कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 123 – विजय साहित्य
☆ साथ…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
बहरली प्रीतवेल
दुःख रंगले सुखात
तुझा लागताच वारा
पडे पक्वान्न मुखात….!..१
बहरली प्रीतवेल
नाही ओंजळ रिकामी
तळहाती भाग्यरेषा
तुझ्या विना कुचकामी…!..२
अंतरीच्या अंतरात
चाले तुझी वहिवाट
काट्यातल्या गुलाबात
विश्वासाची पायवाट…..!..३
बहरली प्रीतवेल
तिथे फिरे तुझा हात
आठवांची मुळाक्षरे
गिरवितो अंतरात….!..४
ऊन पावसाळे किती
तुझ्या धामी विसावले
ऋतू जीवनाचे माझ्या
तुझ्या नामी सामावले…!..५
बहरली प्रीतवेल
सुखी संसाराची छाया
साथ तुझी पदोपदी
लाभे सौख्य शांती माया….!..६
© कविराज विजय यशवंत सातपुते
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈