कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 129 – विजय साहित्य
☆ कातर वेळी…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
(दशाक्षरी कविता)
नदी रंगते, कातरवेळी
रविकिरणांच्या, पायघड्या
निरोप घेई,रवी कुणाचा
अंधारतीच्या, विश्वात बड्या…!
तरंग हळवे, थाट बडा
पाखरझुंडी, मंथर नाद
सुरावटीला, पाखरगाणी
बघ घरट्याची, आली साद…!
नदी किनारी, गोड सावल्या
रती मदनाचा, रंगे खेळ
सहवासाची,मादक धुंदी
हितगुज वारा,घाली मेळ….!
कोणी चुकला,कोणी मुकला
युवा वयस्कर, विसावला
नदी किनारी, गोड नजारा
भिरभिरताना, सुखावला…!
नाही घडले, विशेष काही
तरंग उठले, सभोवती
मार्ग जाहले,जरा प्रवाही
निरोप समई मनाप्रती..!
कातरवेळी, चंद्र चांदणी
ओला दरवळ मनोमनी
निरोप नाही, भेट रवीची
मनपटलावर क्षणोक्षणी…!