श्री हरिश्चंद्र कोठावदे
कवितेचा उत्सव
☆ सखये, तुझ्या जलाने… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆
(वृत्त : अनलज्वाला) – (मात्रा :८+८+८)
सखये तुझ्या जलाने माझी तृषा शमेना
विस्तारल्या रणाला छाया तुझी पुरेना !
वाटेत यात्रिकाच्या किति मंदिरे नी देव
भक्तीस एकनिष्ठा जपणे इथे जमेना !..
रणरण रणास भिडती हिमगार मोहवारे
प्राणातला निखारा प्राणास सोसवेना !..
एक पाश मोकळा नि आलिंगनी दुजाच्या
ती मुक्तीची पहाट उगवे कधी कळेना !….
का व्यथा बोलती या भलतीच आज बोली
दिग्घोष हुंदक्यांचा का मौन ते कळेना !….
उत्स्फूर्त जाण सखये अज्ञातवास माझा
सिंहासनास आले वैराग्य का कळेना !..
पतनास साक्ष माझ्या उत्थान खुद्द माझे
मरणावरी स्वतःच्या कैसे रडू कळेना !..
© श्री हरिश्चंद्र कोठावदे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈