कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 186 – विजय साहित्य
☆ एक भाकर…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
चुलीतला जाळ
जसा जसा भडकायचा
झोपडीबाहेरचा अंधार
तसा तसा वाढायचा.
भाकरीचा चंद्र
नशीबाच्या कलेकलेनं
रोज कमी जास्त हुयाचा.. . !
कधी चतकोर, कधी अर्धा
कधी आख्खाच्या आख्खा
डागासकट हरखायचा.. !
माय त्याच्याशी बोलायची .
अंधारवाट तुडवायची. . . !
लेकराच्या भुकंसाठी
लाकडागत जळायची.. !
आमोशाच्या दिसात बी
काजव्यागत चमकायची. . . !
त्या नडीच्या दिसात ती. . .
गाडग्यातल मडक्यात अन्
मडक्यातल गाडग्यात करीत
माय जोंधळं हुडकायची.
जात्यावर भरडायची.
तवा कुठं डोळ्याम्होरं.. . .
चंद्रावानी फुललेली
फर्मास भाकर दिसायची..!
घरातली सारीच जणं
दोन येळच्या अन्नासाठी
राबराब राबायची…!
चुलीमधल्या लाकडागत
जगण्यासाठी जळायची.. . !
पडंल त्ये काम करून
म्या, तायडी,धाकल्या गणू
मायची धडपड बघायचो
बाप आनल का वाणसामान
सारीच आशेवर जगायचो.. . !
चुल येळेवर पेटायसाठी
हाडाची काड करायचो. . . !
चुलीवर भाकर भाजताना
माय मनात रडायची.
भाकर तयार व्हताच
डोळ्यात चांदणी फुलायची.. !
लाकड नसायची, भूक भागायची.
आमच्या डोळ्यावर झोप यायची
पण . . . कोण जाणे कुठपर्यंत
एक थंडगार चुलीम्होर.. .
बा ची वाट बघत बसायची.
भाकरीच्या चंद्रासाठी
तीळ तीळ तुटायची.
उजेडाची वाट बघत
आला दिवस घालवायची…!
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈