डाॅ.भारती माटे
इंद्रधनुष्य
☆ “विज्ञान गड”: “इंजीनियरिंग मधला एक अद्भुत नमुना” – लेखक : इंजि. राम पडगे ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆
(आशिया खंडामधला पहिला प्रकल्प आकाराला येतोय महाबळेश्वर तालुक्यामध्ये “कोट्रोशी” या ठिकाणी.)
नमस्कार अभियंता मित्रांनो,
आपणा सर्वांना अभियंता दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. अभियंता दिनाच्या निमित्ताने आपणाला एका नवीन प्रकल्पाची ओळख करून द्यावी अशा उद्देशाने या प्रकल्पाची थोडक्यात माहिती आपणाला पाठवत आहे.
“विज्ञान गड” गेली १८ वर्ष या प्रकल्पाचे काम सुरू आहे. एक वेगळी संकल्पना, वेगळा विषय आणि विज्ञान आधारित ही थीम असलेले अत्यंत नाविन्यपूर्ण आणि इंजिनिअरिंग मधला एक अद्भुत नमूना या ठिकाणी उभारला जात आहे.
येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये शासनाच्या सर्व परवानक्या प्राप्त होऊन हा प्रकल्प सर्वांसाठी खुला होईल. आशिया खंडा मधला हा अशा प्रकारचा पहिला प्रकल्प आहे असे म्हणण्यास काही हरकत नाही. या ठिकाणी जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा वाहनांसाठी रस्ता उपलब्ध नाही. डोंगराच्या पायथ्याला आपली वाहने लावून या ठिकाणी जवळपास १५० मी उंच असलेल्या डोंगरावर माथ्यावर, वायरच्या मदतीने खेचली जाणारे रेल्वे मधून जावे लागते. याला फिन्यूक्युलर असे म्हटले जाते. सर्वसाधारण ४० लोकांची क्षमता असलेले दोन डबे बॅलन्सिंग पद्धतीने एकावेळी वर खाली होत असतात. सर्वसाधारण सात मिनिट ते दहा मिनिटांचा कालावधी या ठिकाणी जाण्यासाठी लागतो. डोंगराचा तिव्र उतार सर्वसाधारण ३५ डिग्री ते ४० डिग्री च्या आसपास आहे. आपली ही फिनिक्युलर वरती असलेल्या गोल इमारतीच्या आत मध्ये थांबते. प्रत्येक दरवाज्याच्या पुढे फ्लोरिंग येईल अशा प्रकारचे नियोजन केलेले आहे.
आणि इथून पुढे तुमचा सुरुवश होतो….. एक अद्भुत प्रवास!!! आपण नक्की काय पहावे व कोणते प्रथम पाहावे अशा प्रकारची आपली परिस्थिती होते. या इतक्या उंच ठिकाणी, इतका भव्य प्रकल्प असेल असे रस्त्यावरून वाटत नाही. समुद्रसपाटीपासून सर्वसाधारण बाराशे पन्नास मीटर उंचीवर असलेला हा प्रकल्प महाबळेश्वर आणि पाचगणी यांच्या उंची पेक्षाही जास्त आहे. या इमारतीच्या माथ्यावर गेल्यानंतर आजूबाजूचा निसर्ग पाहण्यासाठी कोणताही अडथळा राहत नाही.
या ठिकाणाहून सह्याद्रीच्या अवाढव्य गगनाला भिडणारया रांगा, कोयना जलाशयाचा विस्तीर्ण नजरेत न सामावणारा पसारा, शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला राजमार्ग ,कासचे नयनरम्य पठार, वासोटा किल्ला, उत्तेश्वराचं पुराणतन मंदिर, मकरंद गड, महाबळेश्वर, पाचगणी, लिंगमळा, भिलार हा सगळा परिसर तुमच्या दृष्टिक्षेपामध्ये येतो आणि हे तुम्ही , आशिया खंडा मधला पहिल्या रोटेटिंग डोम मध्ये बसून पाहत असता.
या ठिकाणी अत्यंत मोठ्या क्षमतेचे कॅमेरे बसवून, या सर्व ठिकाणांचे दर्शन स्क्रीन वरती आपणाला पाहता येते. याशिवाय आपली वेळ संध्याकाळची असेल तर आकाशातले ग्रह तारे या स्क्रीनवर तुम्हाला पाहता येतात. या ठिकाणचे फिरणारे हॉटेल आणि या ठिकाणी बसून घेतलेल्या जेवणाचा आस्वाद आपणाला आयुष्यभर स्मरणात राहील असा आहे. तुम्ही ३६० डिग्री मध्ये फिरत, निसर्गाच्या प्रत्येक कानाकोपऱ्याचे दर्शन घेत जेवणाचा आनंद घेत असता. या ठिकाणी आहे अर्थक्वेक मधले सर्व प्रकारचा अभ्यास, या ठिकाणी आहे अभ्यासण्यासाठी विंड एनर्जी प्रोजेक्ट,सोलर एनर्जी प्रोजेक्ट आणि हायड्रो प्रोजेक्ट सुद्धा. पाण्यामध्ये होत असलेले बदल आणि त्यासंबंधीची प्रात्यक्षिके प्रत्यक्ष पाहता येतात. सुनामी प्रत्यक्ष होते तरी कशी? व तिचा इफेक्ट नक्की असतो कसा? हे तुम्ही प्रत्यक्ष अनुभवाल या ठिकाणी .लाटा मधलं सायन्स आहे तरी काय? हे अभ्यासायचे असेल तर या ठिकाणी भेटायलाच हवं. भारतीय सैन्य दलामध्ये अत्याधुनिक शस्त्र वापरण्यात येतात. ती प्रत्यक्ष असतात कशी व ती वापरली कशी जातात ? याबाबतची उत्सुकता प्रत्येकालाच असते . या ठिकाणी शिकण्यासाठी , अभ्यासण्यासाठी आणि पाहण्यासाठी भरपूर काही आहे. अभियंता म्हणून या प्रकल्पाला एकदा नक्कीच भेट द्यायला हवी. मी या प्रकल्पाची अत्यंत थोडक्यात माहिती दिली प्रत्यक्षात बरेच काही आहे .
तुम्ही कदाचित याल त्यावेळी शिवाजी महाराजांचे अभियंते हिरोजी इंदुलकर यांचं अत्यंत सुंदर शिल्प या ठिकाणी तयार झालेले असेल. या सह्याद्रीच्या रांगांमध्ये हिरोजी इंदुलकर यांनी आपल्या तीव्र बुद्धीमतेने अभियंता म्हणून आपले नाव इतिहासाच्या पानावर कायमचे कोरून ठेवलेले आहे. या अभियंत्याची स्मृती म्हणून या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या सह त्यांचाही पुतळा या ठिकाणी उभारला जाणार आहे.
वयाच्या ६८ व्या वर्षी रात्रंदिवस काम करणारे, या प्रकल्पाचे मालक आणि अभियंते जोशी सर यांची भेट म्हणजे स्फूर्ती आणि संकल्पना याचा अनोखा मिलाफ. वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेने स्वतःचे स्थान निर्माण करणारे व अभियंता म्हणून नक्की कसे असावे याचे हे जिवंत उदाहरण आहे.
प्रकल्प मालक व अभियंता – इंजि. वसंत जोशी सर
प्रकल्प सल्लागार. – इंजि. राम पडगे
आर्किटेक्ट – आर्कि. विक्रांत पडगे
आर सी सी सल्लागार. – इंजि. अनिल कदम
अभियंत्यांनी एकदा आवर्जून भेट द्यावी असा हा प्रकल्प आहे. या ठिकाणी ज्याला पाहायचे आहे ते भरपूर काही पाहू शकतात ,ज्याला शिकायचं आहे तो भरपूर काही शिकू शकतो. एक अभियंता म्हणून निश्चितच चॅलेंजिंग असा हा प्रकल्प आहे, म्हणूनच आज अभियंता दिनाच्या निमित्ताने आपल्यासमोर मी हे थोडक्यात मांडत आहे.
आपला,
इंजि. राम पडगे
९६८९३५९४७८
प्रस्तुती : डॉ. भारती माटे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈