श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है. इसके अतिरिक्त ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है। आज प्रस्तुत है श्रीमती उर्मिला जी का एक विस्मरणीय संस्मरण “रेल्वेत भेटलेली मस्त मैत्रीण !”। उनकी मनोभावनाएं आने वाली पीढ़ियों के लिए अनुकरणीय है। ऐसे सामाजिक / धार्मिक /पारिवारिक साहित्य की रचना करने वाली श्रीमती उर्मिला जी की लेखनी को सादर नमन। )
☆ केल्याने होतं आहे रे # 40 ☆
साधारण पंचवीस वर्षांपूर्वीची घटना…..
सातारा रेल्वे स्टेशनवर बंगलोरला निघालो होतो.कोरेगाव गेलं रहिमतपूर स्टेशन आलं तशी एक साधारण पस्तीशीची एक खेडवळ बाई डोक्यावर पिशवी हातात ट्रंक घेऊन चढायचा प्रयत्न करत होती दोन्ही हात सामानाला गुंतलेले ..
मग काय..ती म्हणाली ” काय बया पायऱ्या तरी केल्यात्या ..रेल्वेवाल्यांनला इवढं सारीक कळत न्हाय..आवं बाया मानसास्नी चढाय तरी याया पायजेल का नगं .! ”
बहुधा ती पहिल्यांदाच रेल्वेने प्रवास करत असावी.
मी दाराशी जाऊन तिच्या डोक्यावरची पिशवी उचलून घेतली त्यामुळं तिचा उजवा हात मोकळा झाला मग त्या हाताच्या आधारानं ती डब्यात आली.अन् दाणकन् तो दणकट देह समोरच्याच रिकाम्या बर्थवर दिला झोकून .म्हणाली ” ” ” कित्ती येळ वाट पहातिया पन् गाडी म्हनून येळवर यील ती रेल्वी कसली वं… नंनंदेच घर टेसनापस्न जवळच हाय तवा ऐकू यत समदं..आज आमकी गाडी दोन तास उशीराने धावत आहे.
….अवं . कसलं काय आन् फाटक्यात पाय.
..”!
” कुठं चाललाय..?
” आवं सांगलीच्या तितं आमचं गाव हाय……..”
पण तुम्ही तर आता इथं रहिमतपुरला गाडीत चढलात..?
आवं हितं माजी ननंद ऱ्हातीया म्हनलं आलोया हिकडं तवा जावांवं भिटून तिला…”
” आवं मंबईला गेलती भनीकडं .लयी दीस बलवत हुती भन म्हनलं जावावं .. मंबई बगाव..”
गेली बया पन् कसलं काय आन् शेनात पाय….!”
गेली तितं तर बया भराभरा डोक्यावर फिरतंय …..म्हनंलं ” हे गं काय? त म्हन्ती ” अगं हितं लयी गरम हुत असतं तवा पंखा लावायलाच लागतोया.
म्हनलं “. बरं हाय बया आमच्या गावाकडं कसं समदं मोकळं ढाकळं .घरात बसा भायेर बसा कसलं भन्नाट येतया वारं……! … “कसली बया तुझी मंबई साधं वारं सुदिक पंक्यानं आन् ती बी इकात घियाचं…”!
तिला म्हटलं .. तुमच्या घरी पंखा नाही.. कां…?”
तशी ती ..”छ्या बया आमच्या खेड्यागावात कशाला पायज्येल ह्यो पंका न् बिंका…! मस्त वारं सुटतया बघा….आन् त्ये बी फुकाट……”!
” आवं त्या आमच्या मंबईच्या भनीकडं सक्काळी उटले आपली बगते तर कुट्ट्ं म्हनून मोकळी जागा न्हाई ..आवं सक्काळी सक्काळी मानसाला जायाला व्हंवं कां नगं..सांगा बरं…?
नुसतीच म्हनत्यात मंबई लयी.ऽऽ…म्होट्टी….”.!”
तशी भनीन मला न्हेलं दरवाजा उगाडला न् म्हनली “जा हितं….!..आन् बघते तं काय तितं पादुका !…अग बया…?
पयला नमस्कार क्येला बघा ! म्हनलं देवा परवास समदा ब्येस झाला बग…तुज्या कुरपेनं…”!
तशी भन आली म्हनली ,
“अगं ताई हे काय देवळ न्हाई ह्याला संडास म्हणत्यात.सकाळी हितंच जायाचं असतया जा….. !”
म्या श्याप सांगितलं.. म्हनलं ,” म्या न्हाई बया पादुकावर पाय ठिऊन पाप डोक्यावं घ्यियाची…….!”मंग काय..?
आवं तिनं घेतलं की भायेरनं दार लावून ……न् मी आत..हुबी….”!
कसंबसं दोन दीस काडलं बया मंबईत न् आले बया परत.प्वाॅट लयी गच्चं झाल्यालं मंग यस्टीनं हितंआली…”..!
आमच्या गावाला जायाला लयी येळ लागल म्हून हितं नंनंद ऱ्हाती तिच्याकडं ग्येले तितं काय म्हनत्यात ते नाटकात ते ” होल वावर इज आवर …” .! तितं ग्येले बया खळाखळा एकदा प्वाॅट रितं झालं तवा बरं वाटलं बगा….”!
विक्रेत्याच्या सामोस्यांच्या खमंगवासाने आमची भूकही चाळवली.आम्ही सामोसे घेतले तिला म्हटलं घ्या गरम गरम .”.. !
” नग बया , माज्या नंदनं दिलीयाकी मला डाळकांदा भाकर बांदून…मी खाईन नंतरनं…..तुम्ही खावा…!”
पण नंतर बहुधा सामोशाच्या वासानं तिलाही खावंसं वाटलं असावं मग म्हणाली…
” ये…..पोऱ्या बगु वाईच एकांदा…लयी नगं… वास ब्येष्ट येतुया…म्हनून……”!
आणि तिनंही एक घेतला चव मस्त लागतीय म्हणल्यावर आणखी दोन खाल्ले. म्हणाली ” आता बास झालं बया.दुपारच्या जेवणाची बेगमीच झाली बगा….”!
तिचं तोंड खाण्यात गुंतल्यामुळं तेवढाच आमच्या श्रवणेंद्रियांना विश्राम मिळाला.आम्हालाही जरा डुलकी यायला लागली…थोडा वेळ शांततेत गेला.जरा बरं वाटलं.
तिनं विचारलं..” ताई कुटं जाऊ लयी लागलीया..”
मी खुणेनेच दाखवलं तशी…
ती गेली दार उघडलन् …. ओरडली अगं बया ..ऽऽ…ऽ. हितंबी पादुका…ऽऽ…. !”
तेवढ्यात गाडी एका छोट्याशा स्टेशनवर थांबली तशी ती डब्याच्या दाराकडं धावली अन् म्हणाली ……
“आवं जरा.. ….कंडाक्टरला म्हनावं आलेचं. बरं कां………”!. असं म्हणत आम्ही काही सांगण्याच्या आधीच ती उतरुन धूम चकाट……….!
©️®️उर्मिला इंगळे
सातारा
दिनांक:-१२-७-२०
!!श्रीकृष्णार्पणमस्तु!!
मजेदार संस्मरण