श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
☆ केल्याने होतं आहे रे ☆
श्रीचामुण्डेश्वरी चरणावली -८
!!श्रीराम समर्थ!!
देवी महिषासुरमर्दिनी
श्रीक्षेत्र तुळजापूर येथे
नवरात्रातील महाष्टमीला -श्रीतुळजा भवानी देवीची महिषासुरमर्दिनी अलंकार पूजा बांधली जाते.
देवी भगवतीने महिषासुराचा वध कसा केला याचे वर्णन आज मुक्तछंद काव्यात गुंफून आई भवानी मातेच्या चरणी सविनय अर्पण! इदं न मम !!
?? ?☘️???
त्रिभुवन सुंदरी आदिमाया पार्वती!
रविकिरणांसम तेजोमय कांती !
गळा मुण्डमाळा जपमाळा एका हाती !
कमलासनस्थिता जगदंबा भगवती!
महिषासुरा वधण्या देवांनी दिली शक्ती!!
आला धावून महिषासुर सेनापती चिक्षूर!
करी वर्षाव बाणांचा देवी भगवती वर !
भगवतीने केले बाणांनी चिक्षूरास जर्जर !
चिक्षूराने फेकला त्रिशूल भद्रकालीवर !
चिक्षूरदैत्याचा केला तिने चक्काचूर !!
होताच चिक्षूराचा वध आला धावून चामर
त्रिनेत्री देवीने गदाप्रहारे केला त्याचा चक्काचूर !!
ताम आणि अंधक दैत्याना बाणांनी मारिले!
उग्रवीर्य महाहनू यांची मस्तके उडविली आकाशी त्रिशूले !
उग्रदैत्यास वृक्षपाषाणाने करालास मुष्टिप्रहारे!
उग्रास्य उग्रवीर्य महाहनू दैत्यांच्या मुंड्या उडविल्या तलवारे !
मुंडके बिडालाचे धडावेगळे केले तलवारे !
दुर्धर-दुर्मुख यांची वाट यमलोकी बाणप्रहारे !!
ऐकून हाहा:कार महिषासुर झाला चिंताक्रांत !
रुप घेऊनी रेड्याचे थैमान घातले रणांत!
हल्ला केला सिंहासनी देवी झाली क्रोधित !
हाती घेऊन त्रिशूल धावली महिषासुरावर !
पकडून पायी चेपिले केला शूलप्रहार मानेवर !
अखेर मोहित करून खड्गे मारिला महिषासुर!!
आनंदी झाले सर्व त्रिभुवन सुरवर !
देवतांना संजीवन देणाऱ्या मातेचा केला जयजयकार !!
आई महिषासुरमर्दिनीचा उदोउदो
आई भवानीचा उदोउदो
आई जगदंबेचा उदोउदो
आई अंबाबाईचा उदोउदो
आई रेणुकेचा उदोउदो
उदो उदो उदो उदो उदो उदो उदो ऽऽऽ
!!श्रीजगदंबार्पणमस्तु!!
क्रमश:. ….
©️®️ साधक- उर्मिला इंगळे
सातारा