कविराज विजय यशवंत सातपुते
साप्ताहिक स्तम्भ # 90 – विजय साहित्य
☆ हरवलेले प्रेम जेव्हा .. . . ! कविराज विजय यशवंत सातपुते ☆
हरवलेले प्रेम जेव्हा
तुला मला हसू लागते
तुझ्या माझ्या काळजाला
पुन्हा चूक डसू लागते. . . . !
हरवलेले प्रेम जेव्हा
नवी वाट चालू लागते.
जुन जुन प्रेम देखील
नव नवं रूसू लागते. . . . !
हरवलेले प्रेम जेव्हा
एकट एकट राहू लागते
तुला मला एकदा तरी
वाट त्याची दिसू लागते. . . . !
हरवलेले प्रेम जेव्हा
आठवणींचे मेघ होते
ओठांमधले नकार सारे
शब्दांमध्ये फसू लागते. . . . . !
हरवलेले प्रेम जेव्हा
तुझी माझी झोप पळवते
नकळत आपल्या डोळ्यात
नवे स्वप्न वसू लागते. . . . !
हरवलेले प्रेम जेव्हा
तुला मला शोधू लागते.
काळीजदारी उंबरठ्यावर
वाट बघत बसू लागते.
हरवलेले प्रेम जेव्हा
वळवाची सर होते
जपून ठेवलेले वादळवारे
पाऊस होऊन बरसू लागते. . . . !
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 9371319798.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
सुंदर भावपूर्ण रचना