कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 131 – विजय साहित्य
☆ उषःकाल ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
संत कबीर मार्मिक
पुरोगामी संत कवी
समाजात सुधारणा
भक्ती मार्गी शैली नवी…! १
तत्कालीन समाजाचे
केले सूक्ष्म निरीक्षण
कलंदर व्यक्तीमत्व
दोहा छंद विलक्षण….! २
पदे निर्भय साहसी
दृष्टांताचे युक्तिवाद
प्रथा अनिष्ट मोडून
प्रेमे साधला संवाद….! ३
धर्मरूप मुळ तत्त्वे
मानव्याचा पुरस्कार
हिंदू मुस्लिम कबीर
अनुयायी आविष्कार…! ४
एका एका रचनेत
धर्म निरपेक्ष वाणी
कर्म सिद्धांताची मेख
प्रतिभेची बोलगाणी….! ५
अंधश्रद्धा कर्मकांड
दाखविले कर्मदोष
कडाडून केली टिका
मानव्याचा जयघोष…! ६
सनातनी बुवाबाजी
भोंदू बाबा केला दूर
वटवृक्षी दोह्यातून
सत्यनिष्ठ शब्द सूर…! ७
संत कबीर साहित्य
जणू जीवन आरसा
सुफी अद्वैत योगाचा
दिला मौलिक वारसा…! ८
संत कबीर दोह्यांचे
करूयात आकलन
प्रेममयी भक्तीभाव
निजरूप संकलन…! ९
सुर छंद लय ताल
गुंग होई भवताल
संत कबीर स्मरण
सृजनाचा उषःकाल..! १०
© कविराज विजय यशवंत सातपुते
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
अत्यंत निराळ्या धाटणीची कविता,कबिराच्या साहित्याबद्दल सजग करणारी