कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 163 – विजय साहित्य
☆ देवदूत ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
चिंध्या पांघरोनी बाबा
धरी मस्तकी गाडगे
डेबुजी या बालकाने
दिले स्वच्छतेचे धडे…!
विदर्भात कोते गावी
जन्मा आली ही विभूती.
हाती खराटा घेऊन
स्वच्छ केली रे विकृती…!
वसा लोकजागृतीचा
केला समाज साक्षर
श्रमदान करूनीया
केला ज्ञानाचा जागर.
झाडूनीया माणसाला
स्वच्छ केले अंतर्मन.
धर्मशाळा गावोगावी
दिले तन, मन, धन…!
देहश्रम पराकाष्ठा
समतेची दिली जोड
संत अभंगाने केली
बोली माणसाची गोड…!
धर्म, वर्ण, नाही भेद
सदा साधला संवाद
घरी दारी, मनोमनी
गोपालाचा केला नाद…!
स्वतः कष्ट करूनीया
सोपी केली पायवाट
संत गाडगे बाबांचा
वर्णीयेला कर्मघाट…!
असा देवदूत जनी
मन ठेवतो निर्मळ
त्यांच्या आठवात आहे
प्रबोधन परीमल…!
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈