श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ सुवर्णवेध… ☆ श्री संभाजी बबन गायके 

(भारतीय सेनेच्या राष्ट्रीय रायफल्सचा अचूक लक्ष्यवेध !) 

तिचे डोळे भेदक आहेत… तिच्या पायांतील धनुष्याची प्रत्यंचा प्रचंड आवेगाने ताणलेली असते तिने… श्वास रोखून धरलेला असतो तिने आणि ते पहात असलेल्या माणसांनी सुद्धा. बाण निघतो.. वा-याशी गुजगोष्टी करीत… जणू एखाद्या सुंदर कवितेतील शब्द त्यांच्यातून अपेक्षित अर्थासह ऐकणा-याच्या कानांवर पडत राहावेत… तसा बाण अचूक जाऊन स्थिरावतो लक्ष्याच्या काळजात… मधोमध! हा सुवर्णवेध असतो! 

नोव्हेंबर, २०१६. बंगळूरू. दोन नवे कोरे करकरीत हात बसवल्यावर “तू सर्वांत आधी काय करशील?” असा प्रश्न निष्णात अस्थिशल्य चिकित्सक डॉक्टर शिवकांत यांनी तिला विचारला… त्यावर तिने उत्तर दिले, ”मला माझ्या या हातांत बांगड्या घालायच्या आहेत!” 

पंधरा वर्षांची नवतरुण पोर ती… या वयात तिला चारचौघींसारखं नटायला आवडणं साहजिकच होतं. ती जन्मलीच मुळी दोन्ही हातांविना. Phogomelia नावाचा एक अत्यंत दुर्मिळ विकार तिला झाला होता. आईच्या गर्भातच बाळाच्या हातांची वाढ खुंटते. हात खांद्यापाशी सुरु होतो आणि तिथेच संपतो. पण तिच्या आई-वडिलांनी याही स्थितीत तिला जगवलं, वाढवलं आणि शाळेतही घातलं. मुलली हाताशी नसते तेंव्हा आईला अगदी हात मोडल्यासारखं वाटतं.. इथे तर या मुलीला हातच नव्हते. ती तिला कशी मदत करणार घरात, शेतात? आणि तिचं तिला स्वत:चं सुद्धा तसं काहीच करता येत नव्हतं. पण पोटाचा गोळा… आई-बाप कसा बारा टाकून देतील? 

जम्मू-कश्मीर मधल्या ज्या अत्यंत दुर्गम अशा किश्तवाड जिल्ह्यातील लोईधार गावात ही पोर जन्माला आली तो भाग डोंगर द-यांनी वेढलेला. ही आपल्या कोवळ्या पायांनी दुडूदुडू धावायला शिकली आणि तिला सर्व डोंगर पायांखाली घालायचे बाळकडू मिळाले. केवळ पायांच्या साहाय्याने ती चक्क झाडांवर चढू उतरू लागली… पण तिच्या भविष्याच्या वाटेवर खोल दरी होती… आणि त्या दरीत ती आज न उद्या कोसळणार होती.

तिच्या राज्यात राष्ट्रीय रायफल्स ही तिच्याच देशाची मोठी लष्करी तुकडी तैनात आहे. तिच्या राज्यातली काही माणसं इतरांच्या सांगण्यावरून आपल्याच देशाविरोधात उभी राहीली तेंव्हा देशाने त्यांच्या बंदोबस्तासाठी हे सैनिक तिच्या राज्यात पाठवले होते. पण हे सैन्य केवळ बंदुकीच्या जोरावर मतपरिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करीत नाही, तर ‘सदभावना’ जागृत करून चुकीच्या मार्गाने जाऊ पाहणा-या युवकांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करीत असते. राष्ट्रीय रायफल्स, डोग्रा रेजिमेंटने मुघल मैदान येथे आयोजीत केलेल्या अशाच एका सद्भावना कार्यक्रमात अत्यंत चपळ, उत्साही असलेली ‘ती’ लष्करी अधिका-यांच्या नजरेस पडली… आणि वर वर कठोर भासणा-या सहृदयी लष्कराने तिला आपल्या पंखांखाली घेतले आणि आकाशात भरारी मारण्यास उद्युक्त केले!

देशासाठी प्राणार्पण केलेल्या मेजर अक्षय गिरीश साहेबांच्या मातोश्री मेघना गिरीश ह्या आपल्या शूर मुलाच्या स्मरणार्थ मदत संस्था चालवतात. लष्कराने त्यांच्याशी या मुलीच्या पुनर्वसनासंदर्भात संपर्क साधला. त्यांनी अभिनेते अनुपम खेर यांच्याही कानांवर ही बाब घातली. The Being You नावाने NGO (बिगर शासकीय संस्था) चालवणा-या समाजसेविका प्रीती राय यांनीही तिच्या केस मध्ये समरसून लक्ष घातले.

तिच्या शरीराची रचनाच अशी होती की कृत्रिम हात बसवूनही फारसा उपयोग होणार नव्हता. पण तरीही त्यांनी हा प्रयत्न करून पाहिला. आणि त्याचवेळी प्रीती राय यांनी तिचा परिचय दिव्यांग जलतरणपटू शरथ गायकवाड, अंधांच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचे कर्णधार शेखर नाईक यांच्याशी करून दिला. दिव्यांग व्यक्ती क्रीडा प्रकारांत अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी होऊ शकतात, हे तिला नव्याने समजले. तिचे सर्वांग या नव्या साहसासाठी आतुर झाले.

प्रीती राय यांना मार्क स्टूटझमन नावाचा एक ऑलिम्पिक विजेता धनुर्धर माहित होता. दोन्ही हात नसताना केवळ पायांच्या साहाय्याने मार्क अगदी बिनचूक लक्ष्य वेधण्यात निष्णात होते. त्यांच्याच पावलांवर हिने पाऊल टाकले तर ही कमाल करून दाखवेल असा विश्वास सर्वांना वाटला. वैष्णोदेवी मंदिर ट्रस्टने तिची प्रशिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे दोन प्रशिक्षक तिथे तिला लाभले.. कुलदीप वैधवान आणि अभिलाषा चौधरी. वैष्णोदेवी जवळच्या कटरा येथे प्रशिक्षण केंद्र होते. घरापासून कधी फारशी दूर न गेलेली ती.. आता तिच्या घरापासून तब्बल दोनशे किलोमीटर्सवर असलेल्या या अनोळखी ठिकाणी काहीतरी करून दाखवण्याच्या भक्कम इराद्याने आली… सोबत तिची आई शक्ती देवी सुद्धा आली होती. वडील आणि मोठी बहीण गावी शेती पाहण्यासाठी थांबली. सराव सुरू झाला. दोन पाय, दोन खांदे एवढेच काय ते तिच्यापाशी होते… धनुष्याची प्रत्यंचा ताणायला आणि बाण सोडायला. पायांत पेन्सिल धरून लिहायला ती शाळेत शिकली होतीच. तिला धनुष्याची दोरी चढवणे अवघड गेले नाही. पण बाण सोडायचा कसा? तिच्या प्रशिक्षकांनी स्वत: एक छोटे उपकरण विकसित केले.. जे तोंडात धरले की त्याच्या साहाय्याने बाण सोडता येतो! एकलव्याला अंगठा नव्हता… आणि हिला हात. पण काहीही अडले नाही. ती एका पायाने दोरी ओढते… जबड्याखाली दाबून धरते… एक डोळा मिटून घेते… ती अर्जुन बनते! अल्पावधीतच तिचे बाण नेमके लक्ष्यवेध करू लागले. अशा प्रकारे बाण मारू शकणारी ती… जगातली पहिली महिला ठरली… आणि या धनार्विद्येच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारात पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू. सराव सुरू केल्यानंतर अवघ्या दोन वर्षांत ती आंतरराष्ट्रीय धनुर्धर बनली. आशियाई स्पर्धेत चीन मध्ये, नंतर युरोपमध्ये झालेल्या दिव्यांग खेळाडूंच्या स्पर्धांत ती चमकली. एक नव्हे तर दोन सुवर्णपदके तिने पटकावली. एका स्पर्धेत तर ती प्रचंड आजारी असताना, सलाईन लावावे लागले अशा स्थितीत खेळली आणि जिंकली… यामागे तिची मेहनत, प्रशिक्षकांची चिकाटी आणि भारतीय लष्कराचे पाठबळ यांसारख्या अनेक बाबी होत्या… यश असे सहजासहजी मिळत नसते! 

ती भारतात परतली प्रचंड आत्मविश्वास घेऊन. आपण जिंकू शकतो याची जिद्द बाळगून. भारत सरकारने माननीय राष्ट्रपती महोदया श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे हस्ते तिला अर्जुन हा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार प्रदान करून गौरविले. मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनीही तिला विशेष प्रोत्साहन दिले.

तिच्या यशाचे श्रेय तिने सर्वप्रथम तिच्या आईला दिले…. मां है तो मुमकीन है.. असे ती म्हणते. शक्ती देवी हे तिच्या आईचे नाव. ही निरक्षर आई तिच्या सोबत शक्ती बनून उभी राहिली! तिची कामगिरी पाहून प्रचंड प्रभावित झालेले उद्योगपती महिंद्र यांनी तिला दिव्यांग व्यक्तीसाठी विशेष रचना असलेली मोटार कार भेट देण्याची घोषणा केली. तेंव्हा तिने ‘मी १७ वर्षांची आहे.. सज्ञान झाल्यावर आपली भेट स्वीकारेन.. ’ असे महिंद्र यांना नम्रपणे कळवले!

ही म्हणजे Paris दिव्यांग ऑलिम्पिक मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करीत यश संपादन करून देशाला पदक मिळवून देणारी शीतल मानसिंग देवी! 

भारतीय लष्कराने या बलशाली मुलीला खेड्यातून थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवले. राष्ट्रीय रायफल्स आणि लेखात उल्लेख केलेल्या इतर सर्व संबंधित व्यक्ती, संस्थांचे आणि अज्ञात सहका-यांचे हार्दिक अभिनंदन! जय हिंद!  🇮🇳

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments