कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 125 – विजय साहित्य
☆ आला आला कवी…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
(अतिशयोक्ती अलंकार)
आला आला कवी
वाचू लागला वही
चार तासांनी म्हणे
ही होती फक्त सही….!
कविता त्याची नाजूक
खसखशी पेक्षाही छोटी
मुंगी सुद्धा त्यांच्यापुढे
शंभर पट मोठी…!
आला आला कवी
किती त्याचे पुरस्कार
रद्दिवाला म्हणे
घेतो हप्त्यात चार..!
आला आला कवी
चला म्हणे घरी
दाखवतो तुम्हाला
स्वर्गातली परी…!
आला आला कवी
पिळतोय मिशा
शब्दांच्या कोट्यांनी
भरलाय खिसा…!
आला आला कवी
खांद्याला झोळी
शब्दांच्या भाकरीत
पुरणाची पोळी…!
आला आला कवी
चोरावर मोर
जोरदार घेई टाळ्या
कोल्हाट्याचं पोर…!
© कविराज विजय यशवंत सातपुते
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈