सौ.वंदना अशोक हुळबत्ते
? कलास्वाद ?
☆ आनंद रंगरेषांचा – मधुबनी शैली/ पेंटिंग ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते ☆
चित्रकला हा मानवी जीवनातील अविभाज्य भाग आहे. ज्या वेळी भाषा विकसित झाली नव्हती तेव्हा आदिमानव आपल्या भावना चित्राच्या माध्यमातून व्यक्त करीत होता. अश्मयुगातील गुहाचित्रातून हे स्पष्ट झाले आहे. आज ही चित्रकला आदिवासी लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सांस्कृतिक ठेवा आहे. लोककलेची ओळख करून घेऊ.
आबालवृद्धांना चित्र पाहणे आवडते. सरळ साधी सोपी चित्रे सहज समजतात.त्या चित्रातील रंग आकर्षक असतील तर ती चित्रे पुन्हा पुन्हा पहावीशी वाटतात. मधुबनी शैलीची चित्रे सर्वांग सुंदर आहेत.त्यातील विषय,आशय, रंग बघताक्षणी आपल्या खिळवून ठेवतात.
मधुबनी पेंटिंग हा बिहारचा सांस्कृतिक ठेवा आहे.हा चित्र प्रकार सुंदर आहे.ही चित्रे छान तेजस्वी रंगात रंगवलेली असतात. रेखांकन मुक्त असते. पाने, फुले, पक्षी, प्राणी, मासा, देवदेवता, किती सहजतेने काढलेली असतात. १९३४ साली बिहार मध्ये मोठा भूकंप झाला तेव्हा या भागाची पाहणी करण्यासाठी एक इंग्रज अधिकारी तिथे आला तेंव्हा भूकंपात पडलेल्या घराचच्या भिंती वर सुंदर चित्रे दिसली.त्या चित्राचे त्यांनी फोटो काढले. हे फोटो या चित्र शैलीचे सर्वात जुने नमुने आहेत. ही चित्रे गावातून बाहेर कधी आलीच नव्हती. ही चित्रेशैली आजवर बिहार मधील महिलांनी जोपासली. बिहार मधील काही गावं चा गावं या चित्र शैलीने सजलेली दिसतात. प्रत्येक घरातील चार वर्षाच्या मुली पासून नव्वद वर्षांच्या महिले पर्यत सर्वजण ही चित्रे काढतात. जणू ही चित्र शैली त्यांच्या रक्तातून धावत आहे.
बिहार राज्यातील मधुबनी जिल्ह्यात ही कला विकसित झाली. म्हणून याला मधुबनी पेंटिंग/शैली म्हटले जाते. मधुबनी बरोबर दरभंगा, पूर्णिया, सहसा, मुजक्कापूर व नेपाळचा काही भाग यातून ही चित्रे काढली जातात. ही कला पुरातन काळा पासून प्रचलीत आहे असे मानले जाते. जनक राजाने आपली कन्या सीता हीच्या विवाह सोहळ्याच्या वेळी संपूर्ण राजवाड्यात, गावात ही चित्रे काढून घेतली होती. म्हणून या कलेला मिथिला पेंटिंग/शैली म्हणून ही ओळखली जाते. रामायण काळापासून ही कला चालत आली आहे.
या चित्र शैलीचे दोन प्रकार
१) भिंती चित्रे
२)अरिपन चित्रे
१) भिंतीवर चित्रे काढण्याचे दोन प्रकार पडतात अ) गोसनी म्हणजे देवघराच्या भिंतीवर काढायची चित्रे यात दुर्गा, काली, गणेश, सूर्य, राधाकृष्ण या विषयावर चित्रे. काढतात.
ब) कोहबर म्हणजे शयन कक्ष इथे प्रमुख्याने कमळ,मासा,झाडे, शिवपार्वती,घोडा,सिंह इ.चित्रे रेखाटली जातात.
२)अरिपन म्हणजे रांगोळी. अल्पना ही म्हणतात. घरातील खोलीच्या फरशीवर, अंगणात, सुंदर रांगोळ्या काढल्या जातात.त्यात रेषेला जास्त महत्त्व असते.
ही चित्रे काढण्यासाठी बांबूच्या काटक्या, काडेपेटीच्या काड्या यांचा उपयोग होत असे.ही चित्रे रंगवण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो.हळदी पासून पिवळा,पळसा पासून लाल,काजळी पासून काळा,तांदळा पासून पांढरा.
चित्राचे रेखांकन प्रथम काळ्या रंगाने करून घेतले जाते. मग त्यात लाल,पिवळा,हिरवा,निळा हे रंग भरले जातात.बार्डर दुहेरी असते.चित्रातील चेहरे व्दिमित एका बाजूला पाहणारे असतात.ही चित्रे सहज समजतात.त्यांतील भाव कळतात .चित्रे आपल्याशी बोलतात म्हणून तर ही चित्रे आंतरराष्ट्रीय स्तरावर जावून पोहचली.परदेशातून या चित्रांना मोठी मागणी आहे.विशेषत: अमेरिका,जपान.जपान मध्ये मधुबनी कलेचे मोठे म्युझियम आहे.या कलेच्या प्रसार करण्यासाठी १५० महिला कलाकारांनी मधुबनी रेल्वेस्थानक विनामोबदला सुशोभित केले आहे.नंतर दरभंगा, पूर्णिया,सहसा,मुजक्कापुरही रेल्वे स्थानके ही सुशोभित केली.ही कला केवळ महिलांन मूळे जिवंत आहे.आज पर्यंत महिलांनी टिकवली आणि विकसित केली.या चित्राची वाढती मागणी पाहून पुरुष चित्रकार ही आता तयार झाले आहेत.पण या कलेच्या विकासाचे आणि संवर्धनाचे सारे श्रेय महिलांनाच जाते.
मधुबनी चित्रात साधेपणा दिसतो.बघता क्षणी मनाला भावतात.मनुष्य,पशुपक्षी,देवीदेवता, राधाकृष्ण, शिवपार्वती,फळे फुले,शुभचिन्हे,चित्रे काढली जातात.मातीच्या भिंतीवर, कागदावर, काॅन्व्हासवर, पिलोवर ही चित्रे काढली जातात. सीता देवी यांनी ही कला गावातून बाहेर काढली. दिल्लीत चित्रे पाठवली, प्रदर्शने मांडली, लोकांन समोर मांडली. लोकांना चित्रे समजू लागली मागणी वाढू लागली स्थानिक महिलांना रोजगार मिळू लागला.परदेशातील आर्ट गॅलरीत ही चित्रे पोहचली.चित्रांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी वाढली. सीतादेवींच्या या कामाची दखल घेवून त्यांना बिहार सरकारने पुरस्कार देवून १९६९ मध्ये सन्मानीत केले, तर भारत सरकारने १९८४ ला पद्मश्री देवून सन्मानित केले. ही कला विकसित होण्यास जगदंबा देवी,महासुंदरी देवी,बउआ देवी या महिलांचे योगदान महत्त्वाचे आहे.त्यांना ही पद्मश्रीने सन्मानीत केले आहे.
या कलेचे महत्त्व इतके वाढले आहे की स्टेट बॅक ऑफ़ इंडियाने आपले डेबीट कार्ड या चित्राने सुशोभित केले आहे. अनेक रेल्वेचे डबे या चित्राने सजत आहेत.ह्या चित्रातील साधेपण आपल्या आकर्षित करतो.ही कला कलाकारी न राहता आता कारागिरी झाली आहे. अनेक महिला या कलेवर आपला उदरनिर्वाह करत आहेत. ही कला केवळ बिहार ची न राहता भारताचा सांस्कृतिक ठेवा झाली आहे. तिचे जतन करणे आपले कर्तव्य आहे.
© सौ.वंदना अशोक हुळबत्ते
सांगली
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈