सुश्री सुनीला वैशंपायन 

? इंद्रधनुष्य ?

☆ पोटीस…  लेखिका : सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

 

मनाच्या पेटा-यात कुठली आठवण कोणत्या व्यक्तीला किंवा वस्तूला बिलगून बसलेली असते, ते सांगता येत नाही.. परवा फेसबुकवरच्या एका खाद्यसमूहावर एक फोटो अचानक पहाण्यात आला.. लांब दांड्याच्या लोखंडी काळ्याभोर पळीचा तो फोटो पाहून अंगावर सर्रकन् काटा आला.. नि ती पळी आठवणींचं बोट धरून थेट लहानपणात घेऊन गेली..

आमचं बालपण अगदी साधसुधं.. मोकळंढाकळं, अवखळ, खोडकर नि गरीबडं. आजच्यासारखा ना तेंव्हा टीव्ही होता, ना मोबाईल ना व्हिडिओ गेम्स.. शाळेतले काही तास नि घरातला जेवणा-अभ्यासाचा वेळ सोडला तर इतर वेळी नुसता धांगडधिंगा, खेळ नि हुंदडणं.. साहजिकच पडणं.. झडणं..

बोटाची ठेच, गुडघ्यावरचं खरचटणं, जखम.. कधीतरी डोक्याची खोकसुद्धा.. बटाटा सोलावा तसं सोलवटलेलं कातडं, त्यातून डोकावणारं लाल-गुलाबी मांस, भसकन् बाहेर पडलेल्या रक्ताच्या काळ्याभोर गुठळ्या… नि यांना बिलगून बसलेली अंगणातली नाहीतर मैदानातली माती.. रक्ता-मासाच्या ओढीनं घोंगावणा-या चार-दोन माशा नाहीतर चिलटांचा ढग.. नि थेट मस्तकापर्यंत पोहोचणारं ते चरचरणं.. !!

पण यातलं काहीही खेळापासून जरासुद्धा ढळू न देणारं.. पडल्यावर “टाईमप्लीज” म्हणत तळव्याच्या मागच्या बाजूच्या अगदी मध्यावर थुंकी लावणं, दोन-चार मिनिटं डोळे मिटून वेदनेचा अंदाज घेणं नि वीज चमकावी तसं झटक्यात उठून जखमेवर हातानं झटकणं नि पुन्हा खेळात सामील होऊन “घेतला वसा न सोडणं !” 

घरात डझनावर असणारी पोरबाळं नि रोजच्या होणा-या जखमा.. कधी चप्पल चावून होणारे फोड, उन्हाळ्यात हावरटपणानं रिचवलेल्या आंब्यानं होणारी गळवं, हाता-पायांवर होणारी केस्तुटं.. आई -बाप कुणाकडं नि कशा कशाकडं पहाणार ? म्हणतात नां.. “रोज मरे त्याला कोण रडे ?”

“पोरं म्हटल्यावर पडायचीच.. जखमा व्हायच्याच.. “, “पडे झडे माल वाढे” असल्या रांगड्या विचारसरणीचे ते दिवस नि आमचे माय-बाप होते.. “जा ती जखम पाण्यानं धू” म्हणत पाठीत एक धपाटा पडायचा.. फार तर जखमेवर हळदीची पूड नाहीतर तत्क्षणी होळी साजरी करायला लावणारं “आयोडीन” नावाचं क्रूर नि जहाल जांभळं द्रावणं ओतलं जायचं.. !!

धूळ, रक्ताच्या गुठळ्या, माती, माशा, चिलटं… यातल्या कशालाही न जुमानता एके दिवशी ती जखम खपलीनामक काळ्या कवचाखाली दिसेनाशी व्हायची नि त्या जखमनामक विषयाची इतिश्री व्हायची…

“बाळा, खूप लागलय कारे ? हॅंडिप्लास्ट लावूया हं.. डॉक्टरकाकांकडं जाऊ या का ? आता स्ट्रिक्ट रेस्ट घ्यायची बरं का ! फार तर झोपून मोबाईलवर गेम खेळ.. ” अशी आजच्या मुलांसारखी कौतुकं वाट्याला येणं आमच्या कमनशिबात नव्हतंच !!

जखमेपासून खपलीपर्यंतचा प्रवास मुकेपणानं पार पडायचा.. बारकसं गळू थोडसं मोठं होऊन कधी फुटलं ते कळायचं नाही.. केस्तुटातला केस थोरला भाऊ निर्दयपणानं ओढायचा नि थोडासा पू बाहेर येऊन ते होत्याचं नव्हतं होऊन जायचं.. पण प्रत्येकवेळी हा प्रवास इतका सुलभ असायचाच असं नाही.. रोगजंतू जखमेत शिरकाव करायचे, त्यांच्याशी लढताना लक्षावधी पेशी धारातीर्थी पडायच्या नि त्या “पू” नामक पिवळसर द्रव्याच्या रूपातून जखमेत भरून रहायच्या.. रोगजंतूंनी रक्तात प्रवेश केलेला असायचा.. ठणकत्या जखमेबरोबर ताप भरायचा.. लाल बारकसं गळू कधी मोठं होत जायचं नि त्या पिवळ्याजर्द गळवाची वेदना सोसण्यापलीकडे जायची.. अवघड जागी झालं असेल तर हे गळू “दे माय धरणी ठाय” अशा स्थितीला न्यायचं..

कुठं दुर्लक्ष करायचं नि कुठली गोष्ट गंभीरपणे घ्यायची हे अचूक समजणा-या आमच्या माऊलीच्या कपाळावर ही वाढती जखम, पू नि तापणारं अंग पाहून चिंतेची आठी उमटायची.. पण लगेच हातपाय गाळून डॉक्टरांकडे आपल्या पोराला नेणा-या त्या काळच्या आया नव्हत्या.. स्वत:च्या वैद्यकीय ज्ञानावर (तुटपुंज्या का असेना) विश्वास असणा-या नि म्हणूनच पोरांच्या आजाराशी स्वत: लढणा-या त्या झाशीच्या राण्या होत्या. (अर्थात डॉक्टरांकडे नेण्यासाठी लागणा-या छनछनीची बारा महिने असणारी कडकी.. हेही एक ठोस कारण होतच म्हणा !)

तिन्हीसांजेची वेळ.. दिवस सरेल तसा ठणका अजूनच वाढलेला.. पोराच्या रडण्यानं सारं घर कातरलेलं..

“या गादीवर आता झोपून रहायचं, आजिबात उठायचं, चालायचं, खेळायचं नाही. ” म्हणत ती माऊली लेकराला स्वत:च्या हातानं झोपवायची. गरमागरम कॉफी पाजायची. मऊ भाताचे चार घास भरवायची.. एव्हाना रात्रीनं बस्तान बसवलेलं असायचं..

“आई खूप दुखतय”….

” हो.. थोडं थांब हं… ” 

आई घरातल्यांची जेवणखाणं उरकायची..

पेशंट पोराच्या भोवती भावंडं गोल करून बसलेली…

“मने, समोरच्या कोनाड्यात पानं ठेवलीय, *ती घेऊन ये आणि फडताळातलं माझं पांढरं जुनं पातळ आण” 

आता त्या पोराला नि भावंडांनाही अंदाज आलेला असायचा.. ती एका खास प्रोसिजरची तयारी असायची..

पोटीसची…. !!

“आई नको.. आई पोटीस नको… ” ते पोर बेंबीच्या देठापासून ओरडायचं.. भोवतालच्या भावंडाना “सुपातले हसतात” हे एका बाजूला असलेलं फीलींग नि दुस-या बाजूला काळजात अजून चर्र करणारा स्वत:च्या वेळचा चटका… अशा संमिश्र भावनांनी व्यापलेलं असायचं !

मनीनं पिंपळाची, गुलबक्षीची अशी पानं भावासमोर ठेवलेली.. आईच्या पांढ-या सुती पातळातून लांबशी पट्टी काढून एका बाजूला मधोमध फाडून थोड्याशा भागाला विभागलेलं..

स्वयंपाकघरातून “चर्र” असा आवाज..

आईनं लांब दांड्याच्या तापलेल्या लोखंडी पळीत कणीक, हळद, थोडं पाणी नि थोडं तेल घातलेलं.. पिठल्यासारखा झालेला लगदा.. नि त्यामुळे गरमागरम पळीतून निघणा-या वाफा नि आसमंतात घुमणारा तो जोरदार “चर्र” आवाज.. पेशंट पोराला अजूनच घाबरवून सोडणारा… “बळीच्या बक-याच्या” चेह-यावरचे नि याच्या थोबाडावरचे भाव तंतोतत जुळणारे.. !

आईचं त्या पोटीसाच्या पळीसहित आगमन…

“मला नको.. मी नाही लावून घेणार.. पोटीस नको.. ” म्हणत भेदरलेल्या पोराचा पळण्याचा प्रयत्न… नि त्याला भावंडांनी घट्ट पकडून ठेवणं.. आईचं चमच्याने पानाच्या सपाट भागावर पोटीसाचं भयंकर गरम पीठ घालणं..

नि…

नि…

पाऊस पोराच्या पाठीवर बरसणारा.. भावंडांचीही तीच गत.. नि त्या माऊलीच्या कुशीत गाढ झोपी गेलेलं तिचं लेकरू !!

शेजारच्या खोलीतल्या दाराआडून हा सोहळा पाहणारे भेदरलेले त्याचे बाबा.. दगडाच्या त्यांच्या काळजाचं पाणी पाणी झालेलं..

नि… घाबरट समजत असलेल्या बायकोच्या करारीपणाच्या साक्षात्कारानं दिपलेले त्यांचे डोळे…. !!

पुढचे दोन दिवस हा पोटीसाचा रणसंग्राम… तिस-या दिवशी सकाळी पोटीसाला घाबरून जखमेचं पलायन.. वेदना आणि तापाचाही रामराम…

नंतर शिल्लक राहणारा फक्त व्रण…. आईच्या कणखरपणाची, वात्सल्याची नि पोटीसाची जन्मभर आठवण करून देणारा…. !!

आजही म्हणूनच पळीचा फोटो पाहिला नि पोटीसाच्या आणि माझ्या माऊलीच्या आठवणीनं जीव चिंब चिंब झाला… !!

उष्णतेनं जखमेभोवतीचा रक्तप्रवाह वाढवणारं नि जखम बरी होण्यास मदत करणारं…. हळदीमुळे जखमेतल्या रोगजंतुंना मारणारं पोटीस…. आज वापरणं तर सोडाच पण कुणाला माहीतही नाही..

काळाच्या प्रवाहाबरोबर वाहून गेलेल्या अनेक मौल्यवान गोष्टींपैकी ते एक.. !. शास्त्राने अनेक औषधे आणली. प्रभावशाली अॅंटिबायोटिके जखमांना ताबडतोब आटोक्यात आणतातही.. गोळी घेतली की काम संपून जातं.. पोटीसासारखं झंझट नाही.. म्हणूनच पोटीस नामशेष झालं..

कबूल आहे..

पण सा-या कुटुंबाला एकत्र आणणा-या, माऊलीच्या वात्सल्याच्या वर्षावाला कारणीभूत ठरणा-या त्या पोटीसनामक सोहळ्याला मात्र आपण मुकलो !! 

लेखिका : © नीला महाबळ गोडबोले, सोलापूर.

प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments