सुश्री मंजुषा सुनीत मुळे
☆ उंच तिचा झोका ☆ गानगुरू डॉ. शोभा अभ्यंकर – भाग-2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
हळूहळू त्यांना मैफिलींसाठी आमंत्रणं येऊ लागली. मैफिली व्हायलाही लागल्या होत्या–रसिकांची भरपूर दाद अर्थातच मिळत होती.पण अचानकच त्यांनाआवाजाला खर येण्याचा त्रास व्हायला लागला.खरं तर लोकांची प्रशंसा, कौतुक यांची चटक एकदा लागली की त्यापासून आपणहून लांब जायचं ही प्रत्यक्षात खूपच अवघड गोष्ट असते. पण शोभाताईंनी मात्र आपणहून मैफिली थांबवायचा निर्णय घेतला, आणि इथेच त्यांचं वेगळेपण, त्यांचा समतोल विचार प्रकर्षाने दिसून आला. आणि त्याचबरोबर, माघार घ्यायची म्हणजे पराभूतासारखे रडत रहायचे नाही–तर चार पावले मागे येऊन, आणखी जोमाने आणि आत्मविश्वासाने दुसरी उडी मारायची, हा त्यांच्यातला विशेष आणि अपवादात्मक गुणही अधोरेखित केला गेला. एव्हाना अनेक गायनोत्सुक विद्यार्थी ‘आम्हाला तुमच्याकडेच गाणं शिकायचं आहे’ असा आग्रह करायला लागलेच होते. आणि शोभाताईंचा निर्णय झाला. त्यांनी गाणं शिकवायला सुरुवात केली. ज्ञानाचं अफाट भांडार त्यांच्याकडे होतंच. आई-वडलांकडून शिकवण्याच्या कलेचा वारसा मिळालेलाच होता. मग काय, बघताबघता शिष्यांची संख्या सत्तराच्याही पुढे गेली. पण शोभाताईंचे वेगळेपण असे की, त्यांनी रूढार्थाने गाण्याचे क्लास सुरु केले नाहीत. एका बॅचमध्ये साधारण सारख्या गुणवत्तेचे ४ ते ६ पेक्षा जास्त शिष्य असणार नाहीत याकडे त्यांनी कटाक्षाने लक्ष ठेवले. शिकवण्यातून उत्पन्न मिळवणे हे प्राधान्य नव्हतेच. पैशाचा हव्यास तर कधीच नव्हता, हे आवर्जून सांगावेसे वाटते. दिवसभर त्यांच्या शिकवण्या चालू असत. दमले-थकले-वैतागले हे शब्द त्यांच्या कोशात नव्हतेच. प्रत्येक बॅचला उत्साह तेवढाच, जीव तोडून शिकवणेही तसेच. शिष्य म्हणजे आपली मुलंच या दृढ भावनेने प्रत्येकाची वैयक्तिक काळजी घेण्याचे कामही तितकेच सहजपणे, निरपेक्षपणे सुरु असायचे. कुणाहीबद्दल अशी प्रामाणिक आपुलकीची आणि तळमळीची भावना सातत्याने बाळगणे, आणि प्रत्यक्षात तसे वागणे, हा शोभाताईंचा आणखी एक फार मोठा आणि दुर्मिळ गुण. आणि वैयक्तिक आयुष्यातल्या एकाही कर्तव्याबाबत काडीचीही तडजोड कधीही करायची नाही हा तर जणू त्यांचा बाणाच.
अशातच पी.एच.डी. करण्याच्या ऊर्मीने पुन्हा उसळी मारली, आणि त्यासाठी शोभाताईंचे अथक प्रयत्न सुरू झाले. “मराठी भावगीताची ८० वर्षांची वाटचाल, त्यांचे बदलते स्वरूप, आणि त्यातील सांगीतिक सौंदर्य स्थळे” असा, मुळातच खूप मोठा आवाका असणारा विषय त्यांनी निवडला. त्यासाठी खूप मागे जात, त्यांनी अगदी मुळापासून जास्तीतजास्त माहिती मिळवली. तेव्हा जे जे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ प्रसिद्ध गीतकार-संगीतकार-गायक हयात होते, त्यांना प्रत्यक्ष भेटून,यासंदर्भात त्यांच्या मुलाखती घेतल्या, ज्यांचे ऑडिओ रेकॉर्डिंग त्यांनी एखाद्या मौल्यवान खजिन्यासारखे जपून ठेवलेले आहे. या अभ्यासाच्या ओघात १०० वर्षांच्याही आधीच्या भावसंगीताच्या इतिहासाचा नेटका आढावा त्यांनी प्रबंधात घेतलेला आहे. शास्त्रीय संगीतातली सौंदर्यस्थळे हा तर त्यांचा हुकुमाचा एक्काच. भावगीतात त्यांचा कुठे कसा वापर केला गेला आहे याची तपशीलवार उदाहरणे त्यांनी दिलेली आहेत. भावगीताचे बदलते स्वरूप सांगतांना, आजच्या तरुण गीतकार-संगीतकार- गायकांच्या प्रत्यक्ष मुलाखतींचा समावेशही केलेला आहे. हे सगळे दमछाक करणारे होतेच. त्यात कॅन्सर नावाचा महाभयंकर राक्षस अचानक वाट अडवून उभा राहिला. पण मनाची उमेद आणि ध्यास प्रचंड,आणि त्याला जिद्द-चिकाटी-सातत्य यांची प्रबळ साथ. त्यामुळं अजिबात ढासळून न जाता त्यांनी आपले काम चालूच ठेवले आणि एक अत्त्युत्तम प्रबंध आकाराला आला. त्यानंतरची तोंडी परीक्षा म्हणजे तर जणू शोभाताईंचा गाण्याचा एक छोटेखानी कार्यक्रमच ठरला. या प्रबंधावर आधारित पुस्तक काढावे या परीक्षकांच्या लेखी अभिप्रायानुसार, राजहंस प्रकाशनाने त्यावर आधारित “ सखी भावगीत माझे” हा पुस्तकरूपी संदर्भग्रंथच प्रकाशित केला.
अनेक विद्यार्थ्यांच्या सर्वार्थाने गुरू असलेल्या शोभाताईंचे नाव, ‘गुरू ’या कार्यासाठी दिल्या जाणाऱ्या “ रागऋषी पुरस्कार”,”पं. विष्णू दिगंबर पलुस्कर पुरस्कार”, “पं. ना. द. कशाळकर पुरस्कार” यासारख्या विशेष सन्माननीय पुरस्कारांवर साहजिकच कोरले गेले. जातिवंत गुरु अष्टपैलू शिष्य कसा घडवतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे,त्या ज्यांच्या पहिल्या गुरु होत्या असे आजचे जागतिक कीर्तिप्राप्त शास्त्रीय गायक पं. संजीव अभ्यंकर होत. विजय नावाच्या सोनेरी कोंदणात शोभा नावाचा हा पैलूदार अस्सल हिरा अखेरपर्यंत कमालीचा लखलखता राहिला.
अशा गुरुवर्य शोभाताईंचं आज महिला दिनाच्या निमित्ताने मनःपूर्वक संस्मरण आणि नमस्कार.?
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈