कविराज विजय यशवंत सातपुते

? साप्ताहिक स्तम्भ # 91 – विजय साहित्य ?

☆ ✒ प्रगल्भ ✒  कविराज विजय यशवंत सातपुते ☆

आयुष्यात  नाजूक वळणावर

जरा पाऊल घसरले

किंवा चुकून वाकडे पडले की

काजवे चमकावेत तशी चमकते

वेदनेची दिशा. . . . !

जगण्याची   आशा

मरू देत नाही

मनाला झालेल्या जखमा

धड जगूही देत नाहीत

जातील हेही दिवस जातील

धीराचे बोल कानी पडतात

यातनांची कूस पुन्हा  उजवते

भाकरीचा चंद्र दिसताच लागते

प्रगल्भ तेची आच.

वर्षानुवर्ष कपाळावरचा लाल सूर्य

माये वेदनेला प्रसवीत चाललाय

अन तू करतेस प्रवास

आम्हा लेकरांचे कारण सांगून. . .

अजून किती दिवस, किती वर्षे

बघायची रात्र

बघायचा दिवस

नव्या नव्या वेदनांनी

नशीब बडवत चाललेला.

माये,  चुलीतला जाळ

मनाची  आग

स्वतःच स्वतःवर काढलेला राग

चालूच देत नाही नवीन वाट.

पावलही आता फितूर झालीत

पुन्हा पुन्हा घसरतात.

वाकडी पडतात

मनाला वंचित करतात

इवल्याशा सुखापासून.

तरीही  स्वतःला घडवायचं

प्रगल्भ बनवायच. . . .

जीवनवाटेवर चालताना

वाट सरळ असली  नसली तरीही. . . . !

 

© कविराज विजय यशवंत सातपुते 

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  9371319798.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments