☆ कवितेचा उत्सव ☆ मिलन ☆ सौ. मुग्धा कानिटकर ☆
सरितेसी भेटावे अधीर निर्झराने
सागरी खळाळणे तिचे आतुरतेने
पवित्र संगम असे अवनीवरचे
या सम मिलन का न घडे आपुले?
पानोपानी सळसळे लहरींचे गाणे
लाटांमागून लाटांचे किनारी फेसाळणे
भेट ती आपुलकीने एकटेपण न उरले
या सम मिलन का न घडे आपुले?
सुंदर गोफ इंद्रधनुचे लेणे नभीचे
मोहक पूनवेचे जळी शोभे बिंब शशीचे
मिलन निसर्गाचे व्यर्थच का ठरले
या सम मिलन न घडे जर आपुले?
© सौ. मुग्धा कानिटकर
सांगली
फोन 9403726078
23/10/2020
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈