कविराज विजय यशवंत सातपुते
☆ साप्ताहिक स्तम्भ # 83 – विजय साहित्य ☆ ओवी बद्ध रामायण – काही ओव्या ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
(ओवी बद्ध रामायण या खंडकाव्य यातील काही ओव्या… काव्य प्रकार – साडे तीन चरणी ओवी)
धर्मपरायण राजा , शोभे अयोध्या नरेश
अवतारी परमेश , राजगृही.. . ! 25
पोटी नाही पुत्र सौख्य, पूर्ण व्हावे मनोरथ
खंतावला दशरथ, मनोमनी. . . ! 26
वसिष्ठांना पाचारण काश्यपांना निमंत्रण
जाबालींना आमंत्रण, धर्मकार्ये.. . ! 27
पुत्रकामेष्टीचा यज्ञ, शृंगऋषी पुरोहित
दथरथे समर्पित, यज्ञाहूती . . . ! 28
गोरस नी गोधृताने, आरंभीला यज्ञयाग
यथोचित द्रव्यभाग, केला दान.. ! 29
दानधर्म, कुलाचार, आणि पुण्याहवाचन
वेदमंत्रांचे पठण, यज्ञस्थली.. . ! 30
अग्निदेव प्रगटले , दिले पायसाचे दान
पुत्रसौख्य वरदान, चिरंजीवी . . . ! 31
आनंदल्या तिन्ही राण्या, केले पायस भक्षण
गर्भी आले नारायण, कौसल्येच्या.. . ! 32
चैत्र मासी नवमीस , राणी कौसल्येस राम
आनंदाने भरे धाम , जन्मोत्सव . . ! 33
माध्यान्हीला जन्मोत्सव कौसल्येचे नुरे भान
रामजन्मी गाती गान, प्रजाजन . .! 34
सूर्यवंशी रामराया , विष्णू रूप अवतार
बालरूप अंगीकार ,मोहमयी . . . ! 35
राजा दशरथापोटी ,जन्मा आले पुत्र चार
झाला राम अवतार, अयोध्येत .. ! 36
चार पुत्र तेजोमय, यश, कीर्ती समाधान
विष्णूरूप शोभे सान, रामचंद्र … ! 37
माता कौसल्येचा राम, राम सुमित्रा नंदन
चाले वात्सल्य मंथन, कैकेयीचे.. . ! 38
लक्षुमण , शत्रुघ्नाची, सुमित्रेस लाभे ठेव
वात्सल्याचे फुटे पेव, बालांगणी . . ! 39
राजराणी कैकयीने , दिला जन्म भरताला
धन्यवाद संचिताला, पुत्रजन्मी.. . ! 40
राम लक्षुमण जोडी, शत्रुघ्नाचा बंधुभाव
भरताच्या ह्रदी ठाव, स्नेहपाश .. . ! 41
धन्य कौसल्या जननी , हट्ट करी नारायण
आसवांचे पारायण , राम कुक्षी. .! 42
जगावेगळेच खेळ, हवे विश्व खेळायला
राम लागे मागायला ,साप दोरी . . ! 43
आकाशीचा चंद्र मागे,बाललीला बालपणी
दमवतो रघुमणी, प्रासादास . . ! 44
काय वर्णू बालरूप , हरितेज सामावले
नरदेही विसावले ,परब्रह्म . . ! 45
दुडू दुडू धावताना, प्रासादाचे होई रान
हरपले देहभान, रामरंगी . . . ! 46
वात्सल्यात तिन माता, बालहट्टी सुखावल्या
रामरंगी तेजाळल्या , दिन रात.. ! 47
रघुकुल शिरोमणी, वेड लावी चक्रपाणी
कौतुकाची बोलगाणी , आप्तेष्टांची .! 48
राजा दशरथ धन्य, धन,धान्य करी दान
वस्त्र, दक्षिणा, गोदान, मुक्तहस्ते. . . ! 49
चार बोबडेसे वेद, दिसामासी झाले मोठे
बाल कुमार छोटे ,तेजाळले. . ! 50
© विजय यशवंत सातपुते
मोबाईल 9371319798
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
खुप सुंदर ओव्या!