श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ “ढोलपथक आणि ती…” – लेखिका : सुश्री सोनाली सुळे ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे 

सणसणीत लाथ हाणली त्याने पोटात. ती भेलकांडली. जीवघेणी कळ उठली. कशीबशी उठली ती. सारी रात्र अशीच तळमळत काढली. सकाळ झाली तसे मनाचे तुकडे अन् दुखणारे शरीर घेऊन कामाला लागली. एक यंत्र बनून गेली होती ती. सहन करायचं फक्त. कधीकधी तोंडातून शब्द निघाला तर अधिकचा मार ठरलेला. त्याला हवी असायची फक्त दारू. अन् हिनेच कमवायचं, राबायचं, घर चालवायचं, घरकामही करायचं. त्याची नोकर बनून सेवा करायची. त्याची प्रत्येक अवास्तव अपेक्षा पूर्ण करायची.

सहा महिने झाले होते फक्त लग्नाला. नोकरी करणारा, शहरात राहणारा नवरा मिळाला म्हणून लगेच होकार दिला तिने. पण महिनाभरात सारं चित्र पालटलं. त्याचं खरं रुप दिसू लागलं. फसवणूक झाली हे कळायला वेळ नाही लागला तिला. परतीचा रस्ताही बंद होता. माहेरी कुणीच नव्हतं. पळून जाणं किंवा सहन करणं, दोनच पर्याय होते. पहिल्यांदा तो दारू पिऊन आला तेव्हा कडाक्याचं भांडण झालं. रात्रभर रडत राहीली. सकाळी हिच्याकडे न पाहताच तो बाहेर पडला. शेजारीण चहा चपाती घेऊन आली.

“तिसरं लग्न आहे हे त्याचं…. ” बोलता बोलता तिने सांगितलं. तिला धक्काच बसला. ” पाहिल्या बायकोने जाळून घेतलं. दुसरी पळून गेली. तू तिसरी. “तिला रडू फुटलं.” असं रडून काय होणार, लढायला शिक. मी जिथे काम करते तिथे लावून घेते तुला. बोलू का मॅनेजरशी सांग. ” तिने लगेच हो म्हटलं. त्यालाही बरच होतं. फुकट पैसा मिळतोय, नाही कशाला म्हणणार? 

कष्ट दुपटीने वाढले होते तिचे. पण जगायला कारण सापडलं होतं. तो सुधारणार नव्हताच. आणि तिलाही जायला ठिकाण नव्हतं. घुसमट होत होती. मन मारुन जगू म्हटलं तरी त्यानं केलेला अपमान, खाल्लेला मार आठवून तिच्या जीवाचा संताप होत असे. एकदा कामावरून निघताना तिला ढोल ताशे ऐकू आले. मग रोजच ऐकू येऊ लागले. तिनं त्याबद्दल शेजारणीला विचारलं. ” हे होय? अगं गणपती जवळ आलेत ना. ढोल ताशा पथकात प्रॅक्टिस सुरु असते रोज. ” तिला नवल वाटलं. ” कोण कोण असतं तिकडे?”

” कोणीही जाऊ शकतं. अगदी तू सुद्धा. ” तिचे डोळे विस्फारले, ” खरच?” 

” खोटं का सांगु? अगं आउटलेट असते ती. कामाचा ताण, घरचा ताण सगळं विसरून मस्त ढोल वाजवतात. छान वाटतं. ” 

दुसऱ्याच दिवशी तिनं ढोल ताशा पथकात नाव नोंदवलं. सकाळीच जास्तीचा स्वयंपाक करून घेत असे ती. तो संध्याकाळी बराच उशीरा येई. ते पण तर्र होऊन. कामावरून परस्पर पथकात जाई ती.

” दम असला पाहिजे ताई वाजवण्यात. जोर लावून वाजव. “

शिकवणारा तिला म्हणत असे. ती आणखी मनापासून वाजवण्याचा प्रयत्न करत असे. त्यादिवशी ढोल वाजवता वाजवता वेळ कसा निघून गेला तिला कळलच नाही. घरी जायला उशीरच झाला होता. नेमका तो तिच्या आधी घरी पोचला. आधीच प्यायलेला, त्यातून ही उशीरा पोचली. त्यानं पट्टा काढला तिच्यावर उगारला. तिनं हिंमत करून तो वरच्यावर झेलला. त्याच पट्ट्याने त्याला झोडपून काढला. उचलला आणि कॉलर धरून फरफटत पोलीस स्टेशनला नेला. सगळी वस्ती बघतच राहीली. पोलिसांनी त्याला लॉक अप मध्ये टाकलं.

आज तिला वाजवताना बघून सगळे थक्क झाले होते. इतक्या दिवसांत साचलेला राग, तडफड सगळी बोटातून बाहेर पडत होती. शिकवणारा दादा तिच्याकडे बघतच राहिला!

लेखिका : सुश्री सोनाली सुळे

प्रस्तुती : श्री सुनील देशपांडे 

पाषाण, पुणे  मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments