सौ. गौरी सुभाष गाडेकर
☆ कवितेचा उत्सव ☆ नकळत ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
सकाळी पळत
संध्याकाळी पळत
डोळ्यापुढे दिसतेय
कामाची चळत
दिवस आला कसा
दिवस गेला कसा
वेळ कुठे गेला
काही नाही कळत
काटे चालले भरभर
वाटी भरते झरझर
वाळूची धार राही
संतत गळत
कुठे गेल्या हसणाऱ्या
सया कधी रुसणाऱ्या
कालच तर होतो आम्ही
खिदळत खेळत
अचानक असा
समोर आरसा
आरशातल्या ‘मी’शी
मी नाही जुळत
केस कधी पिकले,
शरीर कधी थकले
काळ माझ्यापुढे
मी काळापुढे पळत
© सौ. गौरी सुभाष गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈