माझा वर्षभराचा पगार घ्या असे म्हणणारी एक मोलकरीण भगिनी, बोहनी झालेली नसतानाही गल्ल्यातील एकावन्न रूपये काढून देणारा गरीब भाजी विक्रेता, आमच्या काही महिन्यांच्या पेन्शनची रक्कम या कार्यासाठी घ्या असे म्हणणा-या वीरपत्नी, आपले खाऊचे पैसे देणारी एक आठ-नऊ वर्षांची बालिका असे ‘नाही रे’ गटातील एका बाजूला आणि ‘आहे रे’ गटातील काही कंजुष श्रीमंत एका बाजूला! आपल्या विचाराच्या प्रचारासाठी सुमेधाताईंनी तेरा दिवस तेरा घरांमध्ये जाऊन प्रबोधन करण्याचे व्रतही पार पाडले! योगेशजींच्या समवेत चार हजारांहून अधिक कुटुंबांशी, अनेक संस्था, व्यक्ती यांचेशी संपर्क साधला. स्वत:चे वैय्यक्तिक आयुष्य, सणसमारंभ, कौटुंबिक समारंभ दूर ठेवले. तरीही पुरेशी रक्कम जमा होत नाहीये असे पाहून स्वत:चे राहते घरही विकण्याची तयारी केली. पण सत्य संकल्पाचा दाता नारायण या उक्तीनुसार जनता-जनार्दनाने मदतीचे अनेक हात पुढे केले. आणि अथक प्रयत्नांतून आवश्यक रक्कम उभी राहिली.

– क्रमशः भाग पहिला.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments