कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 156 – विजय साहित्य
☆ संस्कार सावली…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
(4 जानेवारी – कै सिंधुताई सापकाल स्मृतीदिवस दिना निमित्त)
अनाथांची माय
करुणा सागर
आहे भोवताली
स्मृतींचा वावर…!
ममतेची माय
आदर्शाची वाट
सुख दुःख तिच्या
जीवनाचा घाट..!
परखड बोली
मायेची पाखर
आधाराचा हात
देतसे भाकर…!
जगूनीया दावी
एक एक क्षण
संकटाला मात
झिजविले तन…!
पोरकी जाहली
माय ही लेखणी
आठवात जागी
मूर्त तू देखणी…!
दु:ख पचवीत
झालीस तू माय
संस्कार सावली
शब्द दुजा नाय..!
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈