कवितेचा उत्सव
☆ 💦 पावसाचे स्वरविश्व ☆ सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆
कडाडले मेघ नभी..
आला काळोख दाटून…
बिजली ही नृत्य करी..
आसमंत झळाळून…।
थेंब थेंब पर्जन्याचा..
हळूच उलगडला…
पावसाच्या लडीतून..
धुवाधार कोसळला…|
मेघ आळवी मल्हार..
वारा वाजवी पिपाणी…
पर्जन्य स्वर कानात..
अन् पावसाची गाणी…|
एक चिंब स्वरविश्व ..
उभं केलं पावसानं…
छान लागलासे सूर..
हरपले सारे भान…|
मैफिलीला चढे रंग..
डोले भवताल सारा…
मनमोर अंतरीचा..
फुलवी सुखे पिसारा…|
💦🌨️.
© शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)
कोथरूड-पुणे.३८.
मो.९५९५५५७९०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈