सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ उंच तिचा झोका ☆ तेजस्विनी डॉक्टर रखमाबाई राऊत – भाग – 3 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
न्यायमूर्ती पिन्हे यांच्या या निकालानंतर,दादाजींनी पुन्हा खटल्याच्या फेर सुनावणी साठी अपील केले. इंग्रजांना येथील धर्म कायद्यांना धक्का लावायचा नव्हता. ते मतलबी व्यापारी वृत्तीचे होते. राजकीय स्वार्थ त्यांनी साधला. त्यांच्या राज्यकारभारात मदत करणारा इथला तत्कालीन सुशिक्षित समाज, हा उच्चवर्णीय व परंपरावादी होता. इंग्रजांना राज्य महत्त्वाचे होते. त्यांना धार्मिक बाबतीत लक्ष घालायचे नव्हते.दादाजींनी केलेल्या अपिलाचा खटला यावेळी न्यायमूर्ती फॅरन यांच्याकडे सोपविण्यात आला. समाज व प्रसारमाध्यमे यांच्या दबावामुळे न्यायमूर्ती फॅरन यांनी 1887 मध्ये रखमाबाईच्या विरोधात निकाल दिला. वादीची तक्रार रास्त असून रखमाबाईंनी एक महिन्याच्या आत आपल्या पतीच्या घरी राहायला गेले पाहिजे अथवा सहा महिन्यांच्या कैदेची शिक्षा भोगायला तयार झाले पाहिजे. असा निकाल त्यांनी दिला. रखमाबाईंनी या लादलेल्या विवाहाला आणि या अन्याय निकालाला निक्षून नकार दिला. त्या ऐवजी तुरुंगवास चालेल असे त्या म्हणाल्या. कोर्टाला उद्देशून रखमाबाई बाणेदारपणे म्हणाल्या, ‘नको असलेल्या पतीच्या घरी राहायला जाण्याऐवजी मी आपण दिलेली शिक्षा भोगायला आनंदाने तयार आहे.’असे त्यांनी कोर्टाला सांगितले या कायदेशीर लढाईत रखमाबाईचे आजोबा हरिश्चंद्र व आई जयंतीबाई या दोघांनी रखमाबाईना शेवटपर्यंत साथ दिली. डॉक्टर सखाराम अर्जुन मात्र खटल्याचा हा सारा ताण सहन न होऊन खटला सुरू असतानाच मृत्यू पावले. रमाबाईंचे अतुल्य धाडस पाहून, नंतर जाणता समाजही त्यांच्या पाठीशी उभा राहिला. रखमा बाईंच्या आर्थिक सहाय्यासाठी हिंदू लेडी या नावाने निधी उभारण्यात आला. एवढेच नव्हे तर बालविवाह संबंधातील कायद्यात बदल करण्यात यावा यासाठी,या कायद्यात सुधारणा करण्यासाठीच्या शिफारशी सरकारकडे पाठविण्यात आल्या. या गडबडीत रखमा बाईंच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला विरोध व विलंब झाला. त्यातच दादाजीने पत्रक काढून रखमा बाईंचे आजोबा हरिश्चंद्र व आई जयंतीबाई हे दोघे रमाबाईंच्या नावावर जनार्दन सावे यांनी करून दिलेल्या संपत्तीच्या लोभाने तिला आपल्याकडे नांदायला पाठवत नाहीत असा आरोप केला.त्याला उत्तर म्हणून रखमाबाईंनी आपले संपत्तीचे विवरण प्रसिद्ध केले. दादाजीचा खोटेपणा उघडकीस आला. दादाजी हे कुठल्याही प्रकारे रखमाबाईंसाठी योग्य नाहीत हे दादाजींच्या मामाच्या या उलटतपासणीत कोर्टाच्या लक्षात आले. दादाजींची बाजू उघडी पडल्यावर दादाजींनी रखमाबाई ना तडजोड करण्याची विनंती केली.या विनंतीप्रमाणे दादाजींनी रखमाबाईंनीवरचा पत्नी म्हणून हक्क सोडावा आणि दादाजींना खटल्यासाठी लागलेला खर्च रखमाबाईंनी द्यावा अशी तडजोड झाली.चार वर्ष गाजलेला, दादाजी विरुद्ध रखमाबाई हा खटला 1887साली संपुष्टात आला.आणि रखमाबाई मुक्त झाल्या.
नको असलेल्या विवाहातून रखमाबाई मुक्त झाल्या त्यावेळी त्या फक्त बावीस वर्षांच्या होत्या. पण या कोवळ्या वयात अनुभव संपन्न झाल्या होत्या. सत्यशोधक विचारांचा वारसा, प्रगल्भ बुद्धी त्यांना लाभली होती. स्वतःचे आणि डॉक्टर सखाराम अर्जुन यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे ध्येय त्यांनी उराशी बाळगले होते. त्यांच्यावरील खटल्याच्यावेळी डॉक्टर एडिथ पिची आणि फिप्सन पिची यांनी रखमाबाईना शेवटपर्यंत साथ दिली होती. डॉक्टर एडिथ पिची व डॉक्टर सखाराम अर्जुन यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते.डॉक्टर एडिथ पॅरिस च्या होत्या. तिथून 1883 मध्ये द्या मुंबईला कामा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून रुजू झाल्या होत्या. त्यांचे पती हे स्त्रियांच्या आरोग्यासाठी स्थापन केलेल्या डफरीन फंडाचे सचिव होते. या पती-पत्नीच्या प्रयत्नामुळे रखमाबाईना डफरीन फंडातून आर्थिक मदत मिळाली. याच पती-पत्नीने रखमाबाई ना इंग्लंडमध्ये रहाण्यासाठी मॅक्लेरन दांपत्याचे पालकत्व मिळवून दिले. रखमाबाई डॉक्टर एडिथ आणि फिप्सन यांच्यासोबत 1889 मध्ये वैद्यक शास्त्राच्या अभ्यासासाठी इंग्लंडला गेल्या. त्यांचे आजोबा हरिश्चंद्र यादवजी आणि आई जयंतीबाई यांचा शुभ आशीर्वाद त्यांना लाभला. इंग्लंड मधील कालखंड हा रखमाबाईच्या जीवनातील सुवर्णकाळ होता. वाल्टर मॅक्लेरन हे इंग्लंडच्या पार्लमेंटचे सदस्य होते.त्यांच्या सुविद्य पत्नी इव्हा मॅक्लेरन या सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या होत्या. या सुसंस्कृत घरात रखमाबाईंचा इंग्लंडच्या प्रगत जीवनाशी,प्रगत विचारांशी परिचय झाला. स्त्री-पुरुष समानतेची ओळख त्यांना इथेच झाली.लॉर्ड टेनीसन या महान व्यक्तिमत्वाशी आणि बर्टान्ड रसेल या विद्वानांच्या पत्नीऑलिस रसेल यांची ओळख याच घराने त्यांना करून दिली. इथे त्यांना आदर्श जीवनपद्धती अनुभवता आली.वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठीचीअट असलेला केम्ब्रीजचा एक वर्षाचा कोर्स त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे त्यांनी चार महिन्यात पूर्ण केला. आणि 1890 मध्ये लंडन स्कूल ऑफ ऑफ मेडिसिन फॉर वुमेन या वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षणाचा प्रारंभ केला. 1894 मध्ये त्या शेवटची वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण झाल्या. अनेस्थेशिया विभाग, डेंटल विभाग,चिल्ड्रेन हॉस्पिटल, ऑप्थाल्मिक हॉस्पिटल येथील कामांचा अनुभव घेऊन त्या परीक्षेसाठी स्कॉटलंडला गेल्या.प्रसूतिशास्त्र व शस्त्रक्रिया या परीक्षेत त्यांनी ऑनर्स पदवी मिळविली.
वैद्यकीय पदवी मिळवून सन्मानाने भारतात परतलेल्या रखमबाईंचा टाईम्स ऑफ इंडियाने सन्मान केला. त्यांचे भव्य स्वागत केले. कारण टाइम्स’ने त्यांच्या पत्रांना प्रसिद्धी दिली होती.लोकांच्या दबावाला बळी न पडता हिंदू लेडीचे नाव जाहीर केले नव्हते व त्यांची पत्रे गव्हर्नरकडे विचारार्थ पाठविली होती.डॉक्टर रखमाबाईंनी मुंबईच्या कामा हॉस्पिटलमध्ये सर्जन म्हणून वैद्यकीय व्यवसायात सुरुवात केली. त्यावेळी सुरतमध्ये प्लेग व दुष्काळ यांनी थैमान घातले होते. कामा हॉस्पिटलमध्ये सहा महिने काम करुन डॉक्टर रखमाबाई सुरतच्या माळवी हॉस्पिटलमध्ये रुजू झाल्या. घरापासून दूर राहून त्यांनी हे असिधाराव्रत अंगिकारले. प्लेगच्या साथीमध्ये त्यांनी रात्रंदिवस काम केले. तेथील स्त्रियांची मागास स्थिती, घरी केलेल्या बाळंतपणात होणारे मृत्यू यासाठी रखमाबाईंनी खूप काम केले.माळवी हॉस्पिटल हे डॉक्टर रखमाबाई हॉस्पिटल म्हणून ओळखले जाऊ लागले. रखमाबाईंनी हॉस्पिटलमध्ये बाल वर्ग सुरू केले. स्त्री शिक्षणासाठी वनिता आश्रमची स्थापना केली. अनेक स्त्रियांशी त्या जोडल्या गेल्या. 1917 मध्ये त्या सुरत हॉस्पिटल मधून निवृत्त झाल्या. 1918 मध्ये त्यांनी राजकोट येथील जनाना हॉस्पिटलची जबाबदारी स्वीकारली. सौराष्ट्र व कच्छ प्रांताच्या त्या पहिल्या महिला प्रमुख डॉक्टर होत्या. त्यांनी रेड क्रॉस सोसायटीची स्थापना केली. लोककल्याण हेच ध्येय ठेवले.त्या आजन्म अविवाहित राहिल्या. 1918 मध्ये सुरतला आलेल्या इन्फ्ल्यूएन्झा च्या साथीत त्यांनी अविश्रांत सेवा केली. महायुद्धाच्या काळात जखमी सैनिकांची शुश्रुषा केली. त्यांच्या आजोबांच्या मालकीच्या गावदेवी येथील मंदिरात अस्पृश्य स्त्रियांना घेऊन त्यांनी 1932 मध्ये प्रवेश केला व अस्पृश्यता निवारणात योगदान दिले. त्यांच्या सुरत सेवेबद्दल शासनाने कैसर ए हिंद अशी पदवी त्याना दिली. रेड क्रॉस सोसायटी ने पदक देऊन त्यांचा सन्मान केला. वयाच्या 91 वर्षापर्यंत त्या कार्यरत होत्या. 25 डिसेंबर 1955 रोजी त्या देवत्वात विलीन झाल्या.
क्रमशः….
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈