कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 165 – विजय साहित्य
☆ आधार ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
(अंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त कवितेचा यथोचित सन्मान)
मी एक स्त्री
माझं अस्तित्व
नाही कुणाची परंपरागत मालकी.
मी आहे बाई माणूस
आहे माझ्यातही
कर्तृत्व गाजवणारे शौर्य..!
मला जगायचे आहे
मानानं,स्वाभिमानांन
जाज्वल्य आणि अस्मितेनं..!
राखायचे आहे घरदार..
जागतिक महामारी संकटात
बाळगायची आहे
सावधानी वारंवार ..!
मला सावरायचं आहे
माझं कुटुंब..पती.. मुलं
सासू सासरे..
आप्तेष्ट गोतावळा
आणि द्यायचा आहे आकार
माझ्या वर्तमानाला..!
निरामय आरोग्यात
रहायचे आहे मला
सेवा आणि भुतदयेनं
जबाबदारी आणि
कर्तव्य परायणतेनं
जिंकायचं आहे..
माझ्यातलं बाईपण मला…!
मला आहे जगायचे
एका एका श्वासासाठी..
वासंनांध नजरेला
द्यायची आहे मूठमाती..
त्यांच्याच आयाबहिणी
सुरक्षित रहाव्या म्हणून
शिकवायचाय धडा..
स्त्री ला अबला समजणाऱ्या
कर्तृत्वहीन भेकड पुरुषांना..!
मला द्यायची आहे सोडचिठ्ठी
रिती,रिवाज आणि
हुंडाबळी सारख्या भूतकाळाला.
द्यायची आहे दिशा
माझ्या उज्ज्वल भविष्याला..
दाखवायाची आहे
माझ्या त्या कलागुणांची
तेजोमय कलाप्रभा..
करायचे आहे साकार
माझ्याच ध्येयांकित वर्तमानाला..
आणायचाय खेचून
आत्मनिर्भर भारत..
माझ्यातलं बाईपण जपणारा…
मला जगायचे आहे..
माझ्या मनाचं तारूण्य
आणि भावभावनांचं सौंदर्य
अबाधित राखण्यासाठी
मला रहायचं नाही निराधार
बनायचं आहे आधार…
बाईपण हरवलेल्या अन्
स्त्रीत्वं हिरावून घेतलेल्या
अनेकानेक माय भगिनींचा…!
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈