सुश्री सुमन किराणे
कवितेचा उत्सव
☆ पुनर्जन्म तू घेशील का?… ☆ सुश्री सुमन किराणे ☆
व्यथा मनीची मांडत आहे
शब्द तयाचे होशील कां?
भाऊराया असशी तिथनं
पुन्हा परतुन येशील कां?
नारळी पुणव जवळ आली
राखी बांधुन घेशील कां?
परत एकदा रक्षणास मम
सज्ज तू रे होशील कां?
कसे आवरू मन हे हळवे
समजावण्या येशील कां?
नाहीस तरी जाणीवेतून
तू मज धीर देशील कां?
तू गेला अन् मी कोसळले
जरा सावरुन घेशील कां?
हृदय दाटले बांध फुटले
डोळे माझे पुसशील कां?
बुडले मी रे दुःख सागरी
देवुन कर वर घेशील कां?
या भगिनीच्या हाकेला तू
प्रतिसाद कधी देशील कां?
भास सदोदित होतो आहे
पुन्हा दर्शन देशील कां?
तव वेड्या या भगिनीसाठी
पुनर्जन्म तू घेशील का?
© सुश्री सुमन किराणे
पत्ता – मु.पो. हेर्ले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापुर.
मोबा.9850092676
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈