श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
☆ केल्याने होतं आहे रे ☆
श्रीचामुण्डेश्वरी चरणावली -७
!!श्रीराम समर्थ!!
नवरात्री शुक्रवारी
सण आला मांगल्याचा
ओटी भरा सवाष्णींची
थाट माट सौभाग्याचा !!
घालू सवाष्ण भोजन
अहो शिजवू पुरण
पुरणाच्या दिव्यातुनी
करु देवीस औक्षण !!
मागू जोगवा अंबेचा
मांडू अष्टमी जागर
माता रेणुका भवानी
फुंकू भक्तीची घागर
अंबा प्रगट हो झाली
घटामध्ये विसावली
नवधान्ये समृद्धीची
आनंदाने उगवली !!
अंबा माय तू भवानी
कृपादृष्टी तुझी मोठी
षडरिपू केले चूर
भक्तांच्या कल्याणासाठी !!
बोध संबळ घेऊन
ज्ञानज्योती पाजळल्या
हाती ज्ञानाच्या दिवट्या
गोंधळाने जागवल्या
कामक्रोध हे राक्षस
सत्वगुण तलवार
केले अंबेने मर्दून
असुरांचे हो संहार !!
छत्रपती शिवरायांना
तलवार भेट दिली
धर्म रक्षणाच्या साठी
माय भवानी धावली !!
छत्रपती शिवरायांना
आशीर्वाद द्यावयाला
आली तुळजाभवानी
किल्ले प्रतापगडाला !
उदे गं अंबे उदे…
उदे गं अंबे उदे….
क्रमश:. ….
©️®️ साधक- उर्मिला इंगळे
सातारा