सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ उंच तिचा झोका ☆ तेजस्विनी डॉक्टर रखमाबाई राऊत ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
डॉक्टर रखमाबाई राऊत
ही गोष्ट आहे डॉक्टर रखमाबाई राऊत यांची.गोष्ट तशी जुनी, दीडशे वर्षांपूर्वीची. पण आजही भारतीयच नव्हे तर जगातील स्त्रियांसाठी दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरली आहे. भारतातील पहिल्या स्त्री डॉक्टर हा मान निश्चितच डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा आहे. दुर्दैवाने डॉक्टर आनंदीबाई भारतात परतल्यावर आजारी पडल्या व मृत्यू पावल्या. भारतातली पहिली प्रॅक्टिसिंग स्त्री डॉक्टर म्हणून डॉक्टर रखमा बाईंची इतिहासात नोंद आहे पण याहून खूप मोठा इतिहास त्यांनी स्वकर्तृत्वाने घडविला आहे. स्त्री शिक्षण,स्त्री-स्वातंत्र्य, स्त्री शक्ती, स्त्रीमुक्ती असे शब्द उच्चारणे हे ही पाप समजले जाई, त्याकाळात वीस वर्षांच्या कोवळ्या रखमाबाई संपूर्ण व्यवस्थेच्या विरोधात उभ्या राहिल्या.अजाणत्या वयात लादलेल्या लग्नापासून मुक्त होण्यासाठी,व्यक्ती स्वातंत्र्यासाठी त्या कायदेशीर लढाई लढल्या. आणि आणि स्वतःवरील बालविवाहाचे संकट त्यांनी निग्रहाने परतवून लावले. 18 87 साली रखमाबाई कायदेशीरपणे विवाह बंधनातून मुक्त झाल्या. बॉम्बे हायकोर्टामध्ये चार वर्षे चाललेला हा खटला ‘विवाह प्रस्थापित करण्याकरीताचा खटला’ म्हणून जगभरात गाजला.
रखमाबाई चा जन्म 22 नोव्हेंबर 1864 साली झाला. त्यांच्या आईचे नाव जयंतीबाई व वडिलांचे नाव जनार्दन सावे होते. जनार्दन सावे हे व्यवसायाने कंत्राटदार होते. रखमाबाई यांचे आजोबा म्हणजे आईचे वडील हरिश्चंद्र यादव जी चौधरी हेही शिक्षित व आधुनिक विचारांचे होते.म्हणून मुलीचा विवाह त्यांनी उशिरा म्हणजे वयाच्या पंधराव्या वर्षी केला. रखमाबाई यांच्या जन्मानंतर अल्पावधीतच जनार्दन सावे यांचा काविळीने मृत्यू झाला. रखमाबाई यांचे आजोबा हरिश्चंद्र यांनी पुन्हा एकदा प्रथेविरोधात जाऊन जयंती बाईंचा पुनर्विवाह करण्याचा निर्णय घेतला. हा त्या काळातील एक धाडसी निर्णय होता.
जयंती बाईंचे दुसरे पती म्हणजे डॉक्टर सखाराम अर्जुन राऊत. डॉक्टर सखाराम हे जे जे हॉस्पिटल मध्ये असिस्टंट सर्जन होते. अचाट बुद्धिमत्ता आणि संशोधक वृत्ती यामुळे वैद्यक शास्त्रावरील त्यांनी लिहिलेले ग्रंथ महत्त्वाचे मानले जातात. जयंती बाईबरोबर आलेली चिमुकली रखमाबाई डॉक्टर सखाराम अर्जुन यांच्या घरी वाढू लागली. हा रखमाबाई बाईंच्या आयुष्याला कलाटणी देणारा काळ होता. रखमाच्या जडण-घडणीत डॉक्टर सखाराम या दुसऱ्या पित्याचा मौलिक वाटा आहे. प्रतिकूल सामाजिक परिस्थितीत डॉक्टर बनण्याचे स्वप्न रखमा ने बघितले. हे धाडस त्या डॉक्टर सखाराम राऊत यांच्यामुळेच करू शकल्या. म्हणून तर रखमाबाईंनी जन्मदात्या ऐवजी डॉक्टर सखाराम राऊत यांचे नाव लावले. जन्मदात्यापेक्षा जन्म घडविणार्याला त्यांनी थोरपण दिले.
क्रमशः….
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈