श्री सुनील देशपांडे
इंद्रधनुष्य
☆ डोळ्यासंबंधी बरंच काही ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆
(25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर यादरम्यान आपल्या देशामध्ये नेत्रदान पंधरवडा पाळला जातो यानिमित्ताने नेत्रदान व डोळ्याचे आरोग्य याविषयी हा लेख अवश्य वाचा)
नेत्र, ज्याला आपण मराठीमध्ये डोळे म्हणतो हिंदीमध्ये आँख म्हणतो इंग्लिश मध्ये EYE म्हणतो संस्कृतमध्ये नेत्र किंवा चक्षू म्हणतो तेच ते डोळे.
शरीराचा प्रत्येक अवयव महत्वाचा आहे, पण डोळ्यांशिवाय माणूस नुसता अपूर्णच नाही तर शून्यवत होऊन जातो. डोळ्यां विना अस्तित्व या गोष्टीची कल्पना सुद्धा ज्यांना डोळे आहेत त्यांना करता येत नाही.
डोळ्याच्या बाहेरील भागात एक पारदर्शक पडदा असतो. त्यातून प्रकाश किरण आपल्या डोळ्यात शिरतात. या पडद्याला नेत्रपटल किंवा पारपटल तर इंग्लिश मध्ये व तांत्रिक भाषेत ‘कॉर्निया’ ( CORNEA ) असं म्हणतात. आपण सोयीसाठी कॉर्निया हाच शब्द वापरू. काही कारणामुळे जेव्हा कॉर्नियाचा पारदर्शकपणा नाहीसा होऊन तो पांढरट होतो, धुरकट होतो त्यावेळी डोळ्यातून प्रकाश किरण आत जाऊ शकत नाहीत. त्यामुळे माणूस दृष्टिहीन बनतो. आंधळा म्हणण्यापेक्षा दृष्टिहीन म्हणणं हे जास्त योग्य. कारण कॉर्निया बदलल्या नंतर तो परत डोळस होऊ शकतो. पण हा कॉर्निया बदलायचा कसा ?
इसवी सन १९०५ पर्यंत याबाबतीत कुणी कल्पनाही करू शकलं नव्हतं.
सन १९०५ मध्ये झेक रिपब्लिक या देशात एडवर्ड जर्म व रॅमन कॅस्ट्रोविजो या दोघांनी जगातली पहिली नेत्र प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी रीतीने पार पाडली. त्यानंतर अंधांना दृष्टी देण्यासाठी एक उत्तम पर्याय उपलब्ध झाला. परंतु दुर्दैवाने याबाबतची जनजागृती आज शंभर पेक्षाही जास्त वर्षे झाली तरी अपेक्षित प्रकारे झाली नाही. जनप्रबोधन ही प्रक्रिया अत्यंत धीम्या गतीने जाणारी आहे. परंतु गेल्या पंधरा वीस वर्षांमध्ये याला चांगली गती प्राप्त झाली आहे. सध्या अनेक मध्यम शहरांमध्ये सुद्धा नेत्रपेढ्या आहेत. त्यामुळे इच्छुकांचे नेत्रदान करणे सध्या सहज शक्य आहे. बहुतेक कोणत्याही गावापासून काही तासांच्या अंतरावर नेत्रपेढीची उपलब्धता असल्यामुळे तीन चार तासांमध्ये किंवा त्यापेक्षा कमी वेळात नेत्रपेढी ची टीम मृतदेहापर्यंत पोहोचू शकते आणि यशस्वीपणे कॉर्निया काढून घेता येतात. मृत्यूनंतर साधारणपणे सहा तासांच्या आत कॉर्निया काढून घेणे आवश्यक असते. म्हणजे ते चांगल्या स्थितीमध्ये राहू शकतात व त्याचे प्रत्यारोपण यशस्वीपणे करणे शक्य होते.
ज्यांना आपल्या घरी मृत झालेल्या नातेवाईकाच्या नेत्रांचे दान करायचे असेल त्यांनी काही गोष्टी करणे गरजेचे आहे. सर्वप्रथम ज्याचा मृत्यू झाला आहे आणि नेत्र काढून घ्यायचे आहेत अशा व्यक्तीचे स्थानिक डॉक्टर ने दिलेले मृत्यूचे वैद्यकीय प्रमाणपत्र त्वरित मिळवणे आवश्यक आहे, ज्यामध्ये मृत्यूचे कारण व वेळ नमूद केलेली असली पाहिजे. त्यानंतर त्वरित जवळच्या नेत्रपेढी ला फोन करावा, म्हणजे नेत्रपेढी ची टीम योग्य त्या वेळेत मृतदेहा पर्यंत पोहोचू शकेल. देह जमिनीवर झोपलेल्या स्थितीत असावा, पापण्या उघड्या असतील तर त्या बंद कराव्यात. डोक्याखाली उशी द्यावी ज्यायोगे डोके शरीरापासून साधारण सहा इंच वरच्या स्तरावर राहील. त्यानंतर डोळ्यावर ओल्या पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. पंखा चालू असेल तर तो बंद करावा. वातानुकूलन (A. C. ) चालू असेल तर मात्र ते चालूच ठेवावे. नेत्रपेढी ची टीम येईपर्यंत वरचेवर पाण्याच्या पट्ट्या बदलाव्यात. कॉर्निया सुकणार नाहीत याची काळजी घ्यावी.
नेत्र प्रत्यारोपण करीत असताना जमलेल्या व्यक्तींना बाहेर जाण्यास सांगावे. ज्यांना ते पाहता येणे असह्य होणार नाही अशा एखाद दुसऱ्या व्यक्तीला तेथे राहण्यास हरकत नाही. ही प्रक्रिया साधारणपणे अर्ध्या तासात पार पडते. ही टीम आल्यानंतर त्यांच्यासाठी कोमट पाणी आणि हात धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था आणि एकदे डस्टबिन जवळ असू द्यावे.
फक्त बुडून मृत्यू झाला असेल तर त्या मृतदेहाचे डोळे उपयोगी पडत नाहीत.
कॉर्नियामध्ये रक्तवाहिन्या नसतात त्यामुळे रक्तगट जुळण्याचा प्रश्न नसतो.. कोणाचाही कॉर्निया कोणालाही बसवता येतो. परंतु काही विशिष्ट संसर्गजन्य रोगग्रस्तांचे कॉर्निया बसवता येत नाही. उदाहरणार्थ कावीळ, एड्स, कॅन्सर आणि शरीरभर पसरलेले सेप्टिक अशा अनेक संसर्गजन्य रोगांमुळे मृत्यू झालेली व्यक्ती बाधित असेल तर अशा व्यक्तीच्या डोळ्यापासून ज्याला डोळे बसविले जातील त्याला त्या संसर्गाचा धोका असतो. म्हणून अशा रोगांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तीचे नेत्रदान होऊ शकत नाही. नेत्र काढून घेतल्यानंतर मृतदेहातून थोडासा रक्ताचा नमुना काढून घेण्याची पद्धत असते, ज्यायोगे मृत शरीरामध्ये यापैकी कोणती लक्षणे नाहीत ना याची चाचणी करता येते. कोणत्याही वयाची व्यक्ती नेत्रदान करू शकते. परंतु कधीकधी अति वयस्कर व्यक्तींचे नेत्र रोपणाच्या उपयोगाचे नसू शकतात. अशा वेळेला अशा नेत्रांचा उपयोग मात्र संशोधनासाठी होऊ शकतो. त्यामुळे प्रत्यारोपणासाठी योग्य नसतील तर नेत्रदान करू नये अशा पद्धतीचा विचार मृत व्यक्तीचे नातेवाईक करतात. हे ही योग्य नाही. कारण संशोधन ही सुद्धा गरजेची गोष्ट आहे. संशोधनामुळे काय फायदा होतो याचं एक उदाहरण देता येईल. नेत्रा वरील संशोधनामध्ये अलीकडे असे आढळून आले आहे की कॉर्निया मध्ये दोन थर असतात. त्यामुळे एका कॉर्नियाचे दोन कॉर्नियामध्ये रूपांतर करता येते. त्यामुळे एका मृत व्यक्तीच्या नेत्रदानामुळे पूर्वी दोन व्यक्तींना दृष्टी मिळू शकत होती पण आता चार व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. याचा अर्थ नेत्रदानाची गरज निम्म्यावर आली आहे. त्यापुढेही या विषयावर संशोधन झाले आहे आणि आता अजून क्रांतिकारी संशोधन येण्याची शक्यता आहे. हा संशोधनाचा किती मोठा फायदा आहे ? त्यामुळे जरी प्रत्यारोपणासाठी नेत्र उपयुक्त नसतील तरी नातेवाइकांनी संशोधनासाठी असे नेत्र वापरण्याचा आग्रह धरून नेत्रदान नक्की करावे. डोळ्याची संरचना ही सगळ्यात गुंतागुंतीची आहे. मेंदूच्या रचने नंतर दुसरा नंबर डोळ्याच्या रचनेचा लागतो. डोळ्यावर खूप मोठे संशोधन करणे आवश्यक आहे. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी परवानगी दिल्यास संपूर्ण डोळा म्हणजेच आयबॉल सुद्धा काढून घेऊन जाता येतो. ज्यांना शक्य आहे त्यांनी संपूर्ण डोळा काढून घेण्याची परवानगी दिल्यास संशोधनासाठी आणि नेत्र प्रत्यारोपण प्रशिक्षणासाठी सुद्धा संपूर्ण डोळा म्हणजेच आयबॉल याची आवश्यकता असते. अजूनही रेटिना च्या अंधत्वावर उपाय सापडलेला नाही. ज्यावेळेस संपूर्ण डोळा म्हणजेच आयबॉल काढून घेतला जातो त्यावेळेस त्या खोबणी मध्ये दुसरा कृत्रिम आयबॉल बसवला जातो, आणी पापण्या बंद केल्या जातात. त्यामुळे चेहऱ्यावर कोणतीही भेसूरता किंवा विद्रूपपणा येत नाही. म्हणूनच संशोधनाच्या उपयुक्तते साठी संपूर्ण डोळा सुद्धा द्यावा अशी शिफारस करण्यास हरकत नाही. जगातील एकूण अंध व्यक्तींपैकी 25% अंध व्यक्ती भारतामध्ये आहेत. २०१८ च्या आकडेवारीनुसार भारतामध्ये एकूण ५२ लाख अंध व्यक्ती होत्या. (आणि दरवर्षी त्यात सूमारे ३५ हजार नवीन अंधांची भर पडतेच आहे. ) त्यातील ४६ लाख अंध व्यक्ती कॉर्निया मुळे अंध झालेल्या आढळल्या. त्यांचे अंधत्व नेत्रदानाने नक्कीच दूर होऊ शकते. परंतु दुर्दैवाने आपल्या देशात वर्षभरात साधारणपणे १० ते १५ हजार व्यक्तींचेच नेत्रदान होते.
नेत्र रोपण शस्त्रक्रिया ही अनेक वर्षांच्या यशस्वीतेने आणि अनुभवाने सिद्ध झालेली शस्त्रक्रिया आहे. या शस्त्रक्रियांचा यशस्वीतेचा दर हा 90 टक्के आहे. त्यामुळे बहुतेक सर्व नेत्रदाने, यशस्वीरित्या इतरांना दृष्टी देण्यासाठी रोपण करता येतात.
नेत्रदानाचा संकल्प करणे म्हणजे नेत्रदानाच्या संकल्पपत्रावर सही करणे एवढाच अर्थ घेतला जातो. परंतु ही प्रक्रिया अपुरी आहे. नेत्रदान यशस्वी व्हायचे असेल तर संकल्प पत्रावर सही केल्यानंतर किंवा संकल्प पत्र न भरता सुद्धा आपण आपल्या मनात निश्चय केल्यानंतर आपल्या जवळच्या नातेवाईकांना, आपल्या वारसदारांना या गोष्टीबाबत पूर्णपणाने सजग करणे आवश्यक आहे. त्यांना नेत्रदानाची संपूर्ण माहिती देणे ही गरजेची गोष्ट आहे. त्यांचे संपूर्ण समाधान झाल्यानंतर, आपल्या मृत्यूनंतर नेत्रदान झाले पाहिजे याची जबाबदारी तुमची आहे आहे याची त्यांना जाणीव करून दिल्यानंतरच, नेत्रदान यशस्वी होण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. त्यामुळे संकल्पपत्र भरण्या बरोबरच आपल्या कुटुंबातल्या सर्व व्यक्तींना याबद्दल माहिती देणे आणि त्यांना त्यासाठी तयार करणे हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे.
आपल्या देशात नेत्रदानाचा संकल्प करणाऱ्या एकूण व्यक्तींपैकी फक्त एक टक्के व्यक्तींचेच प्रत्यक्ष नेत्रदान होते. याचाच अर्थ संकल्पपत्र भरणे या कृती पेक्षा प्रत्यक्ष नेत्रदान घडवून आणण्यासाठी कुटुंबातल्या लोकांना जागृत करणे हीच सगळ्यात महत्वाची व आवश्यक गोष्ट आहे.
कोणत्याही वयाची व्यक्ती नेत्रदान करु शकते. कुठल्याही प्रकारचा डोळ्याचा नंबर असेल किंवा मोतीबिंदू वा काचबिंदू शस्त्रक्रिया झाली असेल किंवा मधुमेह आणि रक्तदाब असेल अशी कोणतीही व्यक्ती मृत्यूनंतर नेत्रदान नक्कीच करू शकते. अपघातात व्यक्ती मृत झाली असेल तर स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांच्या परवानगीने कायदेशीरपणे नेत्रदान होऊ शकते, ते पोस्टमॉर्टेम करण्यापूर्वी करता येते. ज्यांचे कॉर्निया चांगले आहेत परंतु इतर काही दोषांमुळे ज्यांना अंधत्व आले आहे अशा अंध व्यक्ती सुद्धा नेत्रदान करु शकतात. जवळच्या नेत्रपेढीचे क्रमांक आपल्या घरात कॅलेंडरवर किंवा कुठेतरी लिहून ठेवणे आवश्यक आहे. या बाबतीत आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतीच्या व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेर तसेच बॅंका, पोस्ट ऑफिस वगैरे ठिकाणी खाजगी हॉस्पिटलच्या बाहेरच्या बाजूस जवळच्या नेत्र बँकेचे फोन नंबर एका बोर्डवर लिहून ठेवणे आवश्यक आहे. तसे झाल्यास नेत्रपेढीचा क्रमांक शोधण्यासाठी कोणाला ऐनवेळी धावपळ करायला लागणार नाही.
तसेच राष्ट्रीय क्रमांक १९१९ हा टोल फ्री क्रमांक असून या क्रमांकावर फोन केल्यास आणि आपले ठिकाण सांगितल्यास त्यांचेकडून आपल्या जवळच्या नेत्र बँकेचा क्रमांक आपल्याला उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे ऐन वेळेस नेत्र बँकेचा नंबर शोधण्याची धावपळ करावी लागणार नाही. नेत्रदान केल्यानंतर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना ते डोळे कुणाला बसले आहेत हे कधीही सांगितले जात नाही परंतु त्या डोळ्यांचा उपयोग रोपणासाठी झाला आहे किंवा नाही एवढीच माहिती मिळू शकते.
प्रत्येक व्यक्तीने जिवंतपणी आपल्या डोळ्याची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे, ज्यायोगे मृत्यूनंतर आपले डोळे एखाद्या नेत्रहीनाला उपयोगी पडतील.
डोळ्याचे महत्त्वाचे भाग म्हणजे बाहेरील भागात पारपटल म्हणजेच कॉर्निया (पारपटल) त्यानंतर नेत्रमणी म्हणजेच लेन्स, त्यानंतर महत्त्वाचा भाग हा नेत्रपटल म्हणजेच रेटिना. नेत्रमणी व नेत्रपटल याच्यामध्ये एक द्रवपदार्थ असतो. या द्रवपदार्थाचा दाब योग्य तऱ्हेने नियंत्रित केला गेलेला असतो. परंतु काही कारणामुळे तो दाब जर वाढला तर डोळ्याचे विकार होतात. त्यामुळे मुख्यत्वे काचबिंदू हा विकार उद्भवू शकतो. आजकाल मधुमेहाच्या रुग्णांमध्ये काचबिंदूचे प्रमाण जास्त आढळते. त्यासाठी तरुणांनी वर्षदोनवर्षातून एकदा आणि पन्नाशीनंतर दर सहा महिन्यातून एकदा डोळ्यांची संपूर्ण तपासणी करून घेणे आवश्यक आहे. म्हणजेच योग्य वेळेस जर एखाद्या व्याधीचे निदान झाले तर त्यावर उपचार करून त्या व्याधींपासून मुक्तता मिळू शकते. प्रत्येक जिवंत व्यक्तीने स्वतःच्या डोळ्यांची योग्य ती काळजी अवश्य घेतली पाहिजे.
नेत्रदानच नव्हे तर एकूणच अवयवदाना याविषयी विविध धर्मांचा विरोध नसल्याबद्दलचा उहापोह अवयवदान आणि धर्म याविषयीच्या लेखामध्ये मी केला आहे. त्यामुळे कोणत्याही धर्माचा विरोध नेत्रदानाला नाहीच हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळे नेत्रदान हे एक पवित्र आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे या भावनेने प्रत्येकाने नेत्रदानाचा संकल्प केला पाहिजे. नेत्रदान हे एक मानवतेचे कार्य आणि राष्ट्रकर्तव्य आहे.
© श्री सुनील देशपांडे
पाषाण, पुणे मो – 9657709640 ईमेल : [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈