मराठी साहित्य – कविता – मेघ सरले – सुश्री स्वप्ना अमृतकर
कवयित्री : स्वप्ना अमृतकर (पुणे)
आत्मकथ्य : लिखाणाच्या शैलीत, शब्दसुमनांच्या वेलीत, विचारांच्या स्वरचित, मनाच्या काल्पनिक, माझा प्रवास सुरु आहे. साहित्यिक लिखाणांत कविता, चारोळी, गजल, लेख, कथा लिखाण, प्राचीन आणि नव नव्या गोष्टी, तंत्रज्ञान समजुन त्यावर स्वरचित विचारमांडणी करणे.
विशेष : पालकांकडुन लाभलेल्या स्वच्छ विचारसरणी आणि लिखाणाची कला शैली जोपासता यावी हाच प्रयत्न .. – स्वप्ना अमृतकर
मेघ सरले
मेघ सरले,
मोर हासले,
थेंब थांबले,
वादळ हरवले,
नकळत तेव्हांच तू माझ्याकडे पहिले,
आणि मी माझे सर्वस्व गमावले,
तुझ्या बघण्याचा इशारा होता जणू,
पाऊस पडल्यानंतर होणारा आनंद,
ओल्या मातीचाही चोहीकडे दरवळलेला सुगंध,
वाऱ्यानेही कहर केला होता मनी,
कोमल अंगालाही शहारल्या लहरी बेधुंद,
मनाला पालवी फुटावी एवढा गजर झाला त्या क्षणी,
हरवलेल्या राधेला मिळावा तिचा कृष्ण,
असाच काही आहे तू माझ्यासाठी परमानंद,
आपल्या दोघांमध्ये होत होता संवाद केवळ त्या मेघांमुळे,
आता शेवट जरी केला तरी तो केवळ तुझ्या माझ्या प्रेमामुळे,
म्हणूनच,
मेघ सरले,
मोर हासले,
थेंब थांबले,
वादळ हरवले….!
© स्वप्ना अमृतकर