इंद्रधनुष्य
☆ ‘पुना गेम’ म्हणजेच आजचे जगप्रसिद्ध ‘बॅडमिंटन’…!!! 🏸 – लेखक श्री अनुराग वैद्य ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
‘बॅडमिंटन’ हा आज जगप्रसिद्ध खेळ आहे. जगभरात हा ‘बॅडमिंटन’ खेळ खूप मोठ्या प्रमाणात खेळला जातो. अगदी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये भारतातील प्रत्येक गल्लीमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तसेच निवांत वेळेत ‘बॅडमिंटन’ लोकं रात्री खेळताना आपल्याला बघायला मिळतात. परंतु ‘बॅडमिंटन’ या खेळाची जन्मभूमी कोणती हे फारसे लोकांना माहिती नसते किंवा काळाच्या ओघात लोकं या ‘बॅडमिंटन’ खेळाला परदेशी खेळ समजून मोकळे होतात.
परंतु या ‘बॅडमिंटन’ खेळाचा जन्म हा बाहेरच्या देशातील नव्हे तर ‘बॅडमिंटन’ या खेळाचा जन्म हा ‘पुण्यामध्ये’ झालेला आहे. तसे म्हणायला गेले तर ‘बॅडमिंटन’ हा खेळ ‘पुणेरी’ खेळ आहे. इंग्रजांची सत्ता पुण्यामध्ये स्थापन झाल्यानंतर ‘पुणे’ परिसरामध्ये ‘खडकी’ येथे इंग्रजांची कायमस्वरूपाची छावणी होती. पुण्यातील खडकी येथे ‘ऑल सेंट्स चर्च’ आहे. या ‘ऑल सेंट्स चर्च’ च्या ईशान्य दिशेला ‘फ्रियर रोड’ आहे या ‘फ्रियर’ रस्त्याच्या जागेवर पूर्वी एक मोकळी बखळ होती. हीच बखळ किंवा सध्याचा ‘फ्रियर रोड’ आजच्या जगप्रसिद्ध ‘बॅडमिंटन’ खेळाची जन्मभूमी.
‘खडकी’ येथील छावणीमध्ये इंग्रज सैनिक त्यांना ज्यावेळेस कामामधून निवांत वेळ मिळत असे तेव्हा छावणी मधील सध्याच्या ‘फ्रियर रोड’ येथील मोकळ्या जागेमध्ये दोघे जण किंवा दोन जोड्या एकमेकांच्या समोर उभे राहून वल्ह्याच्या आकाराच्या फळ्या बनवुन ‘बुचाची वर्तुळाकार चकती’ बऱ्याचवेळेस यामध्ये दारूच्या बाटलीचे बुच असायचे. हे हवेत उडवून टोलवून खेळत असे. ही ‘बुचाची चकती’ खाली पडू न देता टोलविणे एवढाच या खेळाचा भाग होता.
जेव्हा ही ‘बुचाची चकती’ वल्ह्यासारख्या फळीने हवेमध्ये उडवून मारली जात असे तेव्हा ही ‘बुचाची चकती’ हवेमध्ये स्पष्ट दिसावी यासाठी स्वतः खाऊन फस्त केलेल्या ‘कोंबड्यांची पिसे’ या ‘बुचाच्या चकतीला’ चिकटवित असत किंवा खोचून ठेवीत असत. या ‘पिसे’ लावलेल्या ‘बुचाच्या चकतीला’ गंमत म्हणून इंग्रज अधिकारी ‘बर्ड’ असे संबोधत असत. तसेच हा हवेमध्ये उडणारा ‘पक्षी’ सतत इकडून तिकडे फिरत असे म्हणून म्हणून त्याला ‘येरझारा करणारा कोंबडा’ किंवा ‘शटल कॉक’ असे म्हणत असे. अश्या प्रकारे ‘बॅडमिंटन’ या खेळाचा जन्म झाला त्याला इंग्रजांनी ‘पुना गेम’ असे नाव दिले.
इ. स १८७० साली काही इंग्रज सैनिक हे जेव्हा आपल्या घरी म्हणजेच ‘इंग्लड’ येथे जाण्यास निघाले तेव्हा मायदेशी जाणाऱ्या या इंग्रज सैनिकांनी ‘बॅडमिंटन’ या खेळाचे साहित्य म्हणजे खास ‘पुणेरी शैलीने’ बनवलेले ‘शटल कॉक’ म्हणजेच मराठी मधला ‘येरझारा करणारा कोंबडा’ आपल्या सोबत ‘इंग्लंड’ येथे घेऊन गेले. संपूर्ण भारतामधून पहिले विदेशात गेलेले ‘क्रीडासाहित्य’ हे पुण्यामधून गेले होते हे विशेष. तसेच भारतीय ‘क्रीडा साहीत्याची’ ही पहिली ‘निर्यात’ होती.
पुणेरी शैलीमध्ये’ बनवलेले ‘शटल कॉक’ हे ‘इंग्लंड’ मध्ये पोहोचले आणि तेथील सैनिकांमध्ये हा ‘पुना गेम’ अधिकाधिक प्रसिद्ध होऊ लागला. तेव्हा ह्या ‘पुना गेम’ बाबत ‘ग्लुस्टरशायर’ या परगण्यात राहणाऱ्या ‘ड्युक ऑफ न्यू फोर्ट’ हा राजघराण्याशी संबंधित असलेला ‘उमराव’ याच्यापर्यंत ह्या ‘पुना गेम’ बाबत बातमी जाऊन पोहोचली. हा ‘उमराव’ क्रीडाप्रेमी होता तसेच हा ‘उमराव’ सतत नवीन क्रीडाप्रकारांच्या शोधात असे.
त्याच्या कानावर जेव्हा ‘पुना गेम’ बद्दल माहिती पोहीचली तेव्हा ज्या इंग्रज सैनिकांना ‘पुना गेम’ बद्दल माहिती होती तेव्हा त्या ‘ग्लुस्टरशायर’ येथील राजघराण्याशी संबंधित ‘उमरावाने’ ‘पुना गेम’ माहिती असलेल्या इंग्रज सैनिकांना आपल्या राहत्या घरी बोलवून घेतले. ‘पुना गेम’ माहिती असलेले इंग्रज सैनिक ‘पुना गेम’ कसा खेळायचा याचे प्रात्यक्षिक दाखवायला ‘ग्लुस्टरशायर’ येथे पोहोचले आणि त्यांनी राजघराण्याशी संबंधित असलेल्या ‘उमरावाला’ आणि आमंत्रित लोकांना जेव्हा ‘पुना गेम’ इतका आवडला की त्याचे सगळ्या ‘इंग्लंड’ देशामध्ये फार कौतुक झाले आणि संपुर्ण ‘इंग्लंड’ देशामध्ये हा खेळ खेळला जाऊ लागला.
तसेच या ‘पुना गेम’ बद्दल कसे खेळतात याची प्रात्यक्षिके दाखवली गेली ते ठिकाण म्हणजे ‘ड्युक ऑफ न्यू फोर्ट’ यांचे ‘बॅडमिंटन’ गाव. इंग्लंडमधील ‘बॅडमिंटन’ गावी इंग्रजांनी ‘पुना गेम’ ह्या खेळाचे प्रात्यक्षिक दाखवले गेले म्हणून तेथील लोकांनी या ‘पुना गेम’ या खेळाचे नाव ‘गेम ऑफ बॅडमिंटन’ असे केले. यामुळे पुण्यामध्ये जन्मलेल्या ‘पुना गेम’ हे नाव इंग्रजांनी पुसून टाकले.
परंतु काही वर्षांमध्ये ‘ईस्ट इंडिया कंपनी’ सोबत येणाऱ्या अधिकाऱ्यांनी हा ‘पुना गेम’ म्हणजेच ‘बॅडमिंटन’ इ. स. १८७७ च्या सुमारास इंग्लंड येथून परत भारतामध्ये आणला आणि या ‘पुना गेम’ म्हणजेच आत्ताचे ‘बॅडमिंटन’ या खेळाचे नियम तत्कालीन भारतामधील ‘कराची’ सध्याचे (पाकिस्तान) येथे या ‘पुना गेम’ उर्फ ‘बॅडमिंटन’ खेळाची नियमावली पुस्तिका बनवली गेली. आजपर्यंत या ‘पुना गेम’ म्हणजेच ‘बॅडमिंटन’ याच्या नियमावलीमध्ये फारच थोडे बदल करण्यात आलेले आहेत.
असा हा पुण्यातील ‘खडकी’ येथे जन्म झालेला ‘पुना गेम’ आज जगभर ‘बॅडमिंटन’ या नावाने प्रसिद्ध आहे. परंतु आपल्या भारतामध्ये आणि तो देखील पुण्यामध्ये जन्म घेतलेला ‘पुना गेम’ आपण आजही विदेशी खेळ म्हणून गणला जातो. असा हा पुण्यात जन्माला आलेला ‘पुना गेम’ म्हणजेच ‘बॅडमिंटन’ हा खेळ पुण्याने जगाला दिलेली एक देणगी आहे हे नक्की.
संदर्भग्रंथ:-
१. क्रीडा ज्ञानकोश:- सुरेशचंद्र नाडकर्णी
२. A Journey To The Badminton World:- Zuyan Wang.
३. शहर पुणे एका सांस्कृतिक संचिताचा मागोवा:- सुरेशचंद्र नाडकर्णी, संपादक अरुण टिकेकर, निळूभाऊ लिमये फाउंडेशन, २०००
☆
लेखक : श्री अनुराग वैद्य.
प्रस्तुती : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈