मराठी साहित्य – कविता – ☆ 150वीं गांधी जयंती विशेष-2 ☆ माकडं ☆ – श्री अशोक श्रीपाद भांबुरे
ई-अभिव्यक्ति -गांधी स्मृति विशेषांक-2
श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। इस अवसर पर श्री अशोक जी की इस कविता के लिए हार्दिक आभार. )
☆ माकडं ☆
बापुजी,
तुमच्या त्या तीन माकडांच्या वंशावळीने
शहरात अगदी उच्छाद मांडलाय.
आता त्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे.
काही वाईट ऐकायला नको म्हणून
तुमचं माकड कानावर हात ठेवायचं
आता ही माकडं कानांवर हात नाही ठेवत
तर ती वाकमनची दोन निपल्स
कानांत घालून बसतात
आणि मग कुणाचं काहीच ऐकत नाहीत.
कुणाला काही वाईट बोलायचं नाही म्हणून
तुमचं माकड तोंडावर हात ठेवायचं
पण हल्ली मात्र ही माकडं
तोंडात गुटका किंवा तंबाखुचा बार भरून ठेवतात
रस्ताभर पिचकार्यांच्या रांगोळ्या काढत फिरतात
पिचकारी मारल्यावर जर कुणी काही बोललंच
तर त्यांचं तोंड कसं बंद करायचं
हे त्यांना चांगलंच ठावूक असतं.
आता हे तुमचं तिसरं घमेंडखोर माकड
भर चौकात लाल दिवा दिसत असताना
डोळ्यावर मगरुरीची पट्टी बांधून
स्वतःच्या किंवा दुसर्याच्या जिवाची चिंता न करता
भूर्रकण निघून जातंय.
तुमची ती माकडं कशी शांत
आणि एका ओळीत बसलेली असायची
आता मात्र ओळ आणि शिस्त पार बिघडू गेलेली.
बापुजी तुम्ही परत एकदा याल का माझ्या शहरात?
ती तुमची तीन माकडं घेऊन…
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८