कविराज विजय यशवंत सातपुते
साप्ताहिक स्तम्भ # 107 – विजय साहित्य
☆ माझी शाळा ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
अभिनव माझी शाळा
अंतरात कोरलेली
यशोदीप गुणकारी
शैशवात गोंदलेली…१
कलासक्त गुरूजन
आधाराचा देती हात
ज्ञानदान करताना
देती संकटांना मात…२
शाळा आणि क्रिडांगण
जणू ज्ञानाची पंढरी
खेळ मैदानी खेळता
शाळा भरते अंतरी…३
शिका वाचा आणि खेळा
शाळेतील गुरू मंत्र
शाळा अभिनव माझी
जीवनाचे सोपे तंत्र…४
माय बाप झाली शाळा
तन मन घडविले
योग व्यायाम संस्कार
अलंकार जडविले…५
बदलले रंग रूप
नाही बदलली शाळा
आशीर्वादी कानी नाद
ज्ञानवंत हो रे बाळा…६
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 9371319798.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈