श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

समुद्राशी झुंजलेला ‘स्वर्गीय’ जल-सैनिक ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

पंचमहाभूतांपैकी पाणी आणि त्यातून सागराचे पाणी हे प्रचंड शक्तिशाली असते. सागराची भव्यता, त्यात उठणारी वादळे, महाकाय लाटा यांच्याशी मानवाला सामना करता येणे अतिशय कठीण. पण आपल्या सीमांचे रक्षण कायचे असेल तर जमीन, आकाश आणि जल आणि हल्ली अवकाश या चारही ठिकाणी सैनिकांना सज्ज ठेवावे लागते. आपल्याकडे युद्धनौका तर आहेतच पण आपल्या पाणबुड्या आणि त्यातील सैनिक हे जगातल्या नौसैनिकांतले उत्तम नौसैनिक म्हणून गणले जातात. पण पायदळ आणि वायुदल यांमधील सैनिकांच्या शौर्यकथा सामान्य जनतेला ब-यापैकी ठाऊक असतात, पण पाण्यात राहून शत्रूची वैर करणा-या आणि त्या शत्रूंना रोखून धारणा-या नौसैनिक, नाविक अधिकारी यांच्या पराक्रमाची महती काहीशी कमी असते. आज अशाच एका नौदल अधिका-याच्या असीम पराक्रमाची गाथा सादर करतो आहे.

समुद्रात पाणबुडीमध्ये काम करणे हे अत्यंत जिकीरीचे, हिमतीचे आणि धैर्याचे काम. या कामांत शत्रूकडून आणि प्रत्यक्ष समुद्राकडून सैनिकांच्या जीवाला सतत धोका असतोच असतो. १५ ऑक्टोबर, १९७४ रोजी अहमदाबादेत दराबाशा आणि आरमीन मोगल यांच्या पोटी जन्मलेले फिरदौस हे देशसेवेसाठी १९९२ मध्ये खडकवासल्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एन. डी. ए. ) मध्ये प्रशिक्षणार्थी सैन्याधिकारी म्हणून दाखल झाले. मूळचे अतिशय धाडसी, बुद्धीमान असलेल्या फिरदौस यांनी पाणबुडी युद्धनौकेवर सेवा करण्याचा मार्ग निवडला. १ जानेवारी १९९८ रोजी त्यांनी नौदलात प्रवेश केला.

स्वयंस्फूर्तीने कार्यरत असलेले फिरदौस यांनी प्रथमपासूनच कामात चमक दाखवली. पाणबुडीत काम करण्यासाठीचा प्रशिक्षण अभ्यासक्रम त्यांनी उत्कृष्ट गुण मिळवून पूर्ण केला. आय. एन. एस. (इंडियन नेवल शिप) शाल्की वर त्यांनी पाणबुडी विरोधी युद्ध अधिकारी पद मिळवले. आय. एन. एस. विशाखापट्टनम, आय. एन. एस. सातवाहन यावर त्यांनी सेवा बजावली. आय. एन. एस. शंकुश ते मुख्य अधिकारी बनण्याचा मान मिळवला. त्यांच्या युद्ध कौशल्याचे वरिष्ठ अधिका-यांना मोठे कौतुक असे.

२९ मे, २०१० रोजी लेफ्टनंट कमांडर फिरदौस साहेबांनी आय. एन. एस. शंकुश वर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार सांभाळला. आय. एन. एस. शंकुश ऑगस्ट महिन्यात फ्रेंच नौदल आणि भारतीय नौदल यांच्या संयुक्त विद्यमाने युद्धसराव सत्रात सहभागी होती. २९ ऑगस्ट रोजी या पाणबुडीमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने तातडीने दुरुस्ती करणे भाग होते. यासाठी ही पाणबुडी मुंबईच्या समुद्रात पाण्याच्या पृष्ठभागावर आणली गेली. ३० ऑगस्ट, २०१० रोजी सकाळी सात वाजताच्या दरम्यान दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. तीन नौसैनिक आणि एक इंजिनियरिंग अधिकारी असे चार जण या अवघड कामगिरीवर नेमले गेले. पाणबुडीच्या बाह्याभागावर असलेल्या केसिंग वर हे चौघे उतरलेले असतानाच अचानक समुद्रात एक प्रचंड लाट उसळली आणि दोन नौसैनिक आणि इंजिनियरिंग अधिकारी पाण्यात फेकले गेले. तिसरा नौसैनिक पाणबुडीच्या केसिंगवर लटकत राहिलेला होता.. आणि तो कधीही पाण्यात पडू शकत होता. फिरदौस क्षणाचाही विलंब न लावता स्वत: उफाणत्या दर्यात उडी घेतली. लटकत राहिलेल्या नौसैनिकाचा पाय जायबंदी झालेला होता. साहेब केसिंगवर चढले आणि स्वत;च्या जीवाची पर्वा न करता त्या सैनिकाला खालून ढकलून आपल्या खांद्यावर घेतले आणि शिडीवरून चढून जात त्याला पाणबुडीच्या ब्रिज वर चढवले. ही शिडीही पाण्यात निम्मी बुडालेली होती. लाटांचा मारा सुरु होता. समुद्र आणि साहेब यांच्यात वीस मिनिटांचा संघर्ष सुरु होता. यासाठी खूप शारीरिक शक्ती आणि मोठी हिम्मत लागते. पाण्यात पडलेले इतर सैनिक साहेबांकडे आशेने पाहू लागले होते… फिरदौस साहेब पुन्हा पाण्यात झेप घेते झाले. तोपर्यंत नेव्ही डायवर्स (पाणबुडे) समुद्रात उतरले होते. साहेबांनी या डायवर्सना मदत करायला आरंभ केला. सर्वांनी मिळून पाण्यात पडलेल्या सैनिकांना एकत्रितपणे पाणबुडीजवळ ढकलण्यात यश मिळवले. या सर्वांचा एक गट एकत्रितपणे पाणबुडीवर चढण्याचा प्रयत्न करू लागला… तुफानी लाटा होत्याच.. त्यांना समुद्रात ओढणा-या. सर्वजण पाणबुडीवर चढण्याच्या अगदी बेतात असताना एक अजस्र लाट आली आणि साहेब आणि इतर सर्व पुन्हा पाण्यात खेचले गेले. साहेबांनी पुन्हा जोर लावला…. पाणबुडीजवळ पोहोचले… आपल्या खांद्यावर एकेकाला घेतले आणि वर ढकलत राहिले… समुद्र आता पुरता खवळला होता… साहेब म्हणाले… तुम्ही सर्व वर पोहोचल्याशिवाय मी वर येणार नाही…. तसेच झाले… इतर सर्व सुरक्षितरित्या पाणबुडीवर पोहोचले… पण साहेब खालीच राहिले… आणखी एका मोठ्या लाटेने साहेब पाणबुडीवर आदळले.. त्यांच्या डोक्याला जबर मार बसला… तरीही साहेब तरंगत राहिले… पोहत राहिले. तोपर्यंत Helicopter ची मदत बोलावण्यात आली होती. नौसेनेच्या helicopter ने साहेबांना पाण्यातून उचलून घेतले आणि तातडीने आय. एन. एस. अश्विनी जहाजावर वैद्यकीय उपचारास नेले.. पण तो पर्यंत समुद्राने आपला डाव साधला होता…. त्याच्या लाटांशी प्राणपणाने झुंज देणारा हा वीर त्याने पराभूत केला होता… आणि नंतर त्याची त्यालाच शरम वाटली असावी… कारण काहीच वेळात समुद्र गप्प गप्प झाला… जणू काही झालेच नव्हते! सहा सैनिकांचे प्राण वाचवून लेफ्टनंट कमांडर फिरदौस दराबशाह मोगल साहेब स्वर्गात पोहोचले… फिरदौस म्हणजे स्वर्ग! एक स्वर्ग दुस-या स्वर्गात गेला…. सैनिक जिंकले तर भूमीचा भोग घेतात आणि धारातीर्थी पडले तर स्वर्गाची प्राप्ती होते त्यांना! 

हे असामान्य कामगिरी होती. एकवेळ जमीन, आकाश येथे माणसाचा निभाव लागू शकेल.. पण पाण्यात? अतिशय अवघड काम असते. तेच काम साहेबांनी करून दाखवले… आणि हुतात्मा झाले. वादळ प्रभावित जनतेला साहाय्य करण्यात साहेब सतत पुढे असत. माणसातील हिरा असे त्यांचे वर्णन त्यांचे सहकारी करीत.

In grey cold waves, when he went too far…. Strength of his spirit was the weapon of his war! अर्थात त्यांच्या आत्म्याची शक्ती हेच त्यांचे युद्धातील आयुध होते… जे त्यांनी प्राणपणाने चालवले आणि अमर झाले! मरणोत्तर शौर्य चक्राने देशाने साहेबांना सन्मानित केले… आंपण एक रत्न गमावले! ही कथा खरं तर सर्वांना माहीत असायला हवी होती… आता तरी इतरांना सांगा. हे आपले नायक… हे आपले भाग्यविधाते… हे आपले संरक्षक. यांच्या पराक्रमाच्या गाथा सतत गायल्या गेल्या पाहिजेत… जय हिंद. 🇮🇳

अहमदाबाद मधील एक रस्त्याला साहेबांचे नाव दिले गेले आहे.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments