कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 174 – विजय साहित्य
☆ आई तुझे रुप ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
☆
आई नाव देई
जगण्या आधार
आई तुझे रूप
वात्सल्य साकार.. . !
आई तुझा शब्द
पारीजात फूल
सेवेमध्ये तुझ्या
होऊ नये भूल.. . !
आई तुझे रूप
आदिशक्ती वास
घराचे राऊळ
ईश्वराचा भास. . . . !
आई तुझे स्थान
सदा अंतरात
अन्नपूर्णा वसे
तुझ्या भोजनात.. !
आई तुझे रूप
चिरंतन पाया
स्नेहमयी गंगा
अंतरीची माया.. . !
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈