कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 138 – विजय साहित्य
☆ साद…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
हळू हलवा पाळणा
साद घाली गं बासरी
आली कृष्णाची अष्टमी
छबी कान्हाची हासरी….! १
साद घालते गोकुळ
आली यमुना डोळ्यात
सजे पाळणा कान्हाचा
कान्हा दंगला मेळ्यात…! २
साद घालितो हा कान्हा
मित्रा , ये रे बा ,सुदामा…..
अंतर्यामी या गोकुळी
सार मैत्रीचे सुदामा ……! ३
साद घालितो हा कान्हा
गोकुळच्या गोपसुता
दहीहंडी, दहीकाला
पाझरते शब्दसुता.. . . ! ४
साद घालितो हा कान्हा
रंगे उत्सव अंतरी
गोविंदाची दहिहंडी
मना मनाच्या संकरी. . . . ! ५
साद घालितो हा कान्हा
वारा श्रावण दारात
आला आनंद पाहुणा
सण सौख्याचा श्वासात. . . . ! ६
नाम राधा माधव हे
ध्यास अंतरी प्रेमाचा
भाव भक्तीच्या मिलनी
नाद संयमी स्नेहाचा. . . ! ७
साद घालितो हा कान्हा
संकीर्तन हे प्रितीचे
मैत्र रूजले अंतरी
वेणू वादन भक्तीचे. . . . . ! ८
© कविराज विजय यशवंत सातपुते
१८/८/२०२२
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈