मराठी साहित्य – कथा/लघुकथा – ☆ अडगळ ☆ – सौ. सुजाता काळे

सौ. सुजाता काळे

(सौ. सुजाता काळे जी की कथा ‘अडगळ ’ इस भौतिकवादी एवं स्वार्थी संसार की झलक प्रस्तुत करती है। इस मार्मिक एवं भावुक कथा के एक-एक शब्द , एक-एक पंक्तियाँ एवं एक-एक पात्र हमें आज के मानवीय मूल्यों में हो रहे ह्रास का एहसास दिलाते हैं ।यह जीवन की सच्चाई है। क्या  ‘समय’ के साथ ‘संबंध’  भी पुरानी वस्तुओं की तरह ‘कबाड़’ में तब्दील हो जाते हैं?  मैं इस भावनात्मक सच्चाई को कथास्वरूप में रचने के लिए सौ. सुजाता काळे जी की लेखनी को नमन करता हूँ।)

☆ अडगळ ☆

 

काल रात्री आव्वाचा फ़ोन आला. ‘ताई’ म्हणून ओक्साबोक्शी रडायला लागली. मला वाटलं  की आप्पांबरोबर भांडण झालं की काय ? तीच रडणं एकूण मलाही  धक्का  बसला. परवा तिचा एकुलता एक मुलगा सार्थक त्याच्या बायको मुलाबरोबर त्याच्या नवीन घरी राहायला गेला होता. तिचे घर सुने सुने झाले होते. रिकामे झाले होते. तिच्या घरट्यातील पाखरे उडून गेली होती आणि तिचे घर रिकामे झाले होते. म्हातारपणात उतार वय झालेल्या आई बापाला सोडून तो गेला होता. ज्या सार्थकला तिने जीवाचे रान करून, रात्रीचा दिवस करून, हाल अपेष्टा सोसून वाढवलं होत तोच तिचा एकुलता एक लेक या उतार वयात तिला सोडून वेगळं राहायला गेला होता.

नोकरी निमित्त मुलं परगावी – परदेशी राहणं वेगळं आणि एकाच शहरात बारा तेरा वर्षांनंतर आई बाप सोडून राहणं वेगळं, मग कारण काहीही असो ……! त्यात पोरकेपण , परकेपणा आणि एकटेपणाची भावना असते ती मन पोखरायला लागते. तिचं दुःख मला समाजात होत….. मला समाजात होत  की तिला काय सांगायचं  आहे….!!

अशीही तिनं गेली पाच सहा वर्षे घरात मौनच धारण केलं होतं.  ‘ मौनं सर्वार्थ साधनं …..! ‘   सार्थकच्या शिक्षित बायको बरोबर जुनी मॅट्रिक झालेल्या आव्वाचे लहान सहान वाद होतं असत.  संसार म्हटलं की भांड्याला भांड लागायचंच. फक्त काम पुरताच बोलणे चालू होते.  पण आण्णांच्या स्वभावाला औषध नव्हतं. त्यांच्या वयाने अठ्ठ्याहत्तरी पार केली होती तरीही त्यांच्या तापट स्वभावात किंचित हि फरक झाला नव्हता. त्यांची सतत काही ना काही कुरबुर चालू असे. रेशनिंगच्या अन्नावर जगलेल्या आव्वाला सुस्थितीतील दिवसातील ढीगभर अन्न वाया गेलेले आवडत नव्हते. त्यामुळे घरात अधून मधून काही ना काही तक तक असे. आव्वाच्या अबोलाचे एक कारण असे की तिच्या स्वाभिमानी पण तापट मनाला तिच्या मुलाने सुनेसमोर केलेला अपमान सहन होतं नव्हता. गेल्या दहा बारा वर्षात ती हजारदा मला म्हणत असे की ताई तो मला असा बोलला …. तो मला तसा बोलला…. त्याच्या शब्दांनी माझ्या काळजात भोकं पडली आहेत. आणि तिचं काळीज रडताना बघून माझा थरकाप होतं असे. तिला मी खूप वेळा सांगितले की अशी तळ तळ करू नकोस. मलाही तिचं दुःख कळत होतं. एक आईचं दुसऱ्या आईचं हृदय समजू शकत होतं.

मी तिला बऱ्याचदा समजावले की लाखोंचा हिरा तुझ्या पासून दूर होण्यापेक्षा हजारांचे अन्न वाया जाऊ दे. असे असूनही सार्थक नवीन घर घेई पर्यंत गेली दहा बारा वर्षे एकत्र राहिला. त्यानेही गेली कित्येक वर्षे त्रास काढलाच. त्यामागे अनेक कारणे होती …… असो ….. घरातील चारीही माणसे हटवादी व तापट होती. त्यामुळे घराला तडा गेला होता. कधी कधी असं वाटत कि डिग्री घेऊन ज्ञान मिळतंच असे नाही. मनाचा मोठेपणा व समजूतदारपणाही हवा. तो कोणतीही डिग्री देत नाही.

आव्वाला हे माहित होताच की नवे घर घेतलं म्हणजे मुलगा व सून घराबाहेर पडणार. ती मला फोनवर सांगत होती की तिच्या सोन्यासारख्या नाती तिच्यापासून दूर केल्या. माझ्या मनाची तगमग माझ्या लेकाला कधीच कळली नाही. तो गेला तेव्हा मी घरात नव्हते पण शेजारची आक्का सांगत होती की तिने त्याला खूप समजावले की जाऊ नको. मुलींसाठी तरी रहा. दादा पण खूप  रडत होते……. पण त्याने ऐकले नाही.  ती सांगत होती…. रडत होती…. मी पण गळ्यात दाटून आलेला हुंदका गिळला. डोळ्यातून अश्रू ओघळत होते.

मी एक दोनदा सार्थकला समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या मते आव्वाचंच चुकत होतं.  तीस वर्षे ज्याने आईचं ऐकलं त्याला आज आव्वा चुकीची वाटत होती. ज्या आव्वाची त्याने देवा सारखी पूजा केली होती ती आव्वा आज त्याला चुकीची वाटत होती. तो काहीही एकूण घेण्याच्या मनःस्तिथीत नव्हता. त्यानंतर मी त्याला समजावणे, सांगणे सोडू दिले होते. खर तो आमच्या सर्वांपासून मनाने खूप दूर गेला होता. नात्यामध्ये एक पोकळी निर्माण झाली होती. आता मलाच पोरकं आणि परकं परकं वाटत होतं.

मी कल्पना करू शकत होते की भविष्यात माझा  मुलगा  आला सोडून गेला तर ……  नकोच …. किती भयंकर कल्पना …… !!  हि कल्पना पण सहन होतं नव्हती…….!!  माझ्या अंगावर शहरे उभे राहिले …..!!

मी विचारात गर्क झाले होते . माझा हुंकार न मिळाल्यामुळे आव्वा ‘ताई , ताई .. म्हणून हाक देत राहिली.  मी विचारांच्या तंद्रीतून बाहेर येत म्हटलं , आव्वा मी ऐकत आहे . तू बोल. सगळं  सामान घेऊन गेला का? ‘ तर ती म्हणाली, ‘नाही,  अजून सगळं सामान घेऊन गेला नाही. गरजेचं नेलं आहे. जुनं जुनं सगळं इथंच आहे. नवीन घरात जुन्या वस्तू कशाला? असाही फ्रिज जुना झालाय, टी. व्ही. जुना झालाय, वाशिंग मशीन, मिक्सर जुना झालाय…. सगळं जुनं झालंय…. आम्ही पण जुने झालोय. अडगळीच्या वस्तू आणि आमची ‘अडगळ ‘ इथंच ठेवून गेलाय….. मला तिच्या ‘अडगळ’ म्हणण्याचा मत्यार्थ कळाला.  आव्वा बोलत होती …. रडत होती ….. मी ऐकत होते …. रडत होते …… किती अचूक शब्द प्रयोग केला तिनं ….. म्हातारपण म्हणजे खरंच ‘अडगळ ‘ असते का??

 

© सुजाता काले ✍

पंचगनी, महाराष्ट्र।

9975577684