सौ.वंदना अशोक हुळबत्ते
कलास्वाद
☆ आचंद्र सूर्य नांदो…. ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते ☆
“विजयी विश्व तिरंगा प्यारा
झंडा उंचा रहे हमारा |”
दै.तरूण भारत दर बुधवारी खजाना पुरवणी काढते. ११ आॅगस्टच्या खजाना पुरवणीच्या मुखपृष्ठाने माझे लक्ष वेधून घेतले.
एका तरूणीने अभिमानाने आपल्या हातात तिरंगा घेतला आहे.तो तिरंगा फडकत आहे.तिच्या भोवती नारंगी, पांढऱ्या, हिरव्या, रंगांच्या कपड्यांने वर्तुळ बनवले आहे. एखाद्या नृत्य आविष्कारात बनवतात तसे. शालेय मुलांनी ते वर्तुळ तयार केले आहे. जणू ते म्हणत आहेत या तिरंग्याचा आम्हाला अभिमान आहे. त्याचा मान ठेवणे ही आमची जबाबदारी आहे. देशाच्या स्वातंत्रासाठी दिलेले बलिदान आम्ही व्यर्थ जावू देणार नाही. या देशाची आण, बाण, शान आम्ही राखणार. या भारत देशाचे आधार स्तंभ आम्ही आहोत. देशाचे भविष्य आम्ही घडवणार.आम्ही तरुण आहोत आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य आमच्यात आहे.आम्ही वेगवेगळ्या जाती धर्माचे असलो तरी भारतीय आहोत.आमची एकता अखंड आहे. जोवर या सृष्टीत सूर्य, चंद्र, तारे आहेत तोवर या भारताचे स्वातंत्र्य अबाधित आहे. ते अबाधित ठेवण्याची जबाबदारी संपूर्णपणे आमची आहे. आमच्या क्षमतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे.
“विजयी विश्व तिरंगा प्यारा
झंडा उंचा रहे हमारा |”
आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापनदिन आपण साजरा करत आहोत.हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले.अनेकांनी आपल्या संसारावर तुळशीपत्र ठेवले.याचे भान आम्हा तरुणांना आहे.
तिरंग्यातील नारंगी रंगा प्रमाणे देशासाठी स्वार्थाचा त्याग करण्याची भावना अंगी बाळगून पांढऱ्या रंगा प्रमाणे पवित्र राहून हिरवाईची समृध्दी देशाला मिळवून देणार हेच या दिनी मनात ठसवणार आणि त्या प्रमाणे वाटचाल करणार.हा आशय या मुखपृष्ठातून व्यक्त होताना दिसतो आहे.
भारतीय स्वातंत्र्य चिरायु राहो
जय हिंद
© सौ.वंदना अशोक हुळबत्ते
सांगली
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈