श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ प्रेमाचे अपार आभाळ ☆ श्री संभाजी बबन गायके 

दोन न्यायाधीशांसमोर ‘त्यांची’ सुनावणी सुरू होती! दोन्ही न्यायाधीशांनी एकमुखाने एक आदेश सुनावला…. यावर ‘ त्यांनी’ मोठ्या अदबीने म्हणलं, ” Yes, your honour!…. आपल्या आदेशाचे पालन केले जाईल!”

आणि या निर्णयावर शिक्कामोर्तब म्हणून त्या दोन्ही न्यायाधीशांनी मोठ्या प्रेमाने ‘त्यांचे’ हात हातात घेतले… लहान मुले आई- बाबांकडून एखादी गोष्ट कबूल करून घेताना करतात त्यासारखे! ‘त्यांनी’ही ह्या दोन्ही न्यायाधीशांना लवून नमस्कार केला! 

“ठरलं… यापुढे मी पूर्णपणे शाकाहारी राहीन!”

यावर दोन्ही न्यायाधीश गोड हसले.. आणि खटला निकाली निघाला! न्यायाधीश महोदयांच्या आई या खटल्यात साक्षीदार होत्या… त्या आपल्या या लेकींकडे कौतुकाने पहात होत्या.. किती तरी वेळ!

देशाच्या आदरणीय सरन्यायाधीश महोदयांच्या अर्थात चीफ जस्टिस ऑफ इंडिया (Chief Justice of India) श्री. धनंजय यशवंत चंद्रचूड यांच्या निवासस्थानी हा खटला चालला…. आणि न्यायाधीश होत्या कुमारी प्रियांका धनंजय चंद्रचूड आणि कुमारी माही धनंजय चंद्रचूड! साहेबांनी आपल्या हाताशी आणि हक्काचे दोन मोठे वकील, ॲडव्होकेट अभिनव धनंजय चंद्रचूड आणि ॲडव्होकेट चिंतन धनंजय चंद्रचूड, असतानाही त्यांच्याकडे आपले वकीलपत्र दिले नव्हते… कारण त्या घरात प्रियांका आणि माही यांचाच कायदा चालतो!

अलाहाबाद उच्च न्यायालयात कार्यरत असताना, २०१५ मध्ये चंद्रचूड साहेबांनी प्रियांका आणि माही या ‘ विशेष क्षमता ‘ असलेल्या मुलींना दत्तक घेतले.

वडिलांच्या पावलांवर पावले टाकीत न्याय क्षेत्रात नाव कमावलेली आपली दोन मुले अभिनव आणि चिंतन यांना धनंजय साहेबांच्या सोबतीला ठेवून सौ. रश्मी धनंजय चंद्रचूड २००७ मध्ये हे जग सोडून गेल्या… कर्करोगाचे निमित्त झाले!

यानंतर काही वर्षांनी साहेबांनी त्यांच्या क्षेत्रातील वकील कल्पना दास यांचेशी विवाह केला. कल्पना यांनीही प्रियांका आणि माही यांचे मातृत्व मोठ्या प्रेमाने स्वीकारले!

वडील सरन्यायाधीश, आई आणि दोन भाऊ मोठे वकील अशा चतु:स्तंभी न्यायमंदिरात या कन्यका आनंदाने, सुरक्षित रहात आहेत!

 या दोघींनी आपल्या बाबांना एक प्रेमाचा आदेश दिला…. “शाकाहारी व्हा! क्रूरतारहित आहार आयुष्याचा अंगीकार करा!” हुकूम सरआँखो पर… म्हणत गेल्या सहा महिन्यांपासून चंद्रचूड साहेब कसोशीने शाकाहारी झाले आहेत… आणि आयुष्यभर शाकाहारी (vegan) राहणार असल्याचं वचन त्यांनी आपल्या या लाडक्या लेकींना दिले आहे!

साहेब आणि कल्पना मॅडम यांनी रेशमी कपडे, वस्तू, प्राण्यांच्या कातडी पासून बनवण्यात आलेल्या वस्तू इत्यादी विकत घेणे पूर्णतः बंद केले आहे! आणि साहेबांनी मांसाहार पूर्णतः वर्ज्य केला आहे! 

५ ऑगस्ट रोजी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात मा. सरन्यायाधीश महोदयांनी ही बाब उघड केली.

काही दिवसांपूर्वी धनंजय महोदयांनी प्रियांका आणि माही यांच्या आग्रहाखातर त्या दोघींना आपले कार्यालय दाखवायला आणले होते.. अर्थात सर्व नियमांचे पालन करूनच! आपले वडील एवढ्या मोठ्या कार्यालयात काम करतात याचा त्यांच्या निष्पाप चेहऱ्यांवरचा आनंद अवर्णनीय होता! धनंजय साहेबांना सारा देश your honour म्हणून संबोधित असताना आपल्या या लेकींचा honour साहेबांनी अगदी कसोशीने जपला आहे. त्यांच्या पालनपोषण, शिक्षणात कोणतीही कसर ठेवली नाही आजवर!

सर्वाधिक काळ देशाच्या सरन्यायाधीशपदी कार्यरत राहिलेले महान न्यायाधीश यशवंत चंद्रचूड साहेब यांच्या पोटी धनंजय साहेब जन्मले. वकील झाल्यावरही त्यांच्या वडिलांनी त्यांना वकिली व्यवसाय करू दिला नाही…. न्यायदानात पारदर्शकता रहावी म्हणून! मी देशाच्या सर न्यायाधीशपदी असेतो तुला वकिली करता येणार नाही, ही त्यांची अट होती! नंतर धनंजय साहेबांनीही ‘सवाई’ कारकीर्द केल्याचे जाणकार जाणतात! नोव्हेंबर २०२४ मध्ये साहेबांचा कार्यकाळ संपेल. त्यांनी कार्यकाळात निर्भिडपणे घेतलेले अनेक निर्णय जनतेच्या न्यायालयात नावाजले गेले आहेत. पदामुळे व्यक्तीला श्रेष्ठत्व प्राप्त होते हे जगरीतीस धरून आहेच.. परंतु व्यक्तीमुळे पदाला आणखी प्रतिष्ठा प्राप्त होते, हे धनंजय साहेबांच्या कर्तृत्वावरून सहजी ध्यानात यावे, असेच आहे! मानवी मूल्यांची स्वतःच्या वर्तनातून सकारात्मक जपणूक करण्याच्या वृत्तीची माणसे देशाला लाभली आहेत… त्यांचा आदर्श पुढीलांनी घ्यावा असा आहेच! 

सरन्यायाधीश माननीय श्री. धनंजय चंद्रचूड साहेबांना आणि त्यांच्या पत्नी सौ. कल्पना यांना आदरपूर्वक नमस्कार आणि साहेबांनी केलेल्या देशसेवेबद्दल आभार! Thank you, your honour!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments