सुश्री मंजुषा सुनीत मुळे
☆ उंच तिचा झोका ☆ गानगुरू डॉ. शोभा अभ्यंकर – भाग-1 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
डॉ. शोभा अभ्यंकर —- भारतीय शास्त्रीय संगीतविश्वात ‘गानगुरू’ म्हणून ख्यातनाम असलेले एक अतिशय उमदे आणि सतेज व्यक्तिमत्व.
प्रचंड जिद्द, आश्चर्य वाटावं अशी चिकाटी, आणि कौतुक वाटावं असा आत्मविश्वास यांची जन्मजात देणगी लाभलेल्या शोभाताईंबद्दल किती आणि काय काय लिहावं?
एका सुशिक्षित मध्यमवर्गीय कुटुंबात २० जानेवारी १९४६ रोजी शोभाताईंचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांचा समजूतदार, विचारी आणि अभ्यासू स्वभाव इतरांना प्रकर्षाने जाणवत होता. त्या वयातही राहण्या-बोलण्यातला, वागण्यातला पोच, नेमकेपणा,आणि स्वच्छतेची, नीटनेटकेपणाची आवड वेगळेपणाने उठून दिसावी अशीच. पुण्यातल्या हुजूरपागा शाळेत त्यांचे ११ वीपर्यंतचे शिक्षण झाले. तेव्हाही अभ्यासाइतकीच आवड होती ती गाण्याची. तेव्हाच्या हिंदी-मराठी चित्रपटातली बरीचशी गाणी शास्त्रीय संगीताशी नाते सांगणारी असायची,आणि शोभाताईंना ती बहुतेक सगळी गाणी त्यातल्या दोन कडव्यांच्या मधल्या म्युझिकसकट अगदी जशीच्या तशी म्हणता यायची याचे ऐकणाऱ्याला कमालीचे कौतुक वाटायचे. का कोण जाणे, पण त्या वयात शास्त्रीय संगीत शिकण्याचा म्हणावा तसा योग त्यांच्या आयुष्यात आला नाही. पण तरीही त्या संगीताशी त्यांची नाळ जन्मतःच जोडली गेलेली होती हे नक्की.
११वी उत्तम तऱ्हेने पास झाल्यावर त्यांनी स.प. कॉलेजमध्ये सायन्सला प्रवेश घेतला. कारण शास्त्र विषयात त्यांना गाण्याइतकीच गती होती. पुढे बायोकेमिस्ट्री या विषयात त्यांनी पुणे विद्यापीठाची एम.एस्सी. पदवी मिळवली.
तेव्हाच्या रीतीनुसार, आता पुरेसे शिक्षण झाले असे गृहीतच असल्याने, मग पुण्याच्याच श्री विजय अभ्यंकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. स्वतः श्री. विजय आणि त्यांचे सगळेच कुटुंबीय संपन्न-समजूतदार-प्रेमळ आणि शिक्षणाचा आदर व कदर करणारे होते. त्यात शोभाताईंचे व्यक्तिमत्त्वही असे होते की अगदी लगेचच आपल्या वागण्याने त्यांनी तिथल्या सर्वांची मने जिंकून घेतली. बायोकेमिस्ट्रीतच पुढे पी.एचडी करावी या त्यांच्या विचाराला सगळ्यांनीच उचलून धरले, आणि अभ्यासही सुरु झाला. पण सासूसासरे, आजेसासूसासरे, लहान दीर-नणंदा अशा मोठ्या एकत्र कुटुंबात सगळ्यांसाठीची सगळी कामे उरकून दिवसभर विद्यापिठात जाणे फार कष्टप्रद होत होते. त्यात एका नव्या जीवाची चाहूल लागली,आणि त्यांनी आपणहून, अतिशय सारासार विचार करून तो अभ्यास थांबवण्याचा अवघड निर्णय घेतला.
पण फक्त उत्तम रीतीने संसार करणं ही आयुष्याची इतिकर्तव्यता नाही हे त्यांना, आणि विशेष म्हणजे श्री विजय यांनाही प्रकर्षाने जाणवत होतं. कारण शोभाताई खरोखरच सर्वगुणसंपन्न आहेत, जिद्दी आहेत, ध्यासवेड्या आहेत, हे त्यांना मनापासून पटलं होतं. आणि नेमक्या अशावेळी शोभाताईंची संगीताची आवड त्यांना वारंवार साद घालायला लागली…. इतकी आर्ततेने, की आता यापुढे शास्त्रीय संगीत हा एकच ध्यास घ्यायचा, हा निर्णय त्यांच्या मनाने,बहुदा त्यांच्याही नकळत घेऊन टाकला आणि मग त्यांचे शास्त्रीय-संगीत शिक्षण नियमितपणे सुरु झाले. पं. गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्याकडे जोमाने शिकायला सुरुवात झाली. आणि एकीकडे त्यांनी एस.एन.डी.टी. विद्यापिठात संगीत विषयात एम.ए चा अभ्यासही सुरू केला. अंतिम परिक्षेत त्या विद्यापिठाच्या भारतभरातल्या सर्व केंद्रांमधून त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला, आणि याच यशासाठी त्यांना विद्यापिठातर्फे सुवर्णपदक, “गानहिरा” पुरस्कार, आणि “वसंत देसाई पुरस्कार” हे मानाचे तीनही पुरस्कार प्रदान करण्यात आले.
पुढे संगीतमार्तंड पं. जसराजजी यांचे शिष्यत्व त्यांना लाभले. एकीकडे पं. वि. रा. आठवले यांच्याकडे अनवट, म्हणजे फारसे प्रचलित नसलेले, आडवाटेचे राग शिकण्यास जाणेही सुरु झाले होते. त्यांना अफाट स्मरणशक्तीचे केवढे मोठे वरदान लाभले होते, हे या सगळ्या शिक्षणादरम्यान, त्यांना ओळखणाऱ्या प्रत्येकाला प्रकर्षाने जाणवत होते. कारण राग-स्वर-आरोह-अवरोह या सगळ्यांची, एकाही रागाच्याबाबतीत कुठेही लेखी नोंद करण्याची गरजच त्यांना कधीही पडत नसे.त्यांच्या डोक्यातच अशा प्रत्येक गोष्टीची कायमस्वरूपी तंतोतंत नोंद अशी घेतली जात असे की कित्येक वर्षांनी जरी त्यातला एखादा लहानसा संदर्भ जरी कुणी त्यांना विचारला तरी क्षणार्धात त्या योग्य उत्तर देत असत. “यांचा मेंदू आहे की कॉम्प्युटर “ अशीच विचारणाऱ्याची प्रतिक्रिया असायची.
क्रमशः….
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈