श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ नियतीने खास निवडलेला.. मुस्तफा ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
‘सगळ्या जगापेक्षा तब्बल नऊ महिने आधी त्याची आणि माझी ओळख झाली पण भेट मात्र नऊ महिन्यांनीच झाली. त्याआधी त्याचा आणि माझा संवाद व्ह यचा तो आंतरिक स्पर्शामधून. तो पोटात असताना मला झोके घ्यायला आवडू लागलं होतं. घराचे नको नको म्हणताना मी एखादा तरी झोका घ्यायचीच आणि मग यांनी घरातच छानसा झोपाळा आणून बांधला… बसा माय लेक झुलत. आणि एकेदिवशी म्हणजे १४ मे १९९५ रोजी तो आला! गोंडस.. गोड आणि लाघवी रुपडं घेऊन. सर्वांनीच म्हटलं… मुस्तफा नाव ठेवा. मुस्तफा म्हणजे खास… विशेष… अगणित लोकांमधून निवडला गेलेला! आणि होताही तसाच मुस्तफा. अभ्यासात हुशार आणि खेळांत चपळ. खेळण्यांमध्ये हेलिकॉप्टर जास्त आवडीचं होतं मुस्ताफाचं. आमच्या घरावरून लढाऊ विमानं वेगाने निघून जायची… पण हेलिकॉप्टर आलं की मुस्तफा चपलाईने घराच्या छपरावर जायचा आणि ते नजरेआड होईतोवर त्याकडे पहात राहायचा. त्याचे अब्बू गल्फमध्ये नोकरीला गेले तर याने सुट्टीवर येताना हेलिकॉप्टरच आणा असा हट्ट धरला होता! काय होतं पोराच्या मनात तेव्हा समजलं नाही. तसं आमच्यातलं तोवर कुणीही फौजेत गेलेलं मला तरी माहीत नव्हतं. आणि तो असं काही करेल असं स्वप्नातही आलं नव्हतं कधी आम्हा नवरा बायकोच्या. त्याचे बाबा झकिउद्दीन दूर आखातात नोकरी करायचे आणि मुस्तफा बहुदा तिकडेच गेला असता नोकरी किंवा व्यवसायासाठी. पण वृत्तीने अतिशय धार्मिक होता. त्यामुळे तिकडेही वळायची शक्यता होतीच. मला काहीही चालणार होतं. त्याच्यानंतर झालेली आलेफिया.. तिचं लग्न करून दिलं की मुस्ताफाच्या डोक्यावर सेहरा बांधला की आम्ही दोघं म्हातारा-म्हातारी मोकळे होणार होतो!
राजस्थानातील उदयपूर जवळचं खेरोडा हे अगदी लहान गाव. पण मुस्ताफाची हुशारी पाहून आम्ही उदयपूर मध्ये राहयाला गेलो. मुस्तफा तिथल्या सेंट पॉल कॉलेजात जायला लागला. कधी त्याने एन. डी. ए. ची प्रवेश परीक्षा दिली, कधी पास झाला ते समजेपर्यंत बेटा खडकवासल्याला निघूनही गेला होता. तिथं आपल्यातलं कुणी नसेल ना रे? मी काळजीने म्हणाले होते.. त्यावर म्हणाला…. अम्मी… याह इंडियन आर्मी है… यहां सिर्फ एक धरम… देश और एक जात… फौजी! तुम देखना इतनी इज्जत कमाउंगा की जितनी कोई दुसरी नौकरी नहीं दे सकती! त्याची पत्रं यायची आणि कधी कधी फोनवर बोलणं व्हायचं. म्हणायचा…. जीवनात एक ध्येय सापडल्या सारखं वाटतं आहे… अम्मी!
पासिंग आऊट परेडला आम्ही तिघेही गेलो होतो… मी, हे आणि धाकटी आलेफिया. तो पूर्ण गणवेशात समोर आला तेंव्हा झालेला आनंद अवर्णनीय असाच होता. त्याच्या मित्रांनी जेव्हा त्याला त्यांच्या खांद्यांवर उचलून घेतलं होतं तेंव्हा तर भारी वाटलं होतं. मुस्तफा एअर विंग निवडणार हे तर स्वच्छ होतं… त्याला आकाशात भरारी घ्यायला आवडू लागलं होतं… आंता त्याच्या हाती ख-याखु-या हेलिकॉप्टरची कमान असणार होती आणि तेही साधंसुधं प्रवासी हेलिकॉप्टर नव्हे… चक्क लढाऊ हेलिकॉप्टर!
दोनच वर्षात तो फायटर पायलट म्हणून तरबेज झाला. त्याचे त्या युनिफॉर्ममधले फोटो पाहून डोळ्यांवर विश्वासच बसायचा नाही… एवढंसं होतं पोरगं… त्याचे हात चक्क आभाळाला टेकू लागलेत की! एखाद्या मिशनवर निघाला की फक्त त्याच्या अब्बुला कळवायचा… मला नाही! मी खूप जास्त काळजी करते अशी त्याची तक्रार असायची. दिवस निघून चालले… आता सूनबाई आणावी हे बरे. ठरवून टाकलं लग्न…. दोन तीन महिन्यांत बार उडवून द्यायचा होता.
दोन दिवस झाले… भूक लागत नव्हती… आणि डोळ्यांतून अश्रू वाहायला लागले आपोआप. का अस्म व्हावं? तसं काही कारणही नव्हतं. ना कुठली लढाई चालू होती ना मुस्तफा कुठे मोहिमेवर निघाला होता. चीनच्या सीमेवर तैनात होता हे माहीत होतं… पण तिथं तर त्याचं काम सैनिकांना मदत करणं होतं… त्यासाठी कितीही उड्डाणे करायला तो सदैव असायचा… वजनाला हलके पण अत्यंत शक्तिशाली हेलिकॉप्टर त्याच्या हातातलं जणू आवडीचं खेळणं बनलं होतं. नंतर समजलं… त्याने त्यादिवशी मोहिमेवर जाण्याआधी त्याच्या अब्बुला फोनवरून कल्पना दिली होती. फक्त मोहीम काय आहे… हे नव्हतं सांगितलं.. नियमानुसार. फक्त म्हणाला जवळचा मित्र आहे सोबत…. मेजर विकास भांबु नावाचा. कामगिरी फत्ते करून हे दोघे आणि आणखी तीन सहकारी माघारी निघाले होते. अरुणाचल प्रदेशातील अपर सियांग येथील मिमिंग गावावर ते उडत होते… आणि अचानक त्याच्या हेलिकॉप्टरला मागील बाजूस आग लागली… ते वेगाने जमिनीकडे झेपावू लागले. खाली मोकळे मैदान दिसत होते… तिथे उतरणे सोपे होते… पण खाली आजूबाजूला लोकवस्ती होती आणि मुख्य म्हणजे तिथेच लष्कराचा दारूगोळा साठवण्याची जागा होती. हेलिकॉप्टर नियंत्रणात नव्हतं फारसं… काहीच सेकंद होते निर्णय घ्यायला… मेजर भांबु आणि मेजर मुस्तफा यांनी निर्णय घेतला… गावापासून दूर जायचं हे जळतं कफन घेऊन.. भले आपण जाळून जाऊ पण गाव आणि दारूगोळा वाचला पाहिजे. बलिदानाला काही प्रत्येक वेळी युद्धच असावं असं कुठं काय असतं? सैनिक म्हणजे प्रत्येक क्षण युद्धाचा प्रसंग. त्यांनी जवळच्या जंगलाच्या दिशेने आपले हेलिकॉप्टर वळवले… आणि व्हायचे तेच झाले… काही क्षणांमध्ये दाट झाडीत ते कोसळले…. सर्वजण मृत्यूच्या खाईत कोसळले…. मुस्तफाही त्यात होता! दैवाने या बलिदानासाठी त्याचीच निवड केली होती… नावासारखाच मुस्तफा… खास निवडला गेलेला… the chosen one!
दोन दिवसांपूर्वी डोळ्यांतून विनाकारण वाहू लागलेल्या आसवांचा अर्थ त्यादिवशी ध्यानात आला! मुस्तफा कदाचित आणखी एका मोहिमेवर निघून गेला असावा… अशी मनाची समजूत काढत दिवस ढकलते आहे. पोरं आईपासून कधीच दूर जात नाहीत…. नदी सागराला जाउन मिळाली तरी उगमापासून तिचे पाणी तुटत नाही. हुतात्मे अमर असतात.. असे ऐकले होते… मुस्तफाही असाच अमर आहे… तो जवळ असल्याचा भास होतो… भास नव्हे… तो जवळच असतो नेहमी!
तो दिवाळीचा दिवस होता. पण त्या रात्री एक दिवा नाही लावला गेला की एक फटाका नाही वाजला. चुली बंद होत्या… सा-या शहराने, गावाने मुस्तफाच्या देहावर एक एक मूठ माती घातली…. या मातीचे ऋण फेडून तो कायमचा मातीत मिसळायला निघाला होता! आता मी आणि माझे पती एका सामान्य मुलाचे नव्हे तर एका हुतात्मा सैनिकाचे आईबाबा झालो होतो… राष्ट्रपती महोदया सुद्धा आम्हांला सन्मानित करताना गहिवरल्या होत्या… मुस्तफाच्या नावाचे मरणोत्तर शौर्य चक्र स्वीकारताना दोन भावना होत्या…. गमावल्याची आणि कमावल्याची! मुलगा गमावला आणि अभिमान कमावला! आणि हा अभिमान उरी बाळगून उरलेलं आयुष्य काढायचं आहे! मुस्तफा.. अलविदा… बेटा ! ‘
(२१ ऑक्टोबर, २०२२ रोजी मेजर मुस्तफा बोहरा, मेजर विकास भांबु क्रू मेंबर्स हवालदार बिरेश सिन्हा, नाईक रोहिताश्व कुमार आणि क्राफ्टसमन के. व्ही. अश्विन यांनी एका हवाई मोहिमेत आपल्या प्राणांचे बलिदान दिले. मेजर मुस्तफा बोहरा साहेबांच्या मातोश्री श्रीमती फातिमा बोहरा यांनी मोठ्या धैर्याने या दु:खाला तोंड दिले. १५ ऑगस्ट, २०२३ रोजी मा. राष्ट्रपती महोदयांनी दिवंगत मेजर मुस्तफा बोहरा यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर केले. त्यांच्या सोबत असलेले मेजर विकास भांबु यांनाही मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर झाले. मेजर भांबु हे सुद्धा राजस्थानचे सुपुत्र होते आणि याआधीही सेना मेडलने त्यांना गौरवण्यात आलेले होते. दिनांक ८ ऑगस्ट, २०२४ रोजी हा शौर्य चक्र प्रदान करणयाचा कार्यक्रम झाला. यानंतर झालेल्या मुलाखती मध्ये श्रीमती फातिमा बोहरा यांनी मोठ्या शौर्याने आपल्या लेकाच्या आठवणी सांगितल्या… त्या आणि तशा अनेक मुलाखती, बातम्या, विडीओस वर आधारीत हा लेख आहे… फातिमा यांच्या भूमिकेत जाऊन लिहिलेला.. जय हिंद… जय हिंद की सेना !🇮🇳)
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈