श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ फांदीवरचा काटा… ☆
कळी उमलली गुलाब थोडा फुलला होता
तारुण्याच्या भाराने तो कलला होता
मला भावला रंग गुलाबी सौंदर्याचा
तोच रंग मग डोळ्यानेही टिपला होता
गुलाब पाहुन सुचल्या होत्या दोनच ओळी
त्या ओळींचा छानच झाला मतला होता
गजलेने या कौतुक केले जसे सखीचे
केसामधला गुलाब तेव्हा खुलला होता
स्वागत करण्या हात जरासे पुढे धावले
फांदीवरचा काटा तेव्हा डसला होता
प्रतिभेच्या ह्या किती पाकळ्या तुझ्या भोवती
त्या प्रतिभेने गुलाब केवळ नटला होता
तुझा भास अन् समोर नव्हते कोणी माझ्या
सुगंधात त्या तुझा चेहरा लपला होता
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈