? इंद्रधनुष्य ?

‘मोक्षपट‘ —  माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

संत ज्ञानेश्वरांचे विचार आणि तत्त्वज्ञान जसे कालातीत आहेत, तसे त्यांनी लावलेला एक शोधही अजरामर आहे, तो म्हणजे सापशिडीचा खेळ ! या खेळाची निर्मिती संत ज्ञानेश्वरमाऊली यांनी केली आहे, असे सांगितल्यास विश्वास बसणार नाही; पण हे सत्य आहे. त्यामुळे त्यांनी निर्माण केलेल्या या खेळाविषयी जाणून घेऊया.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सापशिडीचे गुपित ‘डेन्मार्क’चे जेकॉब आणि पुणे येथील ज्येष्ठ संशोधक वा. ल. मंजुळ यांनी उलगडले..

संत ज्ञानेश्वर महाराजांनीच सापशिडीचा शोध लावला, याचे स्पष्ट पुरावे मिळत नव्हते; पण ‘डेन्मार्क’ देशातील जेकॉब यांच्या साहाय्याने काही वर्षांपूर्वी हे गुपित उलगडले गेले. ‘इंडियन कल्चरल ट्रॅडिशन’ या संकल्पनेच्या अंतर्गत डेन्मार्क येथील ‘डॅनिश रॉयल सेंटर’चे संचालक डॉ. एरिक सँड यांचे विद्यार्थी असलेल्या जेकॉब यांनी ‘मध्ययुगीन काळात भारतात खेळले जाणारे खेळ’, हा विषय संशोधनासाठी निवडला. या संशोधनाच्या वेळी त्यांच्या असे लक्षात आले की, १३ व्या शतकातील संत ज्ञानेश्वर महाराज यांनी सापशिडीचा शोध लावलेला असू शकतो.

जेकॉब यांनी अनेक जुने सापशिडीचे पट त्यांनी मिळवले; परंतु योग्य संदर्भ मिळत नव्हते. संत ज्ञानेश्वरांच्या चरित्रातही याविषयी कुठे उल्लेख नव्हता. अखेर संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक वा. ल. मंजुळ यांच्याकडे त्यांनी विचारणा केली. मंजुळ यांनी पुणे येथील डेक्कन महाविद्यालयामध्ये तशा प्रकारचा संदर्भ असल्याचे सांगितले आणि ‘मोक्षपट’ उलगडा गेला.

मनुष्याने आयुष्य कसे जगावे, याचे तत्त्वज्ञान सांगणारा सापशिडी खेळ!

‘मोक्षपट’ हा पहिला सापशिडीपट होता, असे सांगितले जाते. संत ज्ञानेश्वर आणि संत निवृत्तीनाथ भिक्षा मागण्यासाठी गावात जात असत. घरात एकट्या असलेल्या संत सोपानदेव आणि संत मुक्ताई यांचे मन रमावे; म्हणून संत ज्ञानेश्वर आणि संत निवृत्तीनाथ यांनी या खेळाचा शोध लावला, असे सांगितले जाते. लहान मुलांना खेळाच्या माध्यमातून चांगले संस्कार मिळावेत, असा, यामागील उद्देश होता.

मोक्षपटाचे दोन्ही पट २० X २० इंच आकाराचे असून त्यात ५० चौकोनी घरे आहेत. पहिले घर जन्माचे, तर शेवटचे घर मोक्षाचे आहे. माणसाच्या जन्मापासून त्याला मोक्ष मिळेपर्यंतचा प्रवास या पटामधून मांडण्यात आला आहे. ‘मोक्षपट’ खेळण्यासाठी सापशिडीप्रमाणेच ६ कवड्यांचा वापर करावा लागतो. ६ कवड्या पूर्ण पालथ्या पडल्या, तर दान मिळते. सापशिडीच्या खेळाप्रमाणेच यातही साप आहेत. त्यांना काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षडरिपूंची नावे देण्यात आली आहेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रगती करण्यासाठी शिडी आहे. तिला सत्संग, दया, सद्बुद्धी अशी नावे देण्यात आली आहेत. माणसाने आयुष्य कशा प्रकारे जगावे, याचे तत्त्वज्ञान या खेळातून सांगण्यात आले आहे.

जेकॉब यांना डेक्कन महाविद्यालयामध्ये रा. चिं. ढेरे यांच्या हस्तलिखित संग्रहातून दोन ‘मोक्षपट’ मिळाले.

मोक्षपटाच्या हस्तलिखितावर लिहिलेल्या ओव्यांमध्ये आयुष्य कसे जगावे ? कोणती कवडी पडली की, काय करावे ? याचे मार्गदर्शन अगदी सहजपणे सांगण्यात आले आहे. सापशिडी जरी अधुनिक असली, तरी गर्भितार्थ तोच राहील, यात काही शंका नाही.

इंग्रजांनी सापशिडी हा खेळ नेऊन त्याचे ‘स्नेक अँड लॅडर’ असे नामकरण करणे ‘व्हिज्युअल फॅक्टफाईंडर-हिस्ट्री टाइमलाईन’ या पुस्तकात वर्ष ११९९ ते १२०९ या कालखंडातील जगातील महत्त्वाच्या घडामोडींविषयी माहिती दिली आहे. ‘उल्लेखनीय गोष्ट’ या शीर्षकाखाली ‘१३ व्या शतकातील भारतीय कवी संत ज्ञानदेव यांनी कवड्या आणि फासे यांचा उपयोग करून एक खेळ सिद्ध केला. यात खेळाडू शिडीचा उपयोग करून वर चढणार आणि सापाच्या तोंडी आल्यावर खाली उतरणार. शिडीच्या साहाय्याने वर चढणे हे चांगले समजले जाई, तर सर्पदंश ही अनिष्ट गोष्ट समजली जात असे. हा खेळ ‘सापशिडी’ या नावाने अद्यापही लोकप्रिय आहे’, असा उल्लेख सापडतो.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमाऊली, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि संत मुक्ताई ही सर्व भावंडे हा खेळ खेळत असत. पुढे भारतभर या खेळाचा प्रसार झाला. इंग्रज भारतात आल्यावर त्यांना हा खेळ प्रचंड आवडला. बुद्धीबळ, ल्युडोप्रमाणे ते हा खेळही इंग्लंडमध्ये घेऊन गेले, असे म्हटले जाते. व्हिक्टोरिया राणीच्या म्हणण्याप्रमाणे त्यात काही पालट करण्यात आले आणि त्याचे ‘स्नेक अँड लॅडर’ असे नव्याने नामकरण करण्यात आले. सध्या आपण त्यांच्या पद्धतीने सापशिडी खेळत असलो, तरी त्याची मूळ संकल्पना भारतीय आहे आणि संत ज्ञानेश्वरमाऊली हेच या खेळाचे जनक आहेत. ’

माहिती संकलक : अज्ञात 

प्रस्तुती : सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments