कविराज विजय यशवंत सातपुते
साप्ताहिक स्तम्भ # 110 – विजय साहित्य
☆ ग्वाही ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
(अष्टाक्षरी)
माझं आणि कवितेचं
जिव्हाळ्याचं जुनं नातं .
काळजाच्या माजघरी
आठवांचे आहे जातं.
जातं आठवांचे दळी
अनुभूती घेत जाऊ
साध्या सोप्या शब्दातून
प्रतिभेच्या गावा जाऊ.
काळजास टोचलेले
झाले व्यक्त नात्यातून
संवेदना जाणिवांची
डोकावते काव्यातून.
कधी मुक्त कधी बद्ध
तिचे वय फुलण्याचे
आहे जनक मी तिचा
कार्य नाते जपण्याचे .
असो प्राजक्त बकुळ
कधी रानातला मेवा
कवितेत गवसला
बापलेकी श्वास ठेवा.
बाल तरूण वृद्धांचे
लेक करी संगोपन
नाही ठेवले एकटे
सदा आनंद वर्धन.
जीवनाच्या रंगमंची
एक नाते भारवाही
कवितेने मिरवावी
माझ्या असण्याची ग्वाही .
असे नाते अशी माया
शब्द सुता करीतसे
नाना रूपे साकारूनी
यशकीर्ती देत असे.
© कविराज विजय यशवंत सातपुते
मोबाईल 9371319798.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈