मराठी साहित्य – कथा/लघुकथा – बीज अंकुरे अंकुरे – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस

बीज अंकुरे अंकुरे

(प्रस्तुत है  सुश्री ज्योति हसबनीस जी  की मानवीय सम्बन्धों पर आधारित व्यावहारिक लघुकथा ‘बीज अंकुरे अंकुरे’) 

‘चालव रे, चालव सपसप हात जरा, तोंड आवर आता ! ‘  घामाच्या धारांनी निथळत असलेला माळी त्याच्या सहकाऱ्यावर डाफरला ! आकाशात ढगांची जमवाजमव झाली होती , हलकं वारं आणि सळसळती पानं जणू  पावसाच्या आगमनाची वर्दीच देत होती . माती, खत , साऱ्याचा एक मोठ्ठा ढेपाळलेला ढिगारा  , वाफ्यातल्या उपटलेल्या शेवंतीचा बाजूला पडलेला भारा , कीटकनाशकाचं भलं मोठं बोचकं , आणि ह्या साऱ्या अस्ताव्यस्त पार्श्वभूमीवर सारं वेळेवारी आटपेल ना ह्या विवंचनेत ओढगस्त चेहऱ्याने बागेत अस्वस्थपणे येरझारा घालणारी मी !

जवळ जवळ प्रत्येकच मान्सूनमध्ये हे चिरपरिचित दृष्य आमच्या बागेत हमखास बघायला मिळतं . सगळ्या बागकामाचा फडशा एकट्याने पाडणारा आमचा माळी मात्र आताशा एका सहकाऱ्याला बरोबर आणायला लागला होता. त्यांचं मातीखतात बरबटणं, झाडांना सुबक कापून शिस्तीत वाढवणं, रोपं लावणं, फुलवणं, निगा राखणं, अधून मधून आपला कसबी हात बागेवरून फिरवत तिचा चेहरा मोहरा पाsर बदलवणं, वर्षभर किती विविध कामं सफाईदारपणे पार पाडतात ही मंडळी ! अगदी हातावरचं पोट असतं त्यांचं ! मेहनत , बागकामाचं ज्ञान , आणि गाठीशी असलेला कामाचा अनुभव  एवढ्या बळावर मिळेल तो बागेचा तुकडा इमाने इतबारे राखत , फुलवत खुष असतात ही मंडळी आपल्या संसाराच्या तारेवरच्या कसरतीत ! पण ह्या त्यांच्या कष्टांना जर त्यांनी संघटितपणाची जोड दिली तर ..! आणि त्या कल्पनेपाशी मी थबकलेच क्षणभर !

खरंच प्रचंड मेहनत करणारी ही कष्टकरी जमात संघटित का नाही होऊ शकत? माती रेतीखताचा योग्य समतोल राखून वाफे तयार करणं, बी बियाणं पेरून रोपं तयार करणं, तयार झालेली रोपं वाफ्यात लावणं, अधून मधून खुरपी करत मुळांना सुखाने  श्वास घ्यायला मदत करणं, कीड फवारणं, सुरेख लॅंडस्केपिंग करणं, झाडांना विविध आकारांत आटोक्यात ठेवणं अशी किती विभागणी होऊ शकते कामाची ! जशी ज्याची मती तशी त्याची गती ह्या न्यायाने ज्याला त्याला आपल्या आवाक्यानुसार कामं वाटून घेता येतील, बोलण्यात सफाई आणि व्यवहारात रोखठोक असणारा गडी कामं मिळवून वाटून देईल, जो तो आपलं नेमून दिलेलं काम तर करेलच प्रसंगी दुसऱ्यासही मदतीसाठी आपणहून सरसावेल, खरंच एक जर सिस्टीम लावली कामाची तर किती गोष्टी सोप्या होतील त्यांच्या आणि आपल्यासाठी देखील किती सुखाचं होईल माळ्याकरवी पार पडणारं बागकाम ! आपल्या सुखासाठी वेठीस धरलेल्या ह्या कष्टकऱ्यांची ही जमात बघितली ना की मला खरंच असं सुचवावंसं वाटतं की ‘ बाबांनो, तुम्ही संघटित व्हा, आणि मिळून नियोजनबद्ध कष्ट करा , नक्कीच त्यातून चांगलंच निष्पन्न निघेल, त्याचा तुम्हालाच फायदा होईल ..! आणि आमची देखील परवड थांबेल. ‘मनात आलेले विचार त्याच्यासमोर मांडावे म्हणून मोठ्या उत्साहात मी त्याच्याकडे वळले आणि, ‘मॅडम काम झालं, निघतो मी, गुडियाला शाळेत सोडायचंय ‘असं म्हणत तो गेलादेखील!

माती खताचे ढिगारे बागेत जागोजागी वाफ्यांमध्ये विसावले होते, वाफा बालशेवंतीने अगदी लेकुरवाळा भासत होता. नव्या झिलईतली बाग खुपच झोकदार वाटत होती. आपल्या कष्टाचा हात बागेवरून मायेने फिरवून , कलाकुसर करून माझा माळी तर कधीच दिसेनासा झाला होता पण माझ्या मनात मात्र त्यांच्या संघटनशक्तीच्या कल्पनेची बीजं रोवली गेली होती! काहीतरी आकारत होतं, देता येईल का त्याला नीटस रूप ह्या विचारांत थेंब थेंब पडणाऱ्या पावसाचं रूपांतर सरी कोसळण्यात कधी झालं कळलं देखील नाही!

© ज्योति हसबनीस