कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 155 – विजय साहित्य
☆ निरोप…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
मनस्पर्शी जाणिवांची
आठवांची पत्रावळ
दूर जाते कुणी एक
मागें उरे सणावळ…! १
डोळ्यातील मोती माला
निरोपाचे मूर्त रूप
नको चिंता नि काळजी
तन मन सुखरूप….! २
काढ माझी आठवण
घाल ईरसाल शिवी
निरोपाच्या खुशालीत
त्याची होईल रे ओवी…! ३
आभाळाच्या आरशात
आठवांची पानगळ
निरामय संवादाने
दूर कर मरगळ…! ४
भेट नसतो शेवट
भेट प्रवास आरंभ
निरोपाने जोडलेला
जीवनाचा शुभारंभ…! ५
गुरू,मित्र, आप्तेष्टांचा
असे निरोप हळवा
हात हलता सांगतो
वेळ येण्याची कळवा…! ६
नाही टळले कुणाला
निरोपाचे देणें घेणे
दिनदर्शिकेचे पानं
नियोजित शब्द लेणे…! ७
निरोपाचा हेतू सांगे
आला भावनिक क्षण
हासू आणि आसू तून
वाहे खळाळते मन…! ८
दुरावते कधी तन
कधी दुरावते नाते
श्रृती स्मृती येणे जाणे
मन निरोपाचे जाते…! ९
जुन्या वर्षाला निरोप
नव्या वर्षाचे स्वागत
ध्येय संकल्प इच्छांचे
हळवेले मनोगत…! १०
निरोपाचा येता क्षण
मन राहिना मनात
शब्द शब्द कवितेचा
एका एका निरोपात..! ११
कधी बाप्पाला निरोप
कधी कुणा श्रद्धांजली
होतो स्थानात बदल
अंतरात स्नेहांजली….! १२
© कविराज विजय यशवंत सातपुते
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈